सारांश : एका सर्जनशील महायोद्ध्याचा अस्त

Girish Karnad
Girish Karnad

गिरीश, मी यापुढेही तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे... एक सुहृदानं व्यक्त केलेलं मनोगत. 

काही माणसांच्या केवळ असण्यानं बाकी सगळ्यांच्या असण्याला एक स्फुल्लिंग मिळतं. एक कोणीतरी 
पाठीराखा असतो की ज्याची थाप बाकीच्या सगळ्या झाकोळणाऱ्या आवेगांचा प्रतिकार करण्याची शक्ती 
देऊन जाते. माझ्यासाठी गिरीश कार्नाड हा असा एक सज्जड पाठीराखा होता!

त्याच्या थोर साहित्यिक प्रवासाविषयी, "ज्ञानपीठा'ची श्रेष्ठ मोहर लागल्यामुळे, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. भारतीय रंगभूमीच्या चार आधारस्तंभांपैकी गिरीश हा एक महत्त्वाचा खांब! अगदी ययाती-हयवदन-नागमंडल ते अलीकडचे फ्लॉवर्स-बिखरे बिंब-उणे पुरे शहर एक, या सगळ्या नाटकांच्या रंगमंचीय सादरीकरणाला सगळ्यांनी आवर्जून दाद दिली आहे. "संस्कार', "स्वामी', "निशांत'सारख्या सिनेमांत स्वतःचा ठसा उमटवत असतानाच, कुमार सोहोनीच्या "तरंग'मध्ये आणि बासू चटर्जीच्या "अपने पराये'मध्ये त्याने माझ्यासोबत सहकलाकार म्हणून भूमिका केल्या होत्या. संध्याने प्रमुख भूमिकेसाठी गिरीशला डोक्‍यात ठेवून "समांतर'ची संहिता लिहिली होती.

माझा दिग्दर्शकीय अधिकार वापरून ती भूमिका माझ्या 
पदरात पाडून घेतली. नाहीतर त्याच्यासोबत अजून एका सिनेमात काम करायची संधी मिळाली असती. तो बाकी संपूर्ण बावन्नकशी असला, तरी अभिनेता म्हणून मीच उजवा आहे, असे मी त्याच्या समोरही हक्कानं म्हणत असे. असे हक्क असलेल्या माझ्या मोजक्‍या मित्रांपैकी एक आज मी गमावला. 1966 मध्ये धोबी तलावच्या रंगभवनात सत्यदेव दुबेनामक तरुण दिग्दर्शकाने गिरीश कार्नाड नावाच्या तरुण नाटककाराच्या "ययाती' या पहिल्यावहिल्या नाटकाचा प्रयोग हिंदीत सादर केला. 

मी तेव्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये होतो. एक अत्यंत देखणं आणि लाघवी व्यक्तिमत्त्व त्याक्षणीच मनात कोरलं गेलं होतं. त्यानंतरच्या काळात त्याची नाटकं वाचली, सिनेमे बघितले, थोड्या-बहुत गाठीभेटी झाल्या. 1972मध्ये "हयवदन' या त्याच्या नाटकाच्या हिंदी प्रयोगामध्ये दुबेंनी मी, अमरीश पुरी, सुनीला प्रधान आणि दिना पाठक यांना एकत्र आणलं. लोकांनाच नव्हे, तर गिरीशलाही तो प्रयोग आवडला होता. 
"हयवदन'चा मूळ प्रयोग बी. व्ही. कारंथ यांनी कन्नडमध्ये यक्षगण शैलीमध्ये केला होता. नाटकही त्याच शैलीमध्ये 
लिहिलेले असल्यामुळं तो प्रयोग वेगळ्या पद्धतीने संहितेशी प्रामाणिक असा ठरला; परंतु दुबेंनी त्यातला कॉस्च्युम ड्रामा संपूर्णपणे काढूनसुद्धा "देवदत्तचं डोकं कपिलच्या शरीरावर लागणं' हा शारीरिक अनुभव, इतर कोणतीही बाह्य आयुधं/ टेक्‍निक न वापरता, फक्त कलाकारांच्या अभिनयाच्या 
ताकदीवर सादर केला. हा वेगळा दिग्दर्शकीय दृष्टिकोन गिरीशला भावला. त्यानिमित्तानं खूप विषयांवरच्या वेगवेगळ्या चर्चांना सुरवात झाली. मला स्वतःला गिरीशची नाटकं वाचताना दृश्‍यात्मक अनुभव यायचा. नाटकभर पसरलेल्या गोष्टीच्या 
पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पात्रांमधून एखादं क्‍यूबीस्ट चित्रं समोर यायचं. बघण्याचा कोन थोडासा बदलला, की त्यातले अंतर्गत वेगवेगळे पैलू समोर येत राहायचे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेले "हयवदन'चे प्रयोग बघितल्यावर वाटायचं, की आपणही हे आव्हान हाती घ्यावं. कित्येक राहून गेलेल्या गोष्टींमधलं तेही एक! 

