लोकल ट्रॅकचा लवकरच अहवाल

Local-Track
Local-Track

पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या प्रस्तावासाठी पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याने त्यांना हा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम वर्षभरापासून सुरू होते. रेल्वेने या मार्गाची पाहणी करून हा अहवाल तयार केला आहे. दरम्यान, अंतिम अहवाल तयार करताना त्यात काही छोटे-बदल करण्यात आले आहेत. सध्या या मार्गावर असणारे कामशेत रेल्वे स्थानक पुण्याच्या बाजूला हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपनगरी रेल्वे गाड्यांसाठी करण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी काही भागांमध्ये नवीन पूल तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपनगरीय लोकल कॉरिडॉरमध्ये शिवाजीनगर ते लोणावळादरम्यानचा प्रवास डाव्या बाजूने आणि लोणावळा ते शिवाजीनगरपर्यंतचा प्रवास उजव्या बाजूने होणार आहे. उपनगरीय कॉरिडॉरच्या विस्तारासाठी रेल्वेला जमिनीची आवश्‍यकता भासणार आहे. सध्याच्या पुणे ते लोणावळा मार्गालगत राज्य सरकार, संरक्षण विभागाची जागा असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

लोकलचा प्रवास जलद होणार
पुणे ते लोणावळादरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास या मार्गावरील लोकलचा प्रवास जलद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दर वर्षी वाढ होत आहे. उपनगरी कॉरिडॉरचे काम लवकर पूर्ण झाल्यास या मार्गावर पंधरा मिनिटाला लोकल चालविणे प्रशासनाला शक्‍य होणार असून, प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या पुणे ते लोणावळादरम्यान असणाऱ्या लोहमार्गावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचे भारमान वाढले असून, ते १४० टक्‍क्‍यांपर्यंत गेले आहे.

पुणे ते लोणावळादरम्यान तिसरा आणि चौथा लोहमार्ग टाकण्याची चर्चा १९८९ पासून सुरू आहे. सध्या या लोहमार्गावरून मेल, एक्‍स्प्रेस आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला लोकलच्या सेवेत वाढ करता येत नाही. मुंबईमध्ये कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स दरम्यान लोकलसेवेसाठी स्वतंत्र ट्रॅक आहे. त्याप्रमाणे पुणे-लोणावळा मार्गावर प्रस्तावित असणारे हे काम तत्काळ हाती घेऊन प्रशासनाने ते पूर्ण करावे.
- गुलामअली भालदार, अध्यक्ष, चिंचवड प्रवासी संघ

३ कोटी सर्वेक्षणासाठीचा खर्च
एक वर्ष सर्वेक्षण कालावधी
४,८८० कोटी प्रकल्पासाठीची रक्‍कम
पाच वर्षे प्रकल्प पूर्णत्वाचा अवधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com