येरवडा कारागृहात ‘एक्‍सडीआर’ क्षयरुग्ण

Tuberculosis
Tuberculosis

पुणे - ‘एक्‍स्ट्रीम ड्रग रेजिस्टन्स’ (एक्‍सडीआर) क्षयरोग झालेल्या महिलेची खुनाच्या आरोपाखाली येरवडा कारागृहात रवानगी झाली. तिच्यामुळे कारागृहातील इतर महिला कैद्यांना संसर्गाचा होण्याचा धोका असून, तिची काळजी घेण्याचे आव्हानही डॉक्‍टरांसमोर निर्माण झाले आहे. 

ही महिला मूळची सांगली येथील आहे. तिला १५ नोव्हेंबर २०१७ रोजी क्षय झाल्याचे निष्पन्न झाले. ती १९ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात आली. तेव्हापासून तिच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपचार सुरू होते; परंतु व्यवस्थित औषधे न घेतल्याने तिचा क्षय बरा झाला नाही, उलट तो वाढत जाऊन ‘एक्‍स्ट्रीम ड्रग रेजिस्टन्स’ (एक्‍सडीआर) या सर्वांत शेवटच्या टप्प्यावर गेला. ही महिला नियमित गाडीखाना येथील महापालिकेच्या दवाखान्यात येऊन औषधे घेत होती. ती सलग सात-आठ दिवस न आल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी तिचा शोध घेतला. त्या वेळी गेल्या महिन्यात तिला खुनाच्या आरोपात पोलिसांनी अटक केली असून, ती सध्या येरवडा कारागृहात असल्याचे समोर आले. 

‘एक्‍सडीआर’ क्षय असल्याने महिलेसह तिच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी घातक आहे. येरवडा कारागृह हे जिल्हा क्षयरोग विभागाकडे असल्याने त्यांना याबाबत पत्र पाठवून या महिलेबाबत माहिती देण्यात आली, असे महापालिकेच्या सहायक आरोग्यप्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

‘एक्‍सडीआर’ क्षय झालेल्या महिलेची येरवडा कारागृहात जाऊन तपासणी केली आहे. आठवड्यातून दोन दिवस आमचे कर्मचारी तेथे जाऊन तिला तपासतात. सध्या तेथे सर्वसाधारण क्षयाचे ७, ‘एमडीआर’ क्षयाचे २ आणि ‘एक्‍सडीआर’ क्षयाचा एक रुग्ण आहे.
- संजय दराडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी 

‘एक्‍सडीआर’ क्षय झालेल्या महिलेला पूर्वीप्रमाणे उपचार दिले जातील. आमच्या डॉक्‍टरांकडून काळजी घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. 
- यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा कारागृह 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com