बाहुबली! (ढिंग टांग)

Dhing-Tang
Dhing-Tang

धूळधुरोळा उडवत,
विजयपताका फडकवत
विद्युतवेगाने दौडणाऱ्या
सप्तशुभ्र अश्‍वांच्या
दिव्यरथात बसून
पवित्र नगरीकडे निघालेल्या
त्याच्या भक्‍तिरथाची चाके
अंगुळभर हवेतच गरगरत होती...
रथाच्या मध्यभागी
रथदंडाचा आधार धरत
खांद्यावरील अजेय धनुष्याचा,
पाठीवरील अक्षय्य भात्याचा
समर्थ भार सांभाळणाऱ्या
त्या पुरुषोत्तम बाहुबलीने
केले मंद स्मित, तेव्हा
शहारलेच शरयुचे पात्र.
पवित्र नगरीच्या वेशीपाशी
येऊन ठेपलेल्या दिव्यरथाचा
वेग आपापत: मंदावला...

राजस भक्‍तिभावाने
नम्रवदन बाहुबलीने
पाहिले सभोवार,
नगरीच्या सौधासौधावर
डौलाने फडकत होत्या
ज्वालाग्राही रंगाच्या
उत्सुक पताका,
नळेचंद्र ज्योतींच्या
मंदमौन स्फोटांनी
उजळत होते नगरीवरले आभाळ.
रस्तोरस्ती पडले होते
महन्मंगलाचे सडे
रिते होत होते पवित्र नद्यांच्या
निर्मळ जळाचे घडे,
अवघे नगर फुलून आले होते...
बाहुबली स्वतःशीच म्हणाला :
येथेच... येथेच रचायची आहे
भव्य मंदिराची पहिली शिळा
ज्याचा गगनगामी कळस
थेट स्वर्गाला करून देईल
जाणीव त्याच्या थिटेपणाची.

।। जननी जन्मभूमिश्‍च
स्वर्गादपि गरियसी।।
...विजयघोषातच नगरजनांनी
केले स्वागत बाहुबलीचे
रथातून पायउतार होत
धीरोदात्त पावले टाकत
पीतकुसुमांच्या कोमल पाकळ्यांचा
वर्षाव स्वीकारत,
गंधित, पुष्पमंडित, उत्सवित
बाहुबलीने मंदिरभूमीची माती
भाळी धारण करत
घातला अजस्र शिळेला हात.
गर्वोन्नत छातीने तो म्हणाला :
‘‘हे नगरजनहो, तुमच्या स्वागताने
     माझ्या हृदयातील स्थंडिलास
कधीही न विझणारा अग्नि
मिळाला आहे!
ह्या इथेच उभारु आपण
दिव्य शुभंकर मंदिर,
जे देत राहील स्फूर्ती
येणाऱ्या सहस्रावधी पिढ्यांना.
मी तो नाममात्र!
आधी मंदिर, मग सिंहासन.’’

‘जीतम जीतम’ आरोळ्यांनी
दुमदुमले नगराचे दिशाकोन.

एक विशाल शिळा उचलून
बाहुबलीने दिली झक्‍कास पोझ. 
...कॅमेऱ्यांचा चकचकाट करणाऱ्या
छायाचित्रकारांना तो हलकेच म्हणाला :
‘‘लौकर काढा ना फोटो, लेको!
वजन केवढंय माहितेय का?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com