अरेबियन डेज! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!
मम्मामॅडम : (कागदपत्रं चाळण्यात बिझी...) हं!
बेटा : (आळस देत) सुटलो! संपलं एकदाचं ते हाऊस!
मम्मामॅडम : (कामाच्या तंद्रीत...) लोक उगीचच हौसमौज असं म्हणतात! ॲक्‍चुअली बिलकुल मौज नसते हौसमध्ये!
बेटा : (डोकं चोळत) सुट्टीवर जावं असं म्हणतोय!
मम्मामॅडम : (हादरून) पुन्हा?
बेटा : (कुरकुरत) कमॉन, गेल्या कित्येक महिन्यांत मी एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही!
मम्मामॅडम : (नकारार्थी मान हलवत) सुट्टी नामंजूर! आता भरपूर कामाचे दिवस येणार आहेत! जेवायला फुर्सत मिळणार नाही, इतके!
बेटा : (दिलासा देत) काळजी करू नकोस! हल्ली मी रस्त्यावरच्या ठेल्यावर पुरीभाजीही आवडीने खातो!!
मम्मामॅडम : (सावध करत) रस्त्यावरचे वडे-पकोडे खाऊ नयेत हं! -अगदी इंजिनिअरनं केलेले असले तरी!!
बेटा : (चुकीची दुरुस्ती करत) पकोडे नाही, पुरीभाजी म्हणालो मी!!
मम्मामॅडम : (निक्षून सांगत) आता कुठ्‌ठंही जायचं नाही बरं! देशातल्या देशात हिंडून घे, पाहिजे तितकं!!
बेटा : (विजयी मुद्रेने) ह्या वेळेला मीसुद्धा ऑन ड्यूटी फॉरेन टूरवर जाऊन येणार आहे!!
मम्मामॅडम : (कोरडेपणानं) कोण पाठवणार तुला ऑन ड्यूटी फॉरेनला? आपल्याला सुट्टी घेऊनच जावं लागतं!!
बेटा : (सहज सांगून टाकत) मी दुबईला जाऊन येतोय जरा!! फक्‍त दोनच दिवस!!
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडत) कश्‍शाला? कुठ्‌ठेही जायचं नाही, असं आत्ताच सांगितलं ना तुला?
बेटा : (फुशारकीनं) आपल्या पक्षाच्या वतीनं मी तिथं पंचवीस हजार अरबांसमोर अप्रतिम भाषण करणार आहे!! लोक नेहमीप्रमाणे मंत्रमुग्ध होऊन ऐकतील आणि टाळ्या वाजवतील!!
मम्मामॅडम : (खुश होत) हल्ली तुझ्या सभांना परदेशातही गर्दी होते हं! त्या कमळवाल्यांच्या गमज्या नकोत आता!! हुं:!!
बेटा : (पाठीमागे हात बांधून पोक्‍तपणे) मोदीजी जिथं जिथं जाऊन भाषणं देऊन आले, तिथं तिथं आता मला निमंत्रणं येऊ लागली आहेत!! उदाहरणार्थ, सौदी अरबस्तान!! त्यांनी माझी मुलाखतही घेतली! मी त्यांना म्हणालो की डोण्ट वरी, मी येतोय तुमच्या देशात!! मोदीजींना हरवायचं असेल तर मुझे सौदी जानाही पडेगा!!
मम्मामॅडम : (सूचना करत) त्यापेक्षा तू महाराष्ट्राचा दौरा करून ये!!
बेटा : (दुर्लक्ष करत) इंडिया हा एकविसाव्या शतकातला सौदी अरबस्तान आहे, असा माझा सिद्धांत आहे!! हा माझा सिध्दांत मी मनमोहन अंकलकडेसुद्धा कांदेपोहे खाताना बोलून दाखवला...
मम्मामॅडम : (काळजीपोटी) मग काय म्हणाले ते?
बेटा : (सहजपणे) काही बोलले नाहीत! नेमकी तेव्हाच त्यांना कांदेपोह्यातली मिरची लागली! डोळ्यांत पाणी आलं होतं त्यांच्या!! मी बघितलं ना...
मम्मामॅडम : (हादरा बसून) क्‍काय? इंडियाचा सौदी अरेबिया होणार, असं सांगितलंस तू?
बेटा : (गंभीरपणे) करेक्‍ट! कारण, तेलाच्या साठ्यांमुळे सौदी अरबस्तान श्रीमंत झाला, तसे मनुष्यबळाचे साठे इंडियात आहेत! मी पीएम झालो की दोन गोष्टी शंभर टक्‍के करणार!!
मम्मामॅडम : (घाबरून) कुठल्या?
बेटा : (दोन बोटं दाखवत) एक, इंडिया प्रच्चंड श्रीमंत होणार आणि दोन, राफेल विमानांच्या व्यवहाराची चौकशी होणार!!
मम्मामॅडम : (अविश्‍वासानं) खरंच बोलतोयस की आपलं असंच राफेल विमान टाइप?
बेटा : (डोळा मिचकावत) सीरिअसली बोलतोय की!!
मम्मामॅडम : (सुस्कारा टाकत) सगळं छान चाललंय...पण तू असा डोळा मिचकावलास की माझ्या काळजातला ठोका चुकतो बघ!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com