‘अवनी’चे भूत (अग्रलेख)

avani tiger
avani tiger

देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप- प्रत्यारोप बघता आता माणसांचे प्रश्‍न सोडवण्याची गरजच नाही, असा एखाद्याचा समज व्हावा. संभ्रम आणि संशय निर्माण करणारे हे वातावरण राजकारणातल्या मानभावी भूमिकांमागचे कावे आणि हेवेदाव्यांचे प्रवाह लक्षात आणून देणारे आणि म्हणूनच संशयास्पदही आहे. ‘अवनी’चे भूत ज्या पद्धतीने मोठे करणे सुरू आहे, त्यावरून तरी असेच वाटते. ‘आम्हाला माणसांच्या जिवाची अधिक काळजी आहे,’ अशी भूमिका राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आधीच घेतली, तरीही त्या मुद्द्यावर राजकारण होत असेल, तर तो केवळ योगायोग मानता येणार नाही. ‘अवनी’ प्रकरणात केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्यावर केलेली टीकाटिप्पणी अनाठायी होती. त्यांना मुनगंटीवारांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले. आता त्यावरून सुरू असलेला थयथयाट आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा वाजवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, हे या विषयावर कुणीतरी जाणीवपूर्वक वातावरणनिर्मिती करीत असल्याचे सूचित करते. मुनगंटीवार हे राजकीय पुढारी असल्याने राजकारणातले डावपेच त्यांना लागू आहेत, तसे ते त्यांच्या विरोधकांनाही (पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्याही) लागू आहेत. परंतु, कोणत्या मुद्द्यावर एखाद्याला घेरायचे, याबद्दल थोडे तरी तारतम्य बाळगले जावे, अशी अपेक्षा आहे.

नरभक्षक झालेल्या ‘अवनी’ वाघिणीने तेरा जणांचा बळी घेतल्याने अखेर तिला संपवण्याचा निर्णय झाला. प्रकरण उच्च न्यायालयात व नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर ‘अवनी’ला ठार करण्यात आले. एखाद्या वाघाला ठार करावे लागण्याची ही पहिली घटना नव्हे; पण वन्यप्राण्याच्या मृत्यूचे राजकारण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नरभक्षक ‘अवनी’चा धोका थांबवण्याचे दोन मार्ग होते. तिला जिवंत पकडणे किंवा ठार मारणे. पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यामुळेच तिला ठार करावे लागले, असे वन खात्याचे म्हणणे आहे. ते खरे नसेल, तर चौकशी व्हायला हरकत नाही; पण एका वाघिणीच्या मृत्यूचे राजकारण करण्यासाठी राज्यापुढील इतर मुद्द्यांना महत्त्व देण्याचे भानच कुणाला राहू नये, याचे नवल वाटते. ‘अवनी’च्या मृत्यूचे कवित्व ताजे असताना चंद्रपूर- गोंदिया लोहमार्गावर रेल्वेगाडीच्या धडकेने तीन बछडे मृत्युमुखी पडले. जंगलाजवळून जाणारे लोहमार्ग आणि रस्त्यांवरून वाहतूक करताना पर्यावरणाचे रक्षणही करायचे आहे, या भूमिकेतून काही किमान काळजी घेणे आवश्‍यक ठरते. अशा वाहतुकीसाठी ठराविक वेगमर्यादा असावी, लोहमार्गावर चालकाने लक्ष ठेवत आणि प्रसंगी हॉर्नचा वापर करीत पुढे जावे आदी नियमांचे पालन केल्यास विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी साधल्या जातील. एकीकडे वाघ- जंगले वाढवायची भाषा करायची आणि दुसरीकडे अतिक्रमण करीत ‘विकासा’साठी वन्यप्राण्यांचे अधिवास मर्यादित करायचे, यांतील दुटप्पीपणा दूर होण्याची गरज आहे. वाघ असल्याशिवाय जंगले तग धरू शकत नाहीत, हे वास्तव असेल, तर नैसर्गिक खाद्य न मिळाल्याने नरभक्षक झालेल्या वाघाच्या दहशतीत माणसे जगू शकत नाहीत, हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. ज्या भागात ‘अवनी’ने मृत्यूचे थैमान घातले होते, तेथे तिच्या मृत्यूनंतर जल्लोष झाला, याचा अर्थ ते ग्रामस्थ वन्यप्राण्यांचे शत्रू होते असा नाही. गेली अनेक शतके ते वाघांच्या सानिध्यात आणि वाघ त्यांच्या सान्निध्यात सुखेनैव राहात होते. पण नरभक्षक बनलेल्या वाघामुळे त्यांच्या घरच्या माणसांचे जीव गेले होते. त्यांच्या शेतीचे काम थांबले होते. ज्यांचे जगणे वाघाच्या दहशतीमुळे कठीण झाले होते, त्यांच्याकडे जाऊन त्यांचे दुखणे समजावून घ्यावे लागते. ते समजून घेऊन पुढची हानी टाळण्यासाठी एका वाघिणीला संपवण्याचा निर्णय घेतला गेला असेल, तर तो अप्रिय आणि दुःखद म्हणून का होईना, स्वीकारावा लागेल आणि यापुढे आणखी ‘अवनी’ निर्माण होऊ नयेत, यासाठी योग्य ती पावलेही उचलावी लागतील. त्याचबरोबर अशा घटनेचे किती राजकारण करावे, याचे तारतम्य सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे, हेही तितकेच खरे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com