टाकवे बुद्रुक - एसटी बस नेहमी बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय

takve-budruk
takve-budruk

टाकवे बुद्रुक - राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस रस्त्यात बंद पडून पुढचा प्रवास प्रवाशांनी पायपीट करीत करायचा असा जणू अलिखित नियमच झाला आहे. दिवस कोणताही असो, एसटी बस कुठे कधी बंद पडेल याचा भरवसाच राहिला नाही. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय आणि त्यानंतर होणारा संताप ऐकायला प्रवासी आणि वाहक चालक यांच्या व्यतिरिक्त तेथे कोणीच नसते.

ऐन सणासुदीच्या दिवसात शहरातून घरी परत जाताना तळेगाव सावळा एसटी टाकवे बुद्रुक बसस्टॉपला बंद पडली. प्रवासी घेण्यासाठी थांबलेली एसटी बस वाहकांनी बेल दिली तरी चालकाला पुढे चालूच होईना. चालकांनी त्याच्या परीने जेवढे प्रयत्न शक्य होते तेवढे केले. पण एसटीचे इंजिन सुरू झाले नाही. शेवटी त्याने एसटी बंद पडलेली माहिती वरिष्ठांच्या कानावर घातली. 

एसटीतून खाली उतरलेले प्रवासी मात्र संतापले होते. त्यामुळे अनेकांनी परिवहन महामंडळाला सणासुदीच्या दिवसात शिव्यांची लाखोली वाहली. काही पुढाऱ्यांनी संताप व्यक्त केला. दिवसभर शाळेत थांबून माघारी निघालेले उपाशीपोटी विद्यार्थी भुकेने व्याकूळलेले होते. 

या सगळ्या प्रकारामुळे सावळा माळेगाव, कुणे, अनुसटे या दुर्गम भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. इतक्या दूर वर खाजगी वाहनांचीही सोय नाही. त्यामुळे यापुढे एकदा जरी बस रस्त्यात बंद पडून प्रवाशांना पायपीट करावी लागली तर तळेगाव आगारप्रमुखांना घेराव टाकून त्यांना जाब विचारू असा इशारा लक्ष्मण ठाकर, काळूराम भोईरकर, माऊली तळावडे, सुभाष पिंगळे यांच्यासह इतर प्रवाशांनी दिला आहे. 

आंदर मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष राजू शिंदे म्हणाले, सकाळच्या पहिल्या सत्रात आलेले विद्यार्थी शाळा सुटल्यावर कधी घरी जातो याची वाट पाहत असतात. त्यात दूधवाले, महिला, पुरूष, नोकरदार यांना वेळेवर जायचे असते परंतु, या सहा महिन्यात रस्त्यावर एसटी बंद पडण्याच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com