वाहतूक कोंडीत अडकलेल्या नवरदेवांना दुचाकीचा 'आधार'

वाहतूक कोंडीत अडकलेल्या नवरदेवांना दुचाकीचा 'आधार'

मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खेड घाटात रविवारी (ता.३०) पहाटे तीनपासून वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. रस्त्यात दोन कंटेनर बंद पडले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. दोन नवरदेवही वाहतूक कोंडीत अडकल्याने वऱ्हाडी मंडळी काळजीत पडलीत होती. खेड घाटाच्या बाह्य वळणाचा प्रश्न सलग तीन वर्षापासून रेंगाळल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याची तक्रार संतप्त वाहनचालकांनी यावेळी केली. 

लग्नसराईचा हंगाम, आज लग्नाची मोठी तिथ व डिसेंबर अखेर असल्यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. खेड घाटाच्या दक्षिण व उत्तर बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महिला, लहान मुले, ज्येष्ठ व वऱ्हाडी मंडळीचे अतोनात हाल झाले. संगमनेर, नारायणगाव भागातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन नवरदेवाना वाहतूक कोंडीचा फटका बसला. साखरपुडा व टिळ्याचा मुहूर्त टळू लागल्याने वऱ्हाडी मंडळी काळजीत पडली होती. अखेर मोटारसायकलवरून बसून त्यांना राजगुरुनगरकडे मार्गस्थ करण्यात आले. राजगुरुनगरवरून मंचरला व मंचरवरून राजगुरुनगरला जाणारी वाहतूक पारगाव तर्फे खेड वाफगाव मार्गे वळविण्यात आली होती. सकाळी ११ वाजता बंद पडलेला एक कंटेनर बाजूला करण्यात पोलिसांना यश आले. दुसरा कंटेनर हलविण्याचे काम चालू होते. 

लग्नसराईचा हंगाम सुरु झाल्यामुळे चाकण, राजगुरुनगर खेड घाट व मंचर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खेड घाट राजगुरुनगर व मंचर येथील बाह्य वळणाची कामे अजून ठप्पच आहेत. दरवर्षी बाह्यवळणाची कामे पूर्ण होतील, अशी घोषणा केली जाते. पण कृती मात्र शून्य असल्याने या भागातील जनतेचा रोष वाढत चालला आहे. बाह्य वळणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित बाह्य वळणाची कामे सुरु करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com