#PMCIssue पादचाऱ्यांचा जीव झाला स्वस्त

कात्रज चौक - पादचारी रस्ता ओलांडत असतानाही वाहने थांबत नसल्याने विद्यार्थी, वृद्ध व महिलांवर धावत-पळत रस्ता ओलांडण्याची वेळ येते.
कात्रज चौक - पादचारी रस्ता ओलांडत असतानाही वाहने थांबत नसल्याने विद्यार्थी, वृद्ध व महिलांवर धावत-पळत रस्ता ओलांडण्याची वेळ येते.

पुणे - हडपसर गाडीतळ चौकातून सोमवारी (ता. ११) तीस वर्षीय आनंद फडतरे रस्ता ओलांडत होते, तेवढ्यात भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यात फडतरे यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या फडतरे यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. कारण ते पायी चालत होते. कधी रस्ता ओलांडताना, तर कधी रस्त्याच्या कडेला थांबलेले असताना भरधाव वाहनांची धडक बसून पादचाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. मागील तीन वर्षांत ३३९ पादचाऱ्यांचा, तर चालू वर्षातील पहिल्याच महिन्यात ४ पादचाऱ्यांचा जीव गेला आहे.

शहरातील बाजारपेठ, प्रमुख रस्ते किंवा अंतर्गत रस्त्यांवर महापालिकेने पदपथ बांधले. मात्र, पदपथाची सोय पादचाऱ्यांसाठी आहे की, पथारी व्यावसायिक, विक्रेते, दुचाकीस्वारांसाठी, असा प्रश्‍न पडतो. पदपथांवर वाहने उभी करणे, पदपथावरच बसथांबा तसेच, महापालिकेसह विविध सरकारी, खासगी कंपन्या, राजकीय व्यक्तींचे फलक लावल्याचे चित्र सर्वत्र दिसते.

याबरोबरच मेट्रो प्रकल्प, नळयोजना, डांबरीकरण, केबल टाकणे, पदपथ दुरुस्ती यांसारखी विकासकामे करताना पदपथ अक्षरशः उखडून टाकले जातात. पौड फाटा ते नळस्टॉप त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे नाइलाजास्तव पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीने व्यापलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालण्याची वेळ येते. त्यातही पुन्हा बेशिस्त वाहनचालकाकंडून बेदरकारपणे वाहने चालवून पादचाऱ्यांचा बळी घेतला जात आहे.

पादचाऱ्यांसाठी महापालिकेने दिलेल्या पादचारी पूल, भुयारी मार्ग या सुविधांची देखभाल दुरुस्तीच होत नाही. वाहतूक पोलिसांकडून रहदारीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी अधिकाधिक प्रयत्न केला जातो. मात्र, वाहनांच्या गर्दीत अडकलेल्या पादचाऱ्याची सुटका करण्यासाठी, त्यांना सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी कुठलेच प्रयत्न होत नाहीत. परिणामी भरधाव वाहनांच्या धडकांमध्ये पादचाऱ्यांना जीव गमवावा लागत आहे.

पादचारी ‘राजा’ फक्त नावालाच ! 
रस्त्यावर पहिल्यांदा चालण्याचा पादचाऱ्यांचा हक्क आहे. तो रस्त्यावरील राजा असल्याबाबतचे फलक वाहतूक पोलिस सगळीकडे लावून वाहनचालकांमध्ये जनजागृती करतात. प्रत्यक्षात पदपथ किंवा सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग, पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल याकडे दुर्लक्ष करून वाहने पुढे दामटली जातात. भरधाव वाहने अंगावर येत असताना नागरिक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला धावत जात असल्याचे चित्र बहुतांश चौकात नजरेस पडते.

पादचारी मृत्यूची कारणे 
  पदपथांवर अतिक्रमणे
  अतिक्रमणांमुळे रस्त्यावर चालावे लागणे 
  अरुंद पदपथ
  भरधाव वाहनांमुळे     अपघात
  उलट्या दिशेने येणारी वाहने 
  विविध विकासकामे

वेगापुढे माणूसही दिसेना  
गर्दीची ठिकाणे, प्रमुख रस्ते, मुख्य चौक, शाळा, बाजारपेठ, चित्रपटगृहे, बस स्थानके, बस स्टॉप अशा ठिकाणी वृद्ध, महिला, पादचाऱ्यांची संख्या जास्त असते. संबंधित ठिकाणांहून वाहने सावकाश चालविण्याबाबतचे फलकही अवतीभोवती लावलेले असतात. मात्र, वाहनचालकांकडून सर्रासपणे दुर्लक्ष करून वाहने भरधाव चालविली जातात. वृद्ध, गरोदर महिला, अंध, अपंग व्यक्ती रस्ता ओलांडत असल्याचेही न पाहता भरधाव वाहने चालविली जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

पादचाऱ्यांचे मृत्यू
वर्ष                       मृत्यू  

२०१६                    १३२
२०१७                    १०६ 
२०१८                    १०१
२०१९ (जानेवारी)     ०४

पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेत पादचारी धोरण, ‘अर्बन स्ट्रीट गाइडलाइन’चे प्रस्ताव मंजूर झाले. त्यातील नियमांची अंमलबजावणीच होत नाही. दर महिन्याला पादचाऱ्यांची बैठक घेण्याचे निश्‍चित केले. मात्र, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची बैठक झालेली नाही.  
- प्रशांत इनामदार, पादचारी प्रथम संस्था 

पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सहकार्य करावे, अशी सूचना पोलिसांना दिली आहे. तुटलेल्या पदपथांची दुरुस्ती, अतिक्रमणे काढणे, झेब्रा पट्टे रंगविण्याचे काम महापालिका करणार आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com