एसटी कामगारांना मिळत नाही वाढ - हनुमंत ताटे

ST-Bus
ST-Bus

पुणे - राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चार वर्षांच्या वेतन करारासाठी जाहीर केलेल्या चार हजार ८४९ कोटी रुपयांचे वाटप योग्य पद्धतीने होत नसून, कामगारांना जाहीर केलेली वेतनवाढ मिळत नाही, असा आरोप महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे सचिव हनुमंत ताटे यांनी केला.

संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि ताटे यांना सोमवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

कर्मचाऱ्यांच्या २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या वेतन कराराबाबत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली होती. मात्र, यामध्येही काही तोडगा निघाला नाही. सध्या हे प्रकरण मुंबईच्या औद्योगिक न्यायाधिकरणाकडे गेले असून, सरकारने न्यायालयामध्ये सादर केलेली निधीची विगतवारी संघटनेस मान्य नाही. या प्रकरणाचा निर्णय सरकारने लवकर घेतला नाही तर, एक फेब्रुवारीला संघटना पुढील निर्णय घेईल, असे शिंदे यांनी सांगितले. 

सरकारने जाहीर केलेल्या करारानुसार निधीचे वाटप करण्यात येत नसल्याने त्याचा फटका सुमारे एक लाख कामगारांच्या कुटुंबाला बसत आहे. राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास, येत्या निवडणुकीमध्ये आम्ही उघड भूमिका घेऊ, असे ताटे यांनी सांगितले.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा
एसटी महामंडळ हे राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम असून, ते सर्वांत मोठे महामंडळ आहे. यामार्फत रोज लाखो प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे या महामंडळाचे  सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com