पुणे - कौटुंबिक वादातून पतीने डोक्यामध्ये लोखंडी वस्तूने घाव घातल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना विश्रांतवाडी येथे घडली.
रमाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35, रा. भीमनगर, विश्रांतवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचा पती ज्ञानेश्वर आबा गायकवाड (वय 40) यास हडपसर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड कुटुंब विश्रांतवाडीतील भीमनगर वसाहतीमध्ये राहते. पती-पत्नीमध्ये शुक्रवारी (ता.19) रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातूनच पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा घाव घातला. त्यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच शनिवारी (ता.20) मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, विश्रांतवाडी पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. पती-पत्नीमधील भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
|