कौन बनेगा विरोधी पक्ष?

4partylogo
4partylogo

बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे. 

खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत मोदी -फडणवीसांच्या बलाढ्य सेनेला आव्हान देण्याचे कसब महाराष्ट्रात कोणत्या पक्षात शिल्लक आहे, हा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकसभेच्या निकालांनंतर लगेचच सक्रिय झाले. त्यांच्या पक्षाचा प्रभाव काही विशिष्ट जिल्ह्यात. तो प्रदेश भाजपने लक्ष्य केलेला आहे.

राष्ट्रवादीचे शिलेदार त्यांचे परंपरागत मतदारसंघ राखण्यात गुंततील. त्यांना यश मिळेलही; पण कॉंग्रेसच्या नशिबी ते तरी भाग्य आहे? प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेडच्या बालेकिल्ल्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. या निवडणुकीत सर्वाधिक पडझड झाली ती कॉंग्रेसची. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीचा मतदारसंघ राखता आला नाही. त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारायचे ठरलेच, तर जागा कोण भरून काढेल ते कळत नाही. पक्षाने दुसरी फळी तयारच केलेली नाही. तेथे बदल नाही हे पाहून राज्यात अशोक चव्हाण पुन्हा कामाला लागलेले दिसतात.

बैठकांचा कधी नव्हे एवढा सपाटा सध्या कॉंग्रेसने लावला आहे. राधाकृष्ण विखे हे विरोधी पक्षनेतेच बाहेर पडले आहेत. पूर्वीपासूनच सत्तापक्षाच्या वळचणीला गेले होते असे म्हणतात. पण गेली पाच वर्षे या सत्याकडे डोळेझाक करीत विरोधच सरकारखाती जमा करणाऱ्या पक्षाला भवितव्य काय? कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या मतदारसंघात पक्ष पिछाडीवर तर गेला आहेच; शिवाय या पक्षाचे नवे कार्यकर्ते आणि नवे मतदार खेचण्याची क्षमताच सध्या संपल्यागत झाली आहे. त्यामुळे विरोधी बाकांवरील कॉंग्रेसचे बडे आमदारही भाजपप्रवेशाचा विचार करत असल्याची चर्चा आहे.

बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होतील. पक्षाला सोनेरी दिवस आले असतील, तर कार्यकर्त्यांनाच संधी देणे उचित ठरेल. त्यामुळे इनकमिंग बंद करावे, अशी मागणी पुढे येते आहे. भाजपनेतृत्व या मागणीची कशी दखल घेणार हे लक्षात न आल्याने कॉंग्रेसचे आमदार सध्या शांत आहेत, पण ते विंगेत आहेत. संपूर्ण देशावर एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणाऱ्या या पक्षाचे दिवस फिरले आहेत. भाजपनेही असाच वनवास कित्येक वर्षे सोसला. पण त्या पक्षाची संघटना मजबूत होती. कॉंग्रेस हा सत्तेभोवती विणला गेलेला पक्ष, त्यामुळे मतदार कमी झाली नसले तरी नेते खचले आहेत. सामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्वगुणांना येथे संधी नाही, असे चित्र निर्माण झाल्याने नव्याने उदयाला आलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे आशेने पाहिले जाते आहे. या वंचितांमुळे कॉंग्रेसचे आठ लोकसभा मतदारसंघात नुकसान झाले. या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोशल इंजिनिअरींगच्या राजकारणाचे मोठे खेळाडू. कित्येक वर्षांनी ते राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष होण्याची संधी तयार झाली आहे.

लोकसभेत सलग दुसऱ्यांदा कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस मोठी मागणी करेल अन्‌ दोघांनीही युतीला थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला आपल्यात आणायचे ठरवले तर ते मोठी किंमत मागतील. विरोधी राजकारणाची कोंडी झाली आहे. आंबेडकरांनी राज्यातील 77 विधानसभा मतदारसंघांची रणनीती तयार केली आहे. गोपीचंद पाडळसरांसारख्या आक्रमक धनगर नेत्याला; तसेच आदिवासींना जवळ केले जाते आहे. हे राजकारण कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेससमोरचे आव्हान आहे. विरोधी जागा व्यापण्याचा प्रयत्न पाच वर्षांपूर्वी शिवसेनेने केला, तो संपला.

आमदार, कार्यकर्ते सत्ताशरण झाले. विरोधी पक्षाचा महाराष्ट्रातला अवकाश सध्या तरी खुला आहे. तो व्यापण्यासाठी राज ठाकरे "मनसे' प्रयत्न करतील अन वंचित प्रस्थापितांना धक्‍के देत समोर येऊ शकतील. संसदीय लोकशाही व्यवस्थेत सत्ता पक्षांच्या निर्णयावर वेसण घालण्यासाठी प्रभावी विरोधक अत्यावश्‍यक असतात. ती जागा कोण घेते ते पाहायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com