पुण्यात महिला, बालक आणि जेष्ठांना 'भरोसा कक्षा'चा आधार

3Devendra_Fadnavis_169.jpg
3Devendra_Fadnavis_169.jpg

पुणे  : केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भिती न वाटता भरोसा वाटावा.'',असे काम पोलिस विभागाने करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयुक्तालयाच्या परिसरात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालक यांना एकाच ठिकाणी मदत व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या 'भरोसा' कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू मेमोरिअल सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, जगदिश मुळीक, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम के., पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,  पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे उपस्थित  होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''सध्या शहरीकरणामुळे नागरिकांच्या समस्यांना सामोरे जाताना समुपदेशनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे.  या नव्या समस्यांना सामोरे जाताना पोलिसांनी केवळ तांत्रिक बाबीत न जाता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. समुपदेशनाच्या माध्यमातून नवा सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा.''

''भरोसा कक्षाचे नागपूर शहरात थोड्याच कालावधीत चांगले परिणाम पहावयास मिळाले हाते, त्यात सुधारणा करून पुण्यात भरोसा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याचा पुण्यातही निश्चितच चांगला परिणाम पहावयास मिळेल.'', असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ''अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसींग अधिक सुकर झाले आहे, तसेच या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिसांच्यावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

पोलिस दलाच्या आधुनिकतेबरोबरच पोलिसांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत असून मुंबई खालोखाल पुण्यात पोलिसांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. पुणे शहरात लावण्यात आलेल्या कॅमेराच्या माध्यमातून गुन्हगारीवर नियंत्रण राखत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. मात्र शहरातील हे सीसीटीव्ही कॅमेरे अपग्रेड करून घेण्याची सूचना मुख्यमंत्र फडणवीस यांनी यावेळी केली.  

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,''पोलीस हा मध्यवर्ती घटक धरून सभागृहात चर्चा झालेल्या अनेक योजनांची पुर्तता शासनाने केली आहे. शासनाने पोलिसांच्या निवासस्थानाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. भरोसा कक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला व बालकांचे प्रश्न सोडविण्यास निश्चितच मदत होईल. तसेच कौटुंबिक प्रश्न सोडविण्यासाठीही या कक्षाची मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.''

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर म्हणाले, ''भरोसा कक्ष हा अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे. हा सर्वात चांगला आणि उत्तम उपक्रम आहे. या माध्यमातून समाजातील गरजूपर्यंत मदत पोहोचेल.''

भरोसा' कक्षा उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भरोसा' कक्षाची पाहणी करून कामाची माहिती घेतली. योवळ फडणवीस यांनी या कक्षात आलेल्या तक्रारदाराचे कार्ड स्वत: लिहून त्यांना भरून दिले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “भरोसा” पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक गजानन पवार, तनया सुनिल फुलारी, महेश सप्रे यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आले.    

प्रास्ताविकात पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम के. यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आभार पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी मानले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक उपस्थित होते.

भरोसा सेलची वैशिष्ट्ये

- पिडीत महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे.
- महिला सहायक कक्षांतर्गत पोलीस मदत, महिला हेल्पलाईन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, पिडीत महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा समावेश
- महिलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ मिळेल.
- पिडीत महिलांच्या तक्रारीकरिता २४ X ७ सुरु राहणार असून महिला हेल्पलाईन नंबर १९०१, चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर  १०९० तसेच १०० नंबरवर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून तज्ज्ञांकडे पाठवणार
- पिडीत महिलांना समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था
- विशेष बालपथक सेवेंतर्गत पिडीत बालकांना मानसिक बळ व आधार देणे
- विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे
- पिडीत बालकांना तत्काळ वैद्यकीय सुविधा, मानसोपचार तज्ज्ञ, विधीतज्ज्ञ संरक्षण अधिकारी व पुनर्वसन आदी सेवा पुरविणे
- गुन्हेगारी वातावरणापासून बालकांना दूरू ठेवण्याकरिता योजना राबविणे
-  बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे
- ज्येष्ठ नागरिक कक्षांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारून तात्काळ कार्यवाही करणे
- ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे एनजीओचे सहकार्य घेणे
- ज्येष्ठ नागरिकांना व गैरअर्जदारांना समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com