‘वैष्णव’ आरोग्यसेवेचे रौप्यमहोत्सवी वर्ष

doctor
doctor

पिंपरी - संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तीन दिवसांनी आषाढी वारीनिमित्त आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुंबईतील वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट गेल्या २५ वर्षांपासून मोफत निष्काम सेवा करीत आहेत. यात विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. केवळ ‘सेवा’ हाच त्यांचा उद्देश आहे.

ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग महाराज घुले यांच्यापासून प्रेरणा घेऊन विजय कासुर्डे यांनी हणमंतराव महागडे व मधुकर पोरे यांच्यापुढे ट्रस्टची संकल्पना मांडली आणि १९९३ मध्ये स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत वैष्णवांची विनामूल्य सेवा सुरू आहे. विविध क्षेत्रातील स्वयंसेवकांसह डॉक्‍टर स्वतःहून या कार्यात सहभागी होत आहेत. केवळ आषाढी वारीच नव्हे तर, नाशिकचा कुंभमेळा, देहूतील गाथा मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर यांसह विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. त्यासाठी विविध औषध निर्माण कंपन्यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे. 

ट्रस्टच्या उपक्रमाबाबत पिंपरी-चिंचवडमधील स्वयंसेवक मुकेश सोमय्या म्हणाले, ‘‘आषाढी वारीनिमित्त देहू, आळंदी आणि सासवड येथून पंढरपूरकडे निघणाऱ्या पालखी सोहळ्यांसोबत आमचे वैद्यकीय पथक असते. प्रत्येक पथकासोबत दोन रुग्णवाहिका असतात. वारकऱ्यांची तपासणी करून औषधोपचार केले जातात. पंढरपूर येथील दर्शनबारीत सलग पाच दिवस रात्रंदिवस पथक कार्यरत असते. आषाढीसह चैत्र, कार्तिकी व माघी यात्रेत पंढरपूरमध्ये मोफत दवाखाना सुरू असतो. सेवेकरी अथवा डॉक्‍टर कोणालाही मानधन दिले जात नाही. वैद्यकीय सेवेचा उपक्रम पूर्णतः लोकवर्गणीतून राबविला जात आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com