'मॉन्सून ट्रिप' प्लॅन करताय? मग जरा थांबा 

monsoon trip
monsoon trip

पुणे : मॉन्सून 'फुल्ल ऍक्‍टिव्ह' आहे. मस्त पाऊस पडतोय. आपल्या बाईक किंवा कारची पेट्रोलची टाकी 'फुल' करायची आणि 'स्टार्टर' मारून या 'वीक एंड'ला पावसात भिजण्यासाठी जवळपासच्या घाटमाथ्यावर जाण्याचा 'प्लॅन' करताय? पण, तो जरा 'होल्ड'वर ठेवा... कारण, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे घाटमाथ्यावरील दरड पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय. 

पाऊस पडतोय म्हटलं की, आपण पुणेकर पहिल्यांदा आपल्या गाड्या वळतो तो सिंहगडाकडे. मस्त ढगात हरविलेल्या सिंहगडावरील गरम-गरम भजी, पिठलं-भाकरी याची मजा गेल्या काही 'वीक एंड'मध्ये आपण घेतली. आता मॉन्सून ऐन बहरात आहे. पावसाच्या एकामागून एक सरी कोसळत आहेत. या पडत्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी 'वीक एंड'ला आपण आपल्या जवळच्या लोणावळा, खंडाळा, माथेरान, माळशेज, ताम्हिणी येथे जाण्याचा 'प्लॅन' बहुतांश जण करतात. या रविवारी (ता. 14) क्रिकेटच्या 'वल्डकप'ची 'फायनल' आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री जाऊन शनिवारी परत आपल्या घरी येण्याच्या दृष्टीने 'प्लॅनिंग' सुरू झाले असेल. पण, या दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या दरड कोसळण्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे तुमचा हा 'प्लॅन' थोडा 'होल्ड'वर ठेवा. 

घाटमाथ्यांवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावसाच्या मुसळधार सरी एकामागे एक पडत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे खडकांवरील माती वाहून गेलेली असते. त्यामुळे खडकांना पडलेल्या चिरा, फटींमधून पाणी आत शिरते. त्यातून खडक हलतात आणि भूस्खलन होते. गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे आता घाटमाथ्यांवर दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

हवामान खात्याबरोबरच "सतर्क' या संस्थेनेही पुणे, सातारा, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळण्याची शक्‍यता व्यक्त केलीय. पुढील तीन दिवसांमध्ये या दरड कोसळण्याच्या घटना या भागात घडू शकतात, असा सतर्कतेचा इशारा या दोन्ही संस्थांनी दिलाय. त्यामुळे किमान या 'वीक एंड'चा 'प्लॅन' रद्द करा. या 'मॉन्सून ट्रीप'च्या 'प्लॅन'साठी पुन्हा काही दिवसांनी प्रयत्न करा, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिलाय. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com