सोशल मीडियामुळे सापडले आजोबा

Aatmaram-Gumaste
Aatmaram-Gumaste

पिंपरी - सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचा परिणाम होताना दिसतो. सांगवीतील ९२ वर्षीय आजोबा विस्मृतीमुळे हरविले. शोध घेऊनही ते सापडले नाहीत. त्यांच्या नातीने सोशल मीडियावर आजोबांचा फोटो आणि माहिती व्हायरल केली. ती माहिती वाचून आजोबांच्या मुलाच्या मित्राने ते भोसरीत असल्याचे सांगितले आणि तब्बल सतरा तासांनी हरविलेल्या आजोबांचा शोध लागला. सोशल मीडियाच्या वापराचा सुखद धक्‍का गुमास्ते कुटुंबास मिळाला.

आत्माराम गुमास्ते (वय ९२, रा. नवी सांगवी, मूळगाव चाफळ, ता. पाटण, जि. सातारा) असे आजोबांचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ते मेडिकलमधून औषध आणण्यासाठी गेले होते. रात्री साडेदहापर्यंत घरी परत आले नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. परिसरातील सर्व मंदिरांमध्ये शोध घेतला. सर्वत्र पाहिले. अनेकांकडे चौकशी केली. मात्र ते सापडले नाहीत. रात्री बाराच्या सुमारास त्यांनी सांगवी पोलिस ठाणे गाठले. मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. तुम्ही आता शोध घ्या. सकाळपर्यंत मिळाले नाहीत तर अकरा वाजता तक्रार द्यायला या, असा ‘मौलिक’ सल्ला पोलिसांनी दिला. त्यानंतर पहाटे साडेतीनपर्यंत आजोबा सापडले नाहीत. 

गुरुवारी सकाळी आजोबांची नात प्रतीक्षा यांनी सोशल मीडियावर फोटोसह आजोबा हरविल्याची पोस्ट टाकली. ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करण्याची विनंती केली. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली. प्रतीक्षा यांच्या वडिलांच्या मित्रानेही ती पोस्ट पाहिली. ते भोसरी परिसरातून जात असताना त्यांना बेपत्ता असलेले आजोबा दिसले. त्यांनी ही बाब गुमास्ते कुटुंबीयांना सांगितली. गुमास्ते कुटुंबीय भोसरीला गेले. तेथील बसथांब्यावर वाहतूक पोलिस आजोबांची काळजी घेताना दिसून आले. त्यांनी आजोबांना पाणी, चहा आणि बिस्किटे खाण्यास दिली. विस्मृतीमुळे आजोबांना पत्ता आठवत नव्हता. केवळ गजानन महाराजांच्या मंदिरात सोडा, असेच ते पोलिसांना सांगत होते. 

अखेर आजोबांची भेट झाल्यावर गुमास्ते कुटुंबीयांनी मित्राचे तसेच सांभाळ करणाऱ्या पोलिसांचे आभार मानून घरी आले. प्रतीक्षा यांनी पुन्हा आजोबा सापडल्याची पोस्ट टाकून सोशल मीडियावरील मित्रांचे आभार मानले. बेपत्ता झालेले ९२ वर्षीय आत्माराम आजोबा रात्रभर चालत सांगवीतून भोसरीला पोचले. चालताना काही ठिकाणी पडल्याने त्यांना जखमाही झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com