आमचा नाद करायचा नाय...

आमचा नाद करायचा नाय...

नारायणगाव - ‘‘मी पत्ता ओपन केल्यास आमदाराची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल. थोडे थांबा, मी अस्त्र बाहेर काढते. आमचा नाद करायचा नाय,’’ असा इशारा  शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके यांनी दिला. नारायणगाव (ता. जुन्नर) येथील सभेत त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्यावर टीका केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणअंतर्गत येथील जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या ५.३७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे २२ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन आढळराव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सरपंच योगेश पाटे होते. त्या वेळी बुचके बोलत होत्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संतोष खैरे, संभाजी तांबे, शरद चौधरी, बाळासाहेब पाटे, गुलाब पारखे, नामदेव खैरे, अर्चना माळवदकर, ज्योती फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे आदी या वेळी उपस्थित होते. 

बुचके म्हणाल्या, ‘‘दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेण्याचे काम तालुक्‍यात सुरू आहे. खोटे आरोप करून खासदारांची बदनामी केली जात आहे. या पुढे खासदारांची बदनामी सहन करणार नाही.’’

खंडागळे म्हणाले, की टोलचा झोल कुणी केला. विकासकामाच्या भूलथापा मारल्या जात आहेत. सोयीचे राजकारण केले जात आहे. खासदारांनी आदिवासी भागाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप केला जात आहे. खासदारांनी पंतप्रधान सडक योजनेतून आदिवासी भागात शंभर कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. आढळराव हे चौथ्यांदा निवडून येतील. 

भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान घोलप यांनी, चाळकवाडी येथील टोल बंद करणाऱ्यांनीच टोल सुरू केला. या मागचा तुमचा उद्देश काय याचे उत्तर द्या, असे आव्हान दिले. 

आढळराव पाटील यांनी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सोनवणे, देवदत्त निकम यांच्यावर टीका केली. 

भीमाशंकर देवस्थानचे अनेक वर्षे अध्यक्ष असताना विकास आरखड्याला निधी आणता आला नाही. भीमाशंकर परिसराच्या विकासासाठी १४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधात खोटा अपप्रचार करत आहेत.
- शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com