आजपासून पुण्यात 'खेलो इंडिया'

khelo-inida-logo.jpg
khelo-inida-logo.jpg

पुणे : "खेलेगा भारत, तो खिलेगा भारत' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी तमाम भारतीयांना साद घातली आणि पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेच्या माध्यमातून शालेय स्तरावरील भारतीय क्रीडा क्षेत्र ढवळून निघाले. आता याच "खेलो इंडिया'च्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धेवरील पडदा आज बुधवारी (ता. 9) उलगडणार आहे. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा रंगणार आहे. 

क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंबरोबर ज्येष्ठ ऑलिंपिक खेळाडूंनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 

हॉकी आणि जिम्नॅस्टिक स्पर्धा प्रकारांना यापूर्वीच सुरवात झाल्याने क्रीडा नगरी शालेय खेळाडूंच्या उपस्थितीने फुलून गेली आहे. स्पर्धेचा उद्‌घाटन सोहळा अभूतपूर्व असा राहील, असे संयोजकांनी म्हटले आहे. खेळाडूंचे शानदार संचलन, क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन, स्पर्धेच्या बोनचिन्हाचे अनावरण असे कार्यक्रम या सोहळ्यात होणार असले, तरी महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे सादरीकरण दोन तासांच्या उद्‌घाटन सोहळ्याचे आकर्षण राहणार आहे. 

अशी होईल स्पर्धा 
29 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 12, 500 जणांचा सहभाग 
- 17 आणि 21 वर्षांखालील 6,200 खेळाडू 
- एकूण 1,800 तांत्रिक अधिकारी 
- सुमारे सातशेहून अधिक स्वयंसेवक 
- स्पर्धेच्या सुरक्षितेसाठी पाचशे पोलिस दोन शिफ्टमध्ये तैनात (प्रत्येकी 250) 
- खेळाडू आणि संघांसाठी विविध 75 हॉटेल्स आरक्षित 
- "साई'चे क्रीडा अधिकारी आणि संयोजकंचा मुक्काम संकुलातील हॉस्टेलमध्ये 

ससून हॉस्पिटलचे योगदान 
खेळाडूंच्या आरोग्याची काळजी आणि तातडीच्या सेवेसाठी ससून हॉस्पिटलचे मोठे योगदान राहणार आहे. त्यांचे 35 डॉक्‍टर, 30 नर्स, 25 तांत्रिक अधिकारी आणि 5 फिजियोचे पथक क्रीडा संकुलात तैनात असेल. यासाठी खास 10 बेडचे "आयसीयू' युनिटदेखील सज्ज ठेवण्यात आले आहे. उत्तेजक चाचणीसाठी ससून हॉस्पिटलचेच 11 डॉक्‍टर, 25 तांत्रिक अधिकारी 16 नर्स स्वतंत्रपणे काम पाहतील. संकुलातील विविध स्पर्धा प्रकार केंद्रांवर 17 उत्तेजक विरोधी पथके काम पाहणार आहे. 

पुण्याच्या अवंतिका नराळेवर राहणार लक्ष 
कुमार स्तरावर 200 मीटर शर्यतीत द्युती चंदचा विक्रम मोडणारी पुण्याची "स्प्रीटंर' अवंतिका नराळे यंदाच्या खेलो इंडिया शालेय स्पर्धेत ट्रॅकवरची राणी ठरणार असाच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

घरच्या मैदानावर धावताना अवंतिकाचा आत्मविश्‍वास अधिक बळावला आहे. तिला आपल्या घरच्या ट्रॅकवर आपलाच विक्रम मोडायचा आहे. तशी इच्छादेखील तिने बोलून दाखवली. अवंतिका म्हणाली, "मला या स्पर्धेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. कुमार गटातील राष्ट्रीय विक्रम पुढे काही वर्षे माझ्या नावावर राहील इतकी कामगिरी मला उंचवायची आहे. माझे प्रशिक्षक संजय पाटणकर आणि सुधाकर मेमाने यांनीदेखील हे उद्दिष्ट माझ्या डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केले आहेत आणि यात मी यशस्वी होईन असा मला विश्‍वास आहे.'' 

कौटुंबिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे आपल्या कुटुंबासाठी अवंतिकाला काही तरी करून दाखवायचे आहे. तिचे वडील संतोष नराळे हे "प्लंबिंग'ची कामे करतात. ती म्हणाली,"माझ्या कुटुंबाला या हलाखीच्या परिस्थितीतून मला बाहेर काढायचे आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकले नसते. त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी मोलाचे आहेत.'' 

लोणकर प्रशालेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अवंतिकाला तिच्या शाळेकडूनही मोठे प्रोत्साहन मिळाले. कबड्डी खेळणाऱ्या मला धावपटू बनवण्यात शाळेचाच वाटा असल्याचे सांगून अवंतिका म्हणाली,"शाळेतील सर शिवाजी म्हेत्रे मला कबड्डी खेळताना पाहायचे. एक दिवस त्यांनी मला शाळेसाठी धावण्यास तयार केले. पहिल्याच शर्यतीत मी बुटाशिवाय धावले आणि सुवर्णपदक जिंकले. तेव्हापासून मग माझा ट्रॅकवरचा प्रवास सुरू झाला. माझी प्रगती लक्षात घेता शाळेने देखील माझ्या शाळेतील उपस्थितीवर बंधने आणली नाहीत. त्यामुळे खेळाबरोबर मी शिक्षणही पूर्ण करू शकले.'' 

घरच्या ट्रॅकवर धावताना मला कुटुंबाला आणि माझ्या गुणवत्तेवर विश्‍वास दाखविणाऱ्या प्रत्येकास अशी सुवर्ण भेट द्यायची आहे की जी कायम लक्षात राहिल. 
अवंतिका नराळे 

वेगवान अवंतिका 
-2018 पहिल्या "खेलो इंडिया' स्पर्धेतील वेगवान धावपटू 
-2018 मध्येच रांची येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कुमार गटात दोन सुवर्ण 
-100 मीटर शर्यतीत 12.38 सेकंद, तर 16 वर्षांखालील गटात द्युतीचा विक्रम मोडताना 24.96 सेकंद वेळ 
-राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धा पुन्हा दोन सुवर्ण, 100 मीटरमध्ये 12.08 सेकंद आणि आपलाच विक्रम मोडताना 200 मीटरमध्ये 24.60 सेकंद अशी सरस वेळ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com