इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापुरातील सुमारे चार किमी रस्त्याचेे भूमिपूजन

इंदापूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मौजे बेडशिंग ते भाटनिमगाव या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या तसेच एक कोटी 65 लाख 28 हजार रूपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती 
प्रविण माने, मंगलसिद्धी दुधप्रकल्पाचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र तांबिले, पंचायत समितीचे सदस्य सतिश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी भरणे, जगदाळे आणि माने यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. भरणे म्हणाले, 19 वर्षे मंत्रिपदावर असताना बेडशिंग भाटनिमगाव, बावडा भांडगाव, बावडा ते पिंपरी व पिंपरी ते नरसिंहपूर रस्ता होणे गरजेचे होते. मात्र, हा रस्ता झाला नाही. निवडणूक आली की खांद्यावर थाप टाकायची, तुझ्याकडे चहा पिण्यास किंवा जेवणास येतो, असे सांगून मतदारांची दिशाभूल करायचे राजकारण 19 वर्षे मंत्रिमंडळात मंत्री राहिलेल्या लोकप्रतिनिधींनी केले.

2014 पूर्वी या परिसराची अत्यंत बिकट अवस्था होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या परिसराचा विकास होत आहे. याची सर्वांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. बावडा ते नरसिंहपूर हा सुमारे 50 कोटी रूपयांचा रस्ता मुख्यमंत्री मंदिर पॅकेजमध्ये नाही. तो आम्ही सर्वांनी पाठपुरावा करून त्याची मंजूरी आणली आहे. निधी मंजूर करताना आम्ही कुठलाही दुजाभाव करत नाही. आम्ही जातीपातीचे विष पेरायचे राजकारण करत नाहीतर सेवक म्हणून काम करतो. आम्ही फसवणुकीचे राजकारण करत नाही. तर सर्वसामान्यांचे विकासकारण करतो. मात्र, आम्ही मार्केटिंगमध्ये कमी पडतो. तर ते मार्केटिंगमध्ये पुढे असतात. त्यामुळे त्यांचे नारळ वाढतात, अशी उपरोधिक टीका भरणे यांनी केली.

आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच त्यानंतर आमदारकी येण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीला साथ दिल्याने या परिसराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी दिला. रस्त्याचे काम करताना पाईपलाईनसाठी पाईप गाडणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्याची खराबी होणार नाही. सोनाई कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची सोय झाली. त्यामुळे यंदाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार असल्याची 
ग्वाही जगदाळे यांनी दिली.

प्रविण माने म्हणाले, 19 वर्षांपासून तुम्ही विकासाच्या गप्पा ऐकत होता. मात्र, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या परिसराचा विकास सुरू झाला. त्यामुळे जनतेने बोलघेवडी माणसे कुठे होती, याचा विचार करणे गरजेचे आहे. वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव मंजुरीचा अधिकार पंचायत समितीस आहे. मात्र, आपण आपले प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिल्यास त्याचा योग्य पाठपुरावा केला जाईल. यावेळी अॅड. राजेंद्र तांबिले यांनी गावपातळीवरील कुरबुरी कमी करून पक्षाच्या मागे सर्वांनी ठामपणे उभे रहावे असे आवाहन केले.

सरपंच गणेश पोळ, पंजाब गायकवाड, मनोहर भोसले तर सूत्रसंचलन सुधाकर गवळी यांनी केले. यावेळी काकासाहेब खबाले, अण्णासाहेब साळुंखे, वसंत मोरे, दिलीप बन, सुभाष गायकवाड, महादेव खबाले, मोहन खबाले, नानासाहेब गवळी, स्मिता शिंदे, स्नेहल सूर्यवंशी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com