खंडणीसाठी व्हायरस; हॅकर्सकडून महिला टार्गेट

खंडणीसाठी व्हायरस; हॅकर्सकडून महिला टार्गेट

पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय उरत नाही... या आणि अशा स्वरूपाचे विविध क्षेत्रांतील महिलांना ई-मेल येत असून, त्याद्वारे सायबर हॅकर्स लाखो रुपयांची ऑनलाइन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत असे नऊ प्रकार घडले आहेत. 

सायबर गुन्हेगारांकडून रॅन्समवेअरसारखे व्हायरस पसरवून नागरिकांचे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटरचा ताबा घेतल्याचे भासविले जाते किंवा प्रत्यक्षात तसे केलेही जाते. त्यानंतर मोबाईलमधील गोपनीय माहितीचा गैरवापर करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली जाते. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या नऊ महिलांना आत्तापर्यंत या स्वरूपाचे हॅकर्सकडून ई-मेल आले आहेत. त्यापैकी दोन-तीन महिलांनीच पोलिसांशी संपर्क साधला आहे. उर्वरित महिलांनी भीतीपोटी पोलिसांकडे जाण्याचे टाळले आहे. 

मुळात काही ऍप, व्हिडिओ डाऊनलोड करताना नकळतपणे त्यावरील अटी-शर्ती स्वीकारतो किंवा न स्वीकारताही त्या लादल्या जातात. त्यामधूनच छुप्या पद्धतीने रॅन्समवेअरसारखे व्हायरस मोबाईल, कॉम्पुटरमध्ये शिरतात. त्यानंतर हॅकर्स त्याचा ताबा घेतात आणि संबंधित व्यक्तीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करतात. 

पोलिस काही बिघडवू शकत नाहीत  
हॅकर्सने एका महिलेला पाठविलेल्या ई-मेलमध्ये बिटकॉइनद्वारे खंडणी मागितली. त्याचवेळी "तू कोणाकडेही गेली, तरी आमच्यापर्यंत कोणी पोचू शकत नाही. तुमचे पोलिस, कायदाही आमचे काहीच बिघडवू शकत नाही,' अशी धमकी एका हॅकरने ई-मेलमध्ये दिली आहे. 

हॅकर्सकडून महिलांना लक्ष्य केले जाते; तशा माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. महिलांनी अनोळखी ई-मेल, व्हॉट्‌सऍप मेसेजला प्रतिसाद न देणे आणि इंटरनेटचा वापर योग्य पद्धतीने करणे, हाच त्यावरील योग्य पर्याय आहे. 
- ऍड. जयश्री नांगरे, सायबर कायदातज्ज्ञ. 

सायबर हॅकर्सकडून शेकडो नागरिकांना एकाच वेळी ई-मेल पाठविला जातो. त्यास काही व्यक्ती प्रतिसाद देतात आणि हॅकर्सच्या जाळ्यात अडकतात. बहुतांश वेळा हे ई-मेल खोटे असतात. नागरिकांनी अशा ई-मेलला घाबरू नये आणि त्यांना प्रतिसादही देऊ नये. 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा 

...अशी घ्या काळजी  
* सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, फोटो देणे टाळावे 
* कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पासकोड वापरावेत 
* सार्वजनिक ठिकाणांवरील वायफाय वापरणे टाळावे 
* अनोळखी ई-मेल, मेसेजला प्रतिसाद देऊ नये 
* मोफत ऍपऐवजी अधिकृत ऍप वापरण्यास प्राधान्य द्यावे 
* मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हाताळताना योग्य ती काळजी घ्यावी 

* रॅन्समवेअर म्हणजे काय ? 
सायबर हॅकर आर्थिक फायदा, आर्थिक गैरव्यवहारासाठी जाणीवपूर्वक व्हायरस प्रोग्रॅम तयार करून तो मोठमोठ्या कंपन्या, बॅंका, सरकारी-खासगी कार्यालये, विविधि प्रकारच्या संस्थांच्या कॉम्प्युटर, एटीएम स्वीचच्या (सर्व्हर) किंवा मोबाईल, लॅपटॉपच्या सायबर सिस्टीम भेदतात. त्याद्वारे ते गोपनीय माहिती नष्ट करण्याची किंवा सर्वांना खुली करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याचे काम करतात. 

* बिटकॉइन म्हणजे काय ? 
ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे आभासी चलन म्हणजे बिटकॉइन. परदेशांमध्ये बिटकॉइनच्या व्यवहारांना मान्यता असून, सर्रासपणे बिटकॉइन खरेदी-विक्री होते. भारतामध्ये बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवून दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचा बहाणा करून नागरिकांची फसवणूक केली जाते. त्याचबरोबर एखाद्यास ब्लॅकमेल करून त्याच्याकडून बिटकॉइनच्या स्वरूपात खंडणी उकळली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com