ज्येष्ठांसाठी ‘सिम्पल एक्‍स्पो’ची सुवर्णसंधी

Symple-Expo
Symple-Expo

पुणे - ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ आणि ‘परांजपे स्कीम्स’च्या वतीने १५ ते १७ मार्चदरम्यान कर्वेनगर येथील पंडित फार्म येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिल्यांदाच ‘सिम्पल एक्‍स्पो’ या खास प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यातून ज्येष्ठांचे जीवनमान उंचावण्याचा हेतू असून, ‘परांजपे अथश्री’ हे या प्रदर्शनाचे प्रायोजक आहे. यात ज्येष्ठांसाठी विविध उपयुक्त स्टॉल्स असतील. तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाच्या दिवशी शुक्रवार (ता. १५) सायंकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांची मुलाखत क्रीडा पत्रकार सुनंदन लेले घेणार आहेत. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठांना या मुलाखतीतून १९८३ च्या स्पर्धेच्या आठवणींना उजाळा मिळेल. त्यानंतर सहा वाजता डॉ. अभिजित आगाशे हे ‘ज्येष्ठांमधील सांधेदुखी’ आणि डॉ. जयश्री तोडकर या लठ्ठपणावर मार्गदर्शन करतील. ज्येष्ठांच्या वाढत्या आरोग्य तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. 

दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १६) दुपारी साडेचार वाजता गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे आणि पोलिस निरीक्षक स्वाती थोरात या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘भरोसा सेल’विषयी माहिती देतील. संध्याकाळी साडेपाच वाजता संजय उपाध्ये यांचा ‘मन करा रे प्रसन्न’ हा कार्यक्रम होईल. ज्येष्ठांना मन प्रसन्न करण्याचा कानमंत्रच यातून मिळेल.

रविवारी (ता. १७) दुपारी साडेचार वाजता राजेश दामले यांचा ‘रणरागिणी टॉक शो’ आहे. यात सियाचिनमधील जवानांना पुरेसा ऑक्‍सिजन मिळण्यासाठी ऑक्‍सिजन जनरेशन प्लॅंट उभारणाऱ्या सुमेधा चिथडे आणि निपाणीमध्ये मुलांसाठी शाळा उभी करणाऱ्या वीरपत्नी अश्‍विनी पाटील यांच्याशी दामले संवाद साधतील. त्यानंतर सहा वाजता ‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’ हा योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांचा कार्यक्रम होईल. प्रदर्शनासह या सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com