ढिंग टांग! पुन्हा मीच!

dhing tang article in sakal
dhing tang article in sakal

नानासाहेब फडणवीस यांसी, कोपरापासून जय महाराष्ट्र. हे आम्ही काय ऐकतो आहो? निवडणुकीनंतरही मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेन, असे तुम्ही नागपुरात जाऊन म्हटलेत? ही खबर आल्यापासून आमच्या संतापास पारावार राहिलेला नाही, नींद सफै उडाली असून आमच्या मातोश्रीगडावरील वातावरण तंग झाले आहे. नाना, नाना, असे आपण कां म्हटलेत? कां, कां कां? येती निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार, निवडणुकीनंतर मंत्रालयावर भगवा फडकणार, पुढचा मुख्यमंत्री केवळ आमचाच असणार असे आम्ही दोनशेसोळा वेळा जाहीर केले आहे. तरीही आपण असे मुखास येईल ते बोलिलात? मग आमच्या स्वबळाच्या भाषेला काय अर्थ राहिला? 

महाराष्ट्राचे कारभारी म्हणोन तुम्हास नामजाद केले कुणी? आम्ही! मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील प्रशस्त दालनात आपणांस जागा दिली ती कुणी? आम्ही! महाराष्ट्राचा कारभार हांकण्यासाठी आमच्या सरदार-दरकदारांना आपल्या मंत्रिमंडळात धाडिले ते कुणी? आम्ही!! तरीही आपली ही मजाल? 

पुढील कारभारी म्हणोन आम्हीच आपणांस नियुक्‍त करू असे गृहित कसे धरितां? नागपुरात जावोन घरच्या मैदानात सदर दर्पोक्‍ती केलीत, मुंबईत राहोन हे वक्‍तव्य करण्याची हिंमत आहे काये? बोला! 

अगा, आपण हे बोलिलाच नाही, ऐसा खुलासा तांतडीने माध्यमांस करणे. त्यात हयगय न करणे. अन्यथा कडेलोट ठरलेलाच. असाल तसे टांकोटाक साहेबदरबारी रुजू व्हा. बाकी भेटीअंती. उठा. 

ता.क. : पत्राच्या शेवटला शब्द हे तूर्त आमचे इनिशियल आहे. त्याचे आज्ञेत कधीही रूपांतर होईल, ह्याबद्दल खातरी बाळगा. उठा. (हेही इनिशियलच!) 

परमप्रिय उठासाहेब यांसी, आपले पत्र घेऊन येणारा आपला दूत आणि आमचे जीवश्‍च कंठश्‍च मित्र मा. मिलिंदादादा (तीन"दा'! हाहाहा!!!) घरी येऊन चहा पिऊन गेले. हल्ली ते आमच्याकडेच ज्यास्ती असतात, हे तुमच्या कानावर असेलच. पण ते एक असो. नागपुरातील आमच्या वक्‍तव्यामुळे आपण संतापलात असे मिलिंदादादाकडूनच कळले. पत्र घेऊन ते आले, तेव्हा त्यांच्या हातात मूठभर पेढे होते आणि तितकेच तोंडातही होते!! मी विचारले, ""काय झाले?'' तर त्यांनी सांगितले की ठॉब बॉम भभक भूम फ्यॉड...'' (मराठी अनुवाद : साहेब जाम भडकलेत तुमच्यावर..!) मी हादरलोच. "महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री मीच' हे विधान ऐकून तुम्ही त्यास अकरा पेढे फेकून मारलेत असे कळले. (तेच त्यांच्या हातात होते म्हणे!!) जाऊ दे. चालायचेच. 

साहेब, तुमच्या काळजाला दुखावेल, असा शब्द आम्ही आधीही कधी उच्चारला नाही, उच्चारत नाही आणि यापुढेही उच्चारणार नाही. गेल्या पंचवीस वर्षांची आपली मैत्री. आपण अनेकदा रागावलात, आम्ही हसत राहिलो. तुम्ही कोडगे म्हणालात, तरीही हसत राहिलो. एकदा तरी उलट बोललो का? नाही!! "पुढला मुख्यमंत्री मीच' असे मी म्हटले, त्याला कारणीभूत पत्रकारच आहेत. त्यांनी मला "विदर्भाचा पहिला मुख्यमंत्री तुम्ही असाल का?' असे विचारले. (नागपूरचे पत्रकार असेच प्रश्‍न विचारतात. काय करणार?) त्यावर मी वरील उद्‌गार काढले. अर्थात त्यात मी पोलिटिकल मखलाशी केली आहे, हे तुम्ही ओळखाल असे मला वाटले होते. पण नाही कळले तुम्हाला. क्षमस्व! 

"महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री मीच... पण तसे साहेबांनी सांगितले तरच' असे मी यापुढे सांगत जाईन. मग तर झाले? तुमच्या स्वबळावरच मी हे स्वप्न पाहातो आहे साहेब!! अधिक काय लिहू? बाकी भेटीअंती बोलूच. बाप्पा मोरया! सदैव तुमचाच. नाना. 

ता. क. : उठा हे तुमचे इनिशियल आहे हे कळल्याने बरे वाटले. तुमचे सरदार आम्हाला सारखे खुर्चीवरून उठा उठा असे सांगताहेत, असा गैरसमज झाला होता. थॅंक्‍यू!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com