भाजपच्या हाती कोलित! (अग्रलेख)

narendra modi
narendra modi

मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा; परंतु तो विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचा ठरू शकतो. अशावेळी थरूर यांच्यासारख्यांची वक्तव्ये भाजपच्या पथ्यावरच पडणारी आहेत.

विकासाचा मुद्दा घेऊन, ‘गुजरात मॉडेल’चा डंका पिटत गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुका जिंकण्यासाठी हवेहवेसे वाटणारे मुद्दे आयतेच त्यांच्या हाती सोपवण्यात मणिशंकर अय्यर यांच्यापासून शशी थरूर यांच्यापर्यंत अनेक काँग्रेसजन कुशल आहेत! गेल्या चार-साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत ‘सब का साथ, सब का विकास!’ या घोषणेचे जे काही झाले, ते बघता आता भाजपला तोंडावर येऊन ठेपलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काही अन्य मुद्दा हवाच होता आणि तो थरूर यांनी आयताच त्यांच्या हाती सोपवला आहे. विकासाच्या मुद्यावर अडचणीत सापडल्यावर भाजपला अयोध्येतील राममंदिराची आठवण यापूर्वी अनेकदा झाली आहे आणि आताही नेमका तोच विषय थरूर यांनी ऐरणीवर आणला आहे. चेन्नई येथील आपल्या एका भाषणात त्यांनी या विषयाला तोंड फोडले आणि ‘कोणताही चांगला हिंदू दुसऱ्या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्‌ध्वस्त करून तेथे राममंदिर बांधायला तयार होणार नाही!’ असे मत व्यक्‍त केले. हाती अलगद येऊन पडलेल्या या कोलितानंतर भाजप नेत्यांनी रान पेटवले नसते, तरच नवल! त्यामुळेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापासून थेट संबित पात्रा यांच्यापर्यंतची भाजपची फौजच मैदानात उतरली. ‘काँग्रेसचा राममंदिराला विरोध आहे आणि थरूर यांच्या या विधानामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खरा चेहरा उघड झाला आहे’, अशी टीका सुरू झाली. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मजल तर थरूर यांचा तोल सुटला आहे, असे विधान करण्यापर्यंत गेली.

अर्थात, वादाचे असे मोहोळ उभे करून भाजपला रसद पुरवण्याची ही थरूर यांची पहिलीच वेळ नाही. अवघ्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी, म्हणजे जुलैमध्ये थरूर यांनी, ‘२०१९ मधील लोकसभा निवडणुका जिंकल्या तर भाजप राज्यघटनेचे फेरलेखन करायला घेईल; कारण त्यांना भारताचे रूपांतर ‘हिंदू पाकिस्ताना’त करावयाचे आहे,’ असे विधान करून वादाचे मोहोळ उठवले होते. तेव्हा काँग्रेसने आपले हात झटकून, ‘हे थरूर यांचे वैयक्‍तिक मत आहे,’ अशी भूमिका घेतली होती. आता यासंबंधात अद्याप काँग्रेसने मौन पाळले असले, तरी अयोध्येतील राममंदिराबाबतच्या त्यांच्या ताज्या विधानाचा तपशिलात जाऊन विचार केला तर त्यात ते काय चुकीचे बोलले, असाच प्रश्‍न उभा राहतो. थरूर यांचे अलीकडेच ‘व्हाय आय ॲम ए हिंदू’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून, त्यातून त्यांचा हिंदू धर्माचा व्यासंग स्पष्ट झाला आहे. ‘हिंदू समाजातील एका मोठ्या समूहाला अयोध्येत मंदिर हवे आहे, याची आपल्याला जाणीव आहे,’ हे तर त्यांनी या भाषणात सांगूनच टाकले आहे. मात्र ‘कोणत्याही चांगल्या हिंदूला दुसऱ्या धर्माचे प्रार्थनास्थळ जमीनदोस्त करून तेथे राममंदिर बांधले जाणे आवडणार नाही,’ या त्याच्या विधानानंतर जावडेकर यांनी ‘अयोध्येतील त्या वादग्रस्त जागी असलेले मंदिर उद्‌ध्वस्त करूनच तेथे मशीद उभारली गेली, याचे पुरावे सर्वोच्च न्यायालयापुढे आहेत,’ असे सांगून टाकले. मुळात हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असताना जावडेकर यांनी असे विधान करणेच औचित्याला सोडून आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा वाद पेटता ठेवणे, भाजपला गरजेचे असल्याचेच त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

खरे तर आगामी निवडणुकांत चर्चा व्हायला हवी असे अनेक मुद्दे यापूर्वीच ऐरणीवर आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न जसा महत्त्वाचा आहे, तशीच ढासळती अर्थव्यवस्थाही चिंता निर्माण करणारी आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारामुळेही सरकारच्या ‘पारदर्शक कारभारा’विषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर खरे तर मोदी सरकारचा कारभार हाच आगामी जनमत कौलाचा मुख्य विषय व्हायला हवा. भाजपला हे सारे विषय निवडणुकीच्या मैदानात अडचणीचे ठरणारे आहेत आणि त्यामुळेच आता त्यांनी थरूर यांनी उपस्थित केलेल्या मंदिराच्या मुद्यावरून रान पेटवण्याचे ठरवलेले दिसते. अर्थात, त्यासंबंधातही थरूर यांच्या मते जे कोणी ‘चांगले’ वा ‘खरे’ हिंदू म्हणतात, त्यांचे दुमतही होण्याची शक्‍यता नाही. त्याचे मूळ हिंदू धर्मशास्त्रात आहे आणि ते अन्य धर्मांचा आदर करायला सांगते. मात्र ‘हिंदुत्ववादी’ राजकारणासाठी ते अडचणीचे आहे. त्यामुळे थरूर यांच्या निमित्ताने काँग्रेसला लक्ष्य करण्याचा सोईस्कर पवित्रा भाजपने घेतला, यात नवल ते काहीच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com