दिल माँगे ‘मोअर’ (अग्रलेख)

amazon-more
amazon-more

भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’ सुपरमार्केट खरेदी करून भारतातील किराणा माल विक्रीच्या क्षेत्रातील स्पर्धेत आणखी रंगत आणली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट विकत घेतले. किराणा माल विक्रीतील ही बलदंडांची लढाई आता अधिक तीव्र होण्याचीच ही चिन्हे आहेत. ग्राहकांना ती अनुभवायला मिळेल. जेव्हा-जेव्हा अशा रीतीने नवनवे स्पर्धक भारतात उतरतात, तेव्हा प्रत्येकवेळी चिंता व्यक्त होते, ती आपल्या किराणा दुकानदारांचे काय होणार याची! त्यांच्या पोटावर पाय येणार, अशी हाकाटी पिटली जाते. प्रत्यक्षात, तसे झाल्याचे दिसत नाही. एकतर उपक्रमशीलतेच्या, ग्राहकांशी असलेल्या कनेक्‍टच्या आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी आपला व्यवसाय टिकवलाय. स्पर्धेची जाणीव ठेवून स्वतःमध्ये ज्यांनी काळानुरूप बदल केले, त्यांनी स्पर्धेला तोंड देत व्यवसाय वाढविलादेखील. दुसरे म्हणजे भारतातील बाजारपेठ वाढते आहे, त्यामुळे येथे मोठा वाव आहे. त्याचा लाभ घेण्याची संधी इतरांनाही आहेच. मात्र, काळानुरूप बदलाचे आव्हान त्यांच्यापुढे आहे, यात शंका नाही. मुळात एकूणच वस्तूंच्या खरेदी-विक्रीच्या वर्तनव्यवहारातच आमूलाग्र बदल घडताहेत आणि त्याला कारणीभूत आहे ती आजच्या आधुनिक काळातील जीवनशैली. भारतातील १५ ते ५४ वयोगटातील लोकसंख्येचे ५८ टक्के प्रमाण लक्षात घेतले तर ऑनलाइन खरेदीकडे कल असलेल्यांची संख्या भविष्यात वाढतच जाणार. नोकरी-व्यवसायामुळे अत्यंत व्यग्र अशा वेळापत्रकात खरेदीसाठी एखाद्या दुकानात जाण्यापेक्षा ऑनलाइन खरेदी हाच मार्ग अनेकांना भावतो आहे. खरेदीसाठी वेगळा वेळ काढणे शक्‍य नसले तरी, दुकाने बंद झाल्याची पाटी पाहून निराश होण्याचे आता कारण नाही. मुळात त्यांना पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि होत आहेत. शहरांमध्ये हे प्रामुख्याने घडते आहे. ‘ॲमेझॉन’च्या किरकोळ वस्तू विक्रीच्या क्षेत्रातील प्रवेशाचे महत्त्व त्यादृष्टीने पाहायला हवे. त्यांनी जरी सुपर मार्केट्‌स घेतली असली तरी ऑनलाइनचा व्यवसाय आणखी वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार, हे उघड आहे. त्याचबरोबर ऑफलाईन विक्रीव्यवहारही अस्तित्वात राहणार, हेदेखील त्यांनी ओळखले आहे. त्यामुळेच या दोन्हीच्या माध्यमातून आता ही कंपनी जास्तीत जास्त ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि सवलतींचा वर्षावही करेल, अशीच चिन्हे आहेत. यात फायदा आहे तो ग्राहकाचा.

कंपनी परकी असली तरी तिला व्यवहार करावे लागणार ते येथेच. त्यामुळे सगळा पैसा बाहेर जाणार, असा समज करून घेणेही चुकीचे आहे. किराणा मालाच्या विक्रीसाठी सुपर मार्केटच्या बरोबरीने दुकाने, साखळी पुरवठा, गोदामे, शीतगृहे, ग्राहकांपर्यंत माल पोचविण्याची वाहतूक व आनुषंगिक व्यवस्था असा सगळा व्याप उभा करावा लागतो. यात स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. माल पुरविणाऱ्यांना व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो. त्यात शेतकरीही आले. ग्रामीण भागात सर्वदूर पूरक पायाभूत व्यवस्था उभ्या करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही आवश्‍यक बाब आहे. तिला चालना मिळाली तर ते चांगलेच आहे. एका अहवालानुसार, २०२०पर्यंत किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील उलाढाल १.१ ट्रिलियन डॉलर एवढी होण्याची शक्‍यता आहे. सर्वच क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्राचीही पुनर्रचना होत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या संक्रमणाला थोपविणे शक्‍य तर नाहीच; पण इष्टही नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की बलदंडांना इथे मोकळे रान आहे आणि छोट्यांना कोणीच वाली नाही. स्पर्धा ही निकोप आणि नियमबद्ध असावी, हे पाहिले पाहिजे आणि शासनसंस्थेची तीच तर जबाबदारी आहे. त्यामुळे परकी गुंतवणुकीच्या विरोधात शक्ती खर्च करण्यापेक्षा नियमांच्या चौकटीतच व्यापार झाला पाहिजे, याचा आग्रह धरला पाहिजे. भारताला परकी गुंतवणुकीची आवश्‍यकता आहे, इथला ग्राहकही नवनव्या पर्यायांच्या शोधात आहे आणि परकी कंपन्यांना इथल्या विस्तारणाऱ्या बाजारपेठेत स्वारस्य आहे. एकुणात सगळ्यांचीच अवस्था ‘दिल माँगे मोअर’, अशी असल्याने ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची सुपरमार्केट खरेदी करणे, हा या प्रक्रियेतीलच भाग आहे, हे समजावून घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com