"वंदा नंदू काळंदली' (Once upon a Time), चेल्लुवी' आणि "उत्सव' या त्याच्या सिनेमाक्षेत्रातल्या दिग्दर्शकीय वाटचालीला मी भरभरून दाद दिली होती. अगदी त्याच मनःपूर्वक असोशीनं त्याच्या अलीकडच्या न आवडलेल्या कामाबद्दलही आम्ही मोकळेपणानं बोललो होतो. उदाहरणार्थ, त्याच्या आत्मचरित्राचा पहिला भाग आणि बाजारू पद्धतीने केलेली प्रसिद्धी! एकदा अशाच खास जमलेल्या बैठकीत त्याच्या साहित्यातील स्त्री-पात्रांविषयी आणि माझ्या सिनेमांमधल्या स्त्रीधार्जिण्या भूमिकेविषयी वाद उद्भवला. तुझी स्त्री-पात्रं कॅल्क्‍युलेटीव्ह का होती, या माझ्या आक्षेपाच्या अनुषंगाने चर्चा झाली. 

या सगळ्या वैचारिक, साहित्यिक संवादांपेक्षासुद्धा मला जास्त महत्त्वाचा वाटतो त्याचा समकालीन प्रतिगामी आणि सनातनी परिस्थितीविरुद्धचा थेट विद्रोह! फक्त मुलाखतींमधूनच नाही, तर स्वतः उपस्थित राहून तो अनेक निषेध- मोर्चे-सभा यांमध्ये सक्रिय भाग घेत राहिला. असाध्य रोगानं गेली चार वर्षं त्याची 
साथ सोडली नाही; पण त्याची शारीरिक स्थितीही त्याच्या विद्रोहाला अटकाव करू शकली नाही. आजूबाजूला आपमतलबी, संधिसाधू आणि कुंपणावर बसणाऱ्या मंडळींचा सुळसुळाट असताना त्याच्यासारखा ध्रुवतारा दिशा दाखवत राहायचा. 

या सगळ्या पलीकडे त्याचं एक फार मोठं भावनिक ऋण माझ्यावर आहे. मागच्या वर्षाच्या सुरवातीला एक 
दिवस अचानक गिरीशचा फोन आला. अत्यंत सद्गदित स्वरात म्हणाला, "अमोल, तुला आजवर संगीत कला अकादमीचा एकही पुरस्कार मिळाला नाही? हे माझ्याही कसं लक्षात आलं नाही? खरंतर मी गृहीत धरलं होतं की खूप पूर्वीच तुला ते मिळून गेलं असावं. ही मोठी चूक आहे आणि ती सुधारली नाही, तर अकादमीचा सभासद म्हणून मी स्वत:ला माफ करू शकणार नाही. मी या वर्षी फेलोशिपसाठी तुझं नाव सुचविणार आहे.' त्याच्या मनाचा मोठेपणा मी पदोपदी अनुभवला होता, पण तो 
दिवस माझ्या कलेच्या प्रवासातली सर्वात मोठी पोच देऊन गेला. "आता खूप उशीर झाला आहे आणि डावललं जाण्याची मला सवय आहे. त्यामुळे तू नको प्रयत्न करूस! विशेषत: सध्याच्या राजवटीत तर ते अशक्‍य असेल.' हे माझं उत्तर मान्य न करता त्यानं प्रयत्न केले. नऊ-दहा महिन्यांनंतर पुन्हा फोन करून "We failed you...I am so sorry.असं म्हणून दिलगिरी व्यक्त केली. तुझं हे ऋण मी फेडू शकणार नाही, गिरीश! 

गिरीशला शेवटचं भेटलो त्याच्या घरी, बंगळूरमध्ये 25 एप्रिल 2019ला. त्याच्याशी रघूला नुकत्याच मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकाच्या संदर्भात भरभरून गप्पा झाल्या. त्याची शारीरिक शक्ती झपाट्यानं कमी होत आहे, हे त्याला जाणवत होतं. पण मेंदू मात्र पूर्वीइतकाच तल्लख होता. त्याचा निरोप घेताना मनात कुठेतरी वाटून गेलं की ही भेट शेवटची तर नसेल ना? कधीही एखाद्या मुद्द्याविषयी समविचारी लोकांना ई-मेल पाठवून मनातली खदखद व्यक्त केली किंवा समकालीन प्रश्नांवर ऊहापोह केला, तर पहिलं उत्तर यायचं ते गिरीशचं! 2017 मध्ये माझ्या सेन्सॉरशिपच्या लढ्याची सुरवातसुद्धा, उच्च न्यायालयात आमच्या याचिकेला समर्थन देणाऱ्या त्याच्या प्रतिज्ञापत्रानेच झाली होती. 

यापुढेही गिरीश, मी तुला मेल पाठवतच राहीन... अगदी उत्तर येणार नाही हे माहिती असतानासुद्धा... एका सर्जनशील महायोद्‌ध्याचा अंत झाला आहे, हे मान्य करणं यानंतर खूप काळ कठीण जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com