अवघ्या नऊ तासांत माहीची सुटका

अवघ्या नऊ तासांत माहीची सुटका

पिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

माही अवध जैन (वय १२, रा. क्विन्सटाऊन सोसायटी, चिंचवड) हिचे गुरुवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास चिंचवड येथून अपहरण झाले होते. या प्रकरणी नितीन सत्यवान गजरमल (वय २५, रा. थेरगाव, मूळगाव देवगाव, जि. उस्मानाबाद) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (वय २१, रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव, मूळगाव उस्मानाबाद) यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, ‘‘गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास माही स्कूलबसमधून उतरली. सोसायटीच्या प्रवेशद्वारवर दप्तर ठेवून ती शेजारील दुकानात पेन घेण्यासाठी जात होती. 

त्या वेळी दोघांनी तिला मोटारीतून पळवून नेले. माहीने आरडाओरडा केल्यानंतर संबंधित दुकानदाराने दुचाकीवर मोटारीचा पाठलाग केला. मात्र, थोड्या अंतरावर गेल्यानंतर मोटार दिसेनाशी झाली. दुकानदाराने माहीच्या वडिलांना सांगितले. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर तपासचक्रे वेगाने फिरली. काही मिनिटांतच पोलिस पथके रवाना झाली. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मुख्य चौकीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका मेडिकल स्टोअर्सच्या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये संशयित मोटार आढळली. शहरातील लॉजही तपासण्यात आले. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी माहीच्या वडिलांशी फोनवर संपर्क साधून ५० लाखांची खंडणी मागितली. त्याआधारे पोलिसांनी माहीला डांबून ठेवलेल्या ठिकाणाचा शोध घेतला आणि मध्यरात्री एकच्या सुमारास नेरे येथील एक्‍झरबिया सोसायटीत छापा टाकला ए-६ इमारतीतील ६१० क्रमांकाच्या सदनिकेतून दोघांना ताब्यात घेऊन माहीची सुटका केली.’’ 

ही कामगिरी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक प्रभाकर शिंदे, सुधीर अस्पत, उत्तम तांगडे, सुधाकर काटे, श्रीराम पौळ, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, अजय भोसले, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, संतोष बर्गे, किरण लांडगे, प्रमोद वेताळ, राजू जाधव, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, किरण काटकर, किरण खेडकर, सागर शेडगे, निशिकांत काळे, विक्रांत गायकवाड, सचिन उगले, अमित गायकवाड, गणेश सावंत, नितीन खेसे, गणेश कोकणे, स्वप्नील शिंदे, प्रवीण पाटील, सुधीर डोळस यांनी केली.

झटपट श्रीमंतीसाठी...
औंध येथील एका मॉलमध्ये जितेंद्र बंजारा कुक होता व नितीन गजरमल हा ऑनलाइन अन्नपदार्थ वितरित करणाऱ्या कंपनीत डिलिव्हरी बॉय होता. झटपट पैसे कमवून हॉटेल सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी श्रीमंत घरातील मुलाचे अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सोसायट्यांची रेकी सुरू केली होती. पळून जाण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करून ४० हजार रुपयांत जुनी मोटार खरेदी केली होती. एक्‍झरबिया सोसायटीतील सदनिकाही सहा हजार रुपये मासिक भाडेतत्त्वावर ऑनलाइनच घेतली होती. क्वीन्स टाऊन सोसायटीवर गेल्या आठ दिवसांपासून पाळत ठेवली होती. माहीचे अपहरण केल्यानंतर त्यांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र, इतके पैसे देणे शक्‍य नसल्याचे माहीच्या वडिलांनी सांगितले. शेवटी सात लाख रुपये खंडणी घेऊन माहीला सोडण्यास ते तयार झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com