कोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच 

कोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच 

पुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार परिषदेत झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दंगलीतील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे शहर पोलिसांनी गुरुवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मणकेंद्रित अजेंडाच्या विरोधात दलित समाजात असलेल्या असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे माओवादी संघटनेने एल्गार परिषद आणि अटकेतील संशयितांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गोंधळ घडवून आणला, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यात वरील बाब नमूद करण्यात आली आहे. 

अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, ऍड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दीपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात पाच हजार 160 पानी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. त्यात 80 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. 

"कोरेगाव -भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियान' या आघाडीने आयोजित केलेल्या एल्गार परिषदेचा मुख्य उद्देश माओवादी संघटनेच्या (सीपीआय) ईरटर्न रिजनन ब्यूरो (ईआरबी) या समितीच्या बैठकीत ठरलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्याचा होता. या कटाच्या अनुषंगाने कोरेगाव-भीमा येथील कार्यक्रमाच्या संदर्भात सुधीर ढवळे यांच्याशी कॉ. मंगलू व कॉ. दीपू हे दोन महिन्यांपासून समन्वय साधून राज्यभरातील दलित संघटनांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

या प्रकरणातील पाच आरोपींना सहा जून रोजी अटक करण्यात आली होती. या आरोपींनी भूमिगत असलेल्या माओवादी नेत्यांशी संपर्कात राहून एल्गार परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेच्या अनुषंगाने कोरेगाव-भीमा शौर्य प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तेथे झालेल्या हिंसाचाराची दाहकता वाढली, असे डॉ. पवार यांनी सांगितले. 

आरोपींची गुन्ह्यातील भूमिका  
रोना विल्सन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात पुरावे सापडले. सीपीआय (एम) या संघटनेचा ईस्टन ब्यूरो रिजनल सेक्रेटरी किशनदा ऊर्फ प्रशांत बोस याच्यासोबत ईमेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले. बंदी घातलेल्या संघटनेला दारूगोळा आणि शस्त्रसाठा पुरवण्यात मुख्य भूमिका. 

ऍड. सुरेंद्र गडलिंग - सीपीआय संघटनेशी संबंधित विविध कृत्यात सहभाग, नक्षलवादी कारवायांसाठी निधीची तरतूद, भूमिगत नेत्यांच्या संपर्कात राहून शहरी नक्षलवादी कारवायांची अंमलबजावणी. 

प्रा. शोमा सेन - सीपीआयद्वारे बेकायदा कृत्य सुरू ठेवले. संदेशांची देवाणघेवाण, बैठकांचे आयोजन यात महत्त्वाची भूमिका. अनुराधा गंडी मेमोरियल ट्रस्टमार्फत गुप्तपणे बेकायदा कारवाया. 

महेश राऊत - सीपीआय संघटनेत नवीन तरुणांची भरती करणे, आर्थिक निधी उभारणे, पैशांची देवाण-घेवाण, भरती केलेल्या सदस्यांचे दुर्गम भागात प्रशिक्षण. 

सुधीर ढवळे - एल्गार परिषदेच्या आयोजनात प्रमुख भूमिका, परिषदेच्या आयोजनाकरिता निधीची उपलब्धता, माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com