#यूथटॉक : विज्ञान संशोधनाचा अनु'कूल' मार्ग

Research
Research

अलीकडेच दिल्लीतील एका प्रतिष्ठित वैज्ञानिक अनुसंधान संस्थेत रिसर्च इन्स्टिट्यूट पीएच.डी. प्रवेशासाठी माझी मुलाखत झाली होती. त्यात नेहमीचा प्रश्‍न 'तुला या क्षेत्रात संशोधन का करायचेय?' आणि त्याला माझे नेहमीचे, आतापर्यंत तोंडपाठ झालेले उत्तर. मुलाखत छान झाली, पण मन त्या प्रश्‍नाभोवतीच घुटमळत राहिले. एखादी व्यक्ती संशोधन का करते? 

लहान असताना शालेय पाठ्यपुस्तकातली माहिती कुठून येते, हा प्रश्‍न बरेच वेळा पडला होता. सूर्य पृथ्वीपासून अमुक अंतरावर आहे हे कसे, कुणी शोधले? मग ओळख झाली जयंत नारळीकर, मोहन आपटे अशा दिग्गजांच्या विज्ञानलेखनाशी. विज्ञानाचा इतिहास समजून घेताना मानवी बुद्धीचे दोन गुणधर्म प्रकर्षाने जाणवले, ते म्हणजे कुतूहल आणि चिकित्सक वृत्ती! डोळ्यांसमोर असणाऱ्या प्रत्येक नैसर्गिक घटनेला 'का', आणि 'कसे' हे दोन प्रश्‍न विचारत माणसाने आजवर केवळ त्या घटनांचा अर्थच लावला नाही, तर त्यांचा आपल्या भल्यासाठी उपयोगही करून घेतला. एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी वेगवेगळ्या परिकल्पना (हायपोथीसिस) मांडणे आणि प्रत्येक परिकल्पना पद्धतशीर प्रयोग करून तपासून पाहणे, हेच तर असते अनुसंधान किंवा संशोधन. 

एक व्यवसाय म्हणून संशोधन हे इतर व्यवसायापेक्षा फार वेगळे नाही, असे मला वाटते. 'पॉप्युलर कल्चर'मधून शास्त्रज्ञांची जी एक प्रतिमा उभी केली गेली आहे, (गबाळा, विक्षिप्त, कफल्लक, सारखा प्रयोगच करत बसलेला, समाजापासून तुटलेला इत्यादी), ती वास्तवापासून फार दूर जाते. संशोधनसुद्धा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असे करता येतेच की! विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीतून पुरेसा पगारसुद्धा मिळतो. मला माहिती असलेले बहुतेक शास्त्रज्ञ हे अतिशय कुटुंबवत्सल, समाजासोबत मिळून मिसळून असणारे, 'वीकेंड'ला फुलटू पार्टी करून सोमवारी नवाच्या ठोक्‍याला लॅबमध्ये येणारे असे आहेत. थोडासा नादिष्टपणा सोडला, तर अगदी चारचौघांसारखे! 

नैसर्गिक विज्ञानातील दोन ढोबळ गटांत विभागता येऊ शकेल-मूलभूत (प्युअर किंवा बेसिक) आणि उपयोजित (अप्लाइड) संशोधन. 'प्युअर रिसर्च' हा मुख्यतः मानवी कुतूहल आणि जिज्ञासेच्या भावनेतून आकाराला येतो, मग त्याच्या बळावर 'अप्लाइड रिसर्च' करून समाजोपयोगी गोष्टी करता येतात. शेतात वापरल्या जाणाऱ्या सुधारित बी-बियाण्यांपासून ते दवाखान्यातील औषधांपर्यंत प्रत्येक गोष्टीत शुद्ध आणि उपयोजित संशोधनाचे परस्पर प्रमाण विभिन्न आहे. पण एका सच्च्या अभ्यासक संशोधकासाठी दोन्ही प्रकारचे संशोधन सारखेच महत्त्वाचे असते. अडचण तेव्हा येते, जेव्हा पैशाचा प्रश्‍न येतो. 

आजकाल कुठल्याही वैज्ञानिक क्षेत्रात संशोधनासाठी भक्कम आर्थिक पाठबळ आवश्‍यक आहे, जे शुद्ध आणि उपयोजित संशोधनाला सारख्याच प्रमाणात मिळेल असे नाही. तुम्ही दूर अवकाशातील कुठल्याशा ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा अभ्यास करायला पैसे देणार की चंद्रावर सोने शोधण्याच्या प्रकल्पाला? एखाद्या विषयातील संशोधनाचा फायदा समाजाला अगदी लगेच होईल, असे नसतानासुद्धा त्यासाठी फंडिंग मिळवणे आव्हानात्मक असते. त्यामुळे शास्त्रज्ञांना विज्ञानासबरोबरच प्रशासकीय बाबींतही पारंगत असावे लागते. 

आपल्याकडे विद्यार्थी बालवाडीतून बारावीत येईपर्यंत त्यांची चिकित्सक वृत्ती बऱ्यापैकी कमी झालेली असते. बहुसंख्य मुलांना जिथे शालेय शिक्षणच बेताचे मिळते, तिथे पुस्तकापलीकडचे ज्ञान मिळण्याची शक्‍यताच नाही. ज्या मुलांना पुरेसे शालेय शिक्षण मिळते, ते त्यातच पैकीच्या पैकी गुण मिळवण्यात धन्यता मानतात. शिक्षक, पालक हेसुद्धा बऱ्याच वेळा प्रश्‍न विचारणाऱ्या मुलांना गप्प बसवतात. 
सुदैवाने या परिस्थितीत हळूहळू बदल होत आहे.

संशोधनाकडे एक उपजीविकेचे साधन म्हणून बघण्याचे प्रमाण अलीकडे तरुणांमध्ये वाढत आहे. मुले-मुली केवळ विद्यापीठात प्राध्यापक होता यावे म्हणून नव्हे, तर एखाद्या वैज्ञानिक क्षेत्रात उपलब्ध ज्ञानात भर घालता यावी व त्याचा समाजाला उपयोग व्हावा, म्हणून पीएच.डी. करत आहेत. शाश्‍वत पर्यावरणपूरक विकासपद्धती, नाश पावत चाललेल्या प्राणिमात्रांचे संवर्धन, आयुर्वेदासारख्या पुराणग्रंथांतील वैज्ञानिक तत्त्वे असे विषय पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 'कुल' समजले जात आहेत. एमएस्सी-एमटेक/एमबीए नंतर स्वतःचा स्टार्ट-अप व बिझनेस सुरू करणेही आता सामान्य झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्याला आता सरकारसुद्धा उत्तेजन देत आहे. 

येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग पृथ्वीवरील अर्ध्याहून अधिक माणसांचे काम हिरावून घेतील, तेव्हा जे काही मोजके व्यवसाय उरतील, त्यातच एक 'संशोधन' असेल. कारण कितीही प्रगत संगणक असला, तरी त्याला माणसासारखे आपल्या भवतालाबद्दल प्रश्‍न पडत नाहीत. म्हणूनच संशोधन करणे केवळ 'कुल' नाही, अनुकूलसुद्धा आहे! 
(लेखक दिल्लीस्थित विद्यार्थी संशोधक आहे.) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com