मिरवणूक मार्गावर फ्लेक्‍सबाजी

मिरवणूक मार्गावर फ्लेक्‍सबाजी

पुणे - विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’च्या वापराबाबत ठाम राहिलेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचा सल्ला देणाऱ्या पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समर्थकांनी मात्र, बेकायदा फ्लेक्‍सबाजी करीत मिरवणूक मार्ग ‘विद्रुप’ केले. मंडळांसह भाविकांचे स्वागत करण्याच्या नावाखाली राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी यथेच्छ शक्तिप्रदर्शन केले. रस्ते आणि चौकात जागोजागी भलेमोठे फलक उभारल्याचे दिसून आले. या स्पर्धेत भाजपचे पदाधिकारीच ‘आघाडी’वर असल्याचे टिळक चौकात (अलका टॉकीज) येथील परिस्थितीवरून आढळून आले. 

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहिरातदारांना धाक दाखवून चौकांसोबतच कायदेशीर ‘होर्डिंग’वरही अतिक्रमण केल्याची तक्रार आहे. 

आपल्या प्रभागातील जाहिरातदारांना न जुमानता या मंडळींनी फलक लावल्याचे उघड झाले आहे. त्यात, चमकोगिरी करणाऱ्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणुकांच्या तोंडावर आपल्या राजकीय ‘गॉड फादर’सह मिरविण्याची संधी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी फलकांच्या माध्यमातून साधली. विशेष म्हणजे, बेकायदा मांडव आणि कमानी उभारणाऱ्या मंडळांवर कायद्याचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेने डोळेझाक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाजी रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, डेक्कन आदी परिसरात फलकबाजी होती. 

बेकायदा फलकबाजीवरून न्यायालयाने महापालिकेला अनेकदा फटकारलेही आहे. तेव्हा तोंडदेखलेपणा करीत कारवाईही केली जाते. मात्र, गणेशोत्सवात शहरभर फलकबाजी करणाऱ्या राजकीय पक्षांना रोखण्याचे धाडस प्रशासनाने दाखविलेले नाही. त्यामुळेच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसह स्वत:ची छबी असलेले फलक लावले आहेत. या फलकांना परवानगी आहे का, या प्रश्‍नावर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभाग आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी बोलायलाही तयार नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com