ऑल इज वेल! (अग्रलेख)

team india
team india

साहेबाच्या देशात जाऊन त्यास पंचांग दाखवण्याचे भारतीय स्वप्न विराट कोहलीच्या संघाने पुरे करून दाखवले असते, तर आज गणेशोत्सवात उत्साहाने वाजणारे ढोल-ताशे निश्‍चितच या विजयीवीरांच्या स्वागतासाठी बडवले गेले असते; पण ते घडले नाही. पाचपैकी चार कसोटी सामन्यांत दारुण हार खाऊन भारतीय संघ उरल्यासुरल्या अभिनिवेशासह आशिया करंडक क्रिकेट जलशासाठी दुबईत पोचला आहे. पराभवाने पोळलेला कोहली या स्पर्धेत नसेल. आशिया करंडकातला भारतीय संघ खेळेल तो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. दुबईत भारताची कामगिरी उंचावलेली असेल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत असतानाच भारताच्या इंग्लंडमधील पराभवाचे कवित्वही चर्चिले जात आहे. ते आणखी बराच काळ टिकेल. क्रिकेटमध्ये मार खाल्ल्यानंतर ही नामुष्कीची स्वगते परिपाठानुसार दरवेळी गायली जातात; पण ती कितपत न्याय्य आहेत, हेही तपासून पाहणे इष्ट ठरावे. दक्षिण आफ्रिकेमधून पराभवाची माळ गळ्यात घेऊन परतलेला भारतीय संघ इंग्लंडमध्ये उरलीसुरली अब्रू घालवून आला, असा जो टीकेचा सूर लावला जातो आहे, तो मात्र अतिरंजित वाटतो. त्याहूनही अधिक त्याला वैयक्‍तिक हेव्यादाव्यांचे स्वरूप येणे, हे अंतिमत: भारतीय क्रिकेटलाच घातक ठरेल, हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे. कारण एवढा लाजिरवाणा पराभव होऊनही आजही ‘आयसीसी’च्या कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत भारत अव्वल स्थानावरच आहे. अपयशी कर्णधार म्हणून ज्याच्या नावे खडे फोडले जात आहेत, त्या विराट कोहलीच्या बॅटमधून या पराभूत मालिकेतही तब्बल ५९३ धावांची बरसात झाली आहे. रिषभ पंत, लोकेश राहुल, हनुमा विहारीच्या रूपात फलंदाजांची नवी फळी भविष्यात तयार होत असल्याची चाहूल लागली आहे. परदेश दौऱ्यांमध्ये ज्यांच्यावर हमखास अपयशाचे खापर फोडले जाते, त्या मध्यमगती गोलंदाजांनीही या मालिकेत किमान वीस बळी घेऊन आपली उपयुक्‍तता सिद्ध केली आहे. तेव्हा या दौऱ्यातून भारताच्या हाती पराभवाशिवाय काहीही लागले नाही, हा नकारात्मक सूर थोडासा अन्यायकारक वाटतो.

कुठल्याही संघाची कामगिरी ही बव्हंशी परदेशातील खेळपट्ट्यांवर अधिक मोजली जाते. कोहलीच्या संघाबाबत तेच घडते आहे. भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार मानला जाणारा महेंद्रसिंह धोनी असो, किंवा त्याआधीचे सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन किंवा अगदी सुनील गावसकर असो... साऱ्यांसाठी परदेशी खेळपट्ट्यांवर मिळवलेले यश हीच मोजपट्टी वापरली जाते. ‘फलंदाज म्हणून कोहली यशस्वी ठरला असला तरी, कर्णधार म्हणून तो कमी पडला’, असा सूर सध्या लावला जाताना दिसतो. त्यात काही प्रमाणात तथ्यही असेल; परंतु एका अपयशी मालिकेमुळे असे शिक्‍के मारण्यात काहीही हशील नाही. लॉर्डसवर अखेरच्या कसोटीत मार खाण्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक-मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी, सध्याचा भारतीय संघ हा गेल्या पंधरा-वीस वर्षांतला सर्वोत्कृष्ट संघ असल्याचे मत व्यक्‍त केले होते. सुनील गावसकर आणि सौरभ गांगुली या माजी कर्णधारांनी त्याबद्दल शास्त्री यांना उघड दूषणे दिली. शास्त्री यांचा दावा हास्यास्पद आहे, हे उघडच आहे. संघात आत्मविश्‍वास भरणे, हे प्रशिक्षकाचे काम असते; परंतु त्यासाठी अतिरंजित दावे करणे योग्य नाही. इंग्लंडच्या दौऱ्यात भारताच्या जमेच्या काही बाजू दिसल्या, तसेच दुबळी स्थानेही ढळढळीतपणे समोर आली आहेत. मोक्‍याच्या क्षणी अचूक निर्णय घेऊन त्याचा अंमल करणारा संघ अखेर विजयी ठरत असतो. इंग्लंड संघाने नेमके हेच साध्य केले, तर भारतीय संघाने बहुतेक संधींची माती केली, हे कळत होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन लढतीत अजिंक्‍य रहाणेला न खेळवणे, एजबस्टन येथील सामन्यात चेतेश्‍वर पुजाराला बसवणे आणि याउप्पर कुलदीप यादवला खेळवणे, साऊदम्प्टनच्या खेळपट्टीवर जादा फिरकी गोलंदाज न वापरणे, लॉर्डसवर आणखी एक मध्यमगती गोलंदाज न उतरवणे, हार्दिक पंड्या आणि शिखर धवन यासारख्या संपूर्णत: बेभरवशी फलंदाजांवर मदार सोपवणे, या झाल्या काही भयंकर चुका...ज्या  कोहलीच्या खात्यावर जमा होऊ शकतील; परंतु असल्या चुका सुधारणे सहज शक्‍य असते. त्यासाठी संघाच्या दर्जाबद्दलच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा ‘ऑल इज वेल’ असे म्हणत पुन्हा मैदानात उतरावे, हे इष्ट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com