'ती' जिवंत आहे म्हणूनच मी जगतोय !

frustration
frustration

फेसबुकवरुन एक दिवस त्यांची ओळख झाली, पुढे नकळत प्रेम ही जुळले. त्यांनी एकमेकांसमवेत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. सुखी संसाराची स्वप्नेही पाहीली. पण परंपरेप्रमाणे त्यांना "जात' आडवी आली आणि त्यानंतर घडले ते वेगळेच. ती उच्चवर्णीय, तर तो मागासवर्गीय समाजातील असल्याने तिच्या वडीलांनी त्यांच्या लग्नास नकार दिला, त्यानंतरही त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु "जालीम दुनिया'ने ते लग्न अर्ध्यावरच मोडले. तिच्या कुटुंबाने तिला घराच्या चार भिंतींमध्ये अडकवून ठेवलेय, तिच्यावर अनेक बंधने लादली आहेत. त्यास कंटाळुन तिने एक-दोनदा नव्हे, तर तब्बलर सात-आठ वेळा आत्महत्येचा प्रयत्नही केला. इकडे तो मात्र दिवस मोजतोय. गेली 522 दिवसांपासून तो तिच्या घरापासून दूर थांबून ती एकदा तरी दिसेल याची वाट पाहतोय, ती जगावी म्हणून प्रयत्न करतोय ! हे चित्र कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही खेड्यापाड्यातील नाही, तर पुण्यासारख्या पुरोगामी विचारांच्या शहरातील आहे. 

स्नेहा व विक्रांत (दोघांचीही नावे बदललेली आहे) या दोघांची सप्टेंबर 2017 मध्ये फेसबुकवरुन ओळख झाली होती. स्नेहाने पदव्युत्तर वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली, तर विक्रांतला आर्थिक परिस्थितीमुळे वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षानंतर पुढे शिक्षण घेता आले नाही. विक्रांत लक्ष्मीनगर परिसरात राहणारा, तर स्नेहा सिंहगड रस्ता परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणारी. स्नेहाचे वडील उद्योजक असल्याने तिची आर्थिक परिस्थिती मजबुत होती. फेसबुकवरील ओळखीनंतर हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर प्रत्यक्षात गाठीभेटी आणि त्यानंतर एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. विक्रांतची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने त्यास परिस्थिती बदलण्यास सांगितले. त्यानुसार, त्याने "इव्हेंट मॅनेजमेंट' प्रमाणे वेगवेगळ्या स्वरुपाचे व्यवसाय केले. रात्रंदिवस कांबाडकष्ट करुन पै-पै जमा केली. त्यातुनच त्याने दोन सदनिकाही खरेदी केल्या. दोन पैसे हातचे राखुनही ठेवले. दरम्यान, 29 नोव्हेंबर 2017 रोजी तो तिच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला. मात्र तिच्या कुटुंबाने घराचा लोखंडी दरवाजातुनच त्याच्याशी संवाद साधत सध्या तिचे लग्न करायचे नाही, असे सांगून माघारी पाठविले. 

दरम्यान, इकडे स्नेहाच्या आई-वडीलांनी तिच्यासाठी वर संशोधन सुरू केले. त्यामुळे घाबरलेल्या स्नेहाने हा प्रकार विक्रांतला सांगितला. मग ठरले, पळुन जावून लग्न करायचे. दिनांक 16 फेब्रुवारी 2018 या दिवशी ते दोघे आळंदीला लग्न करण्यासाठी गेले, विक्रांतचे मित्र त्याच्यासमवेत होते. दोघेही वधु-वराचा पोषाख परिधान करुन लग्नाच्या विधीसाठी बसणार तोपर्यंत स्नेहाचे नातेवाई तिथे आले, त्यांची कुणकुण लागल्याने दोघेही तेथून पळून गेले. दरम्यान, स्नेहाच्या नातेवाईकांनी विक्रांतच्या मित्रास जबर मारहाण करीत त्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन धमकी दिली. दरम्यान, हा प्रकार पोलिस ठाण्यात गेला, त्यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दबाव टाकून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. दोघांचे लग्न लावून देण्याच्या तडजोडीनंतर स्नेहाला तिच्या कुटुंबीयांनी घरी नेले. त्यानंतर मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. याऊलट तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांसमोर तिचा खोटा जबाब लिहून घेतला. पुढे दोन महिने त्यांचा संपर्क झाला नाही. तिच्या कुटुंबीयांनी हळूहळू तिचा मोबाईल घेतला, तिचे बाहेर फिरणे बंद केले. तिला तिच्या खोलीतच बंदीस्त ठेवले. बाहेरच्या जगाशी तिचा संपर्क कायमचा बंद केला. त्यामुळे कंटाळुन तिने सात ते आठ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. आता तिचे कुटुंबीय तिला भुतबाधा झाल्याचे सांगून अंगारेधुपारे करीत, भोंदुबाबांकडे नेऊन तिला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रयत्न करतायेत. 

जिच्यासमवेत आयुष्य काढण्याचा विचार केला, तिचा चेहराही दिसेनासा झाल्याने इकडे विक्रांत अक्षरशः वेडापीसा झाला आहे. अनेकांना मध्यस्थी घालून तिच्या कुटुंबाशी बोलण्याचा, तिने किमान आत्महत्या करु नये, यासाठी तो प्रयत्न करतोय. विक्रांत दररोज तो तिच्या घराबाहेर थांबुन एकदा तरी तिचा चेहरा दिसेल, या वेड्या आशेने थांबतोय. रोज रात्री काही सांकेतिक चिन्हांद्वारे ते एकमेकांना पाहण्याचा प्रयत्न करतायेत. विक्रांत एक-एक दिवस मोजतोय, "आम्हाला लग्न करायचेय, एकमेकांसोबत राहायचेय. पण ते शक्‍य नाही. आता ती मला जगवतेय आणि मी तिला जगवतोय' असे सांगताना विक्रांतचा अश्रूंचा बांध फुटतोय. 

पुण्यासारख्या पुरोगामी शहरामध्ये जाती-धर्माच्या भिंतींमुळे दोन जीवांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न होतोय. या सगळ्या प्रकारामुळे कोणीतरी आपले आयुष्य कायमचे संपविणार आहे. इथल्या जाती-धर्माच्या व्यवस्थेपुढे दोन जीवांचा बळी गेला, तरी कोण जाब विचारणार. यापुर्वी ज्यांचे जीव गेले, तेव्हा कोणी काय बिघडविले, ते आता बिघडवतील. याच पद्धतीने भविष्यातही जाती-धर्माच्या भिंतींना टकरा देत अनेकांचे जीव जाणार आहेत, आपण मात्र सोशल मिडीयावर बड्या-बड्या गप्पा मारीत राहणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com