स्पर्धेपलीकडचं जग

mrunalini chitale
mrunalini chitale

त्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या बाबत मनात साशंकता असते. कारण स्पर्धेत निवड होण्यासाठी निवड समितीपुढे घातलेली लोटांगणं, प्रत्यक्ष मैदानावर उतरल्यावर स्पर्धा जिंकण्यासाठी उत्तेजक पदार्थांचं सेवन करणं, ‘मॅच फिक्‍सिंग’ याविषयी इतकं कानावर पडत असतं, की जीव ओतून आणि वेळात वेळ काढून स्पर्धा पाहणारे आपल्यासारखे प्रेक्षक वेडे ठरण्याची शक्‍यता असते. आपला वेडेपणा आपणच सिद्ध करण्यापूर्वी चॅनेल बदलणार, तोच माझं लक्ष स्पर्धकांकडे गेलं आणि लक्षात आलं, की ही स्पर्धा ‘विशेष’ मुलांसाठी आहे. त्या मुलांचे क्‍लोजअप्स पडद्यावर दाखवले जात होते. मुलांचे नातेवाईक, प्रशिक्षक, प्रेक्षक क्रीडांगणावर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता.
संयोजकांनी इशारा केला आणि स्पर्धकांनी धावायला सुरवात केली. जो तो आपापल्या परीनं धावत होता. इतक्‍यात पुढे असलेल्यांपैकी एक जण अडखळला. त्यानं साष्टांग नमस्कार घातला. तो न उठता तसाच पडून राहिला. प्रेक्षक ओरडून प्रोत्साहन देत होते. मागून येणारा एक मुलगा पडलेल्या मुलापाशी थांबला. त्यानं त्याला उठवायचा प्रयत्न केला. त्यामागून येणाऱ्या मुलानं थांबून त्याच्या गुडघ्यातून येणारं रक्त आपल्या शर्टानं पुसलं. त्या तिघांना थांबलेलं पाहून मागून येणारे अजून दोघे जण त्यांच्याभोवती थांबले. त्यापैकी एकानं पुढे गेलेल्या सगळ्यांना हाका मारून लक्ष वेधून घेतलं, तसे पुढे गेलेले सगळे त्यांच्या दिशेनं पळत आले. आता कॅमेरा प्रेक्षकांच्या दिशेनं वळला. क्रीडांगणावर टाचणी पडली तरी ऐकू येईल अशी शांतता होती. आता पुढे काय याची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती, तर काहींच्या चेहऱ्यावर सगळी मेहनत फुकट गेल्याची रुखरुख. कॅमेरा पुन्हा मुलांच्या दिशेनं वळला. पुढचं दृश्‍य थक्क करणारं होतं. आता सर्व मुलांनी हातात हात गुंफून साखळी केली होती. ती साखळी स्पर्धेच्या अंतिम रेषेपशी पोचली आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. स्पर्धेतील मुलंही टाळ्या वाजवत होती. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडं पाहताना मनात आलं, लौकिक अर्थानं शहाणं असलेल्या आपल्यासारख्यांच्या जगात आपण कायमच स्पर्धेला तोंड देत असतो, धावत असतो. कधी स्वत:चं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, तर कधी स्वत:चं अस्तित्व टिकविण्यासाठी. कधी आहे त्यापेक्षा अधिक यश, पैसा, कीर्ती मिळविण्यासाठी. प्रश्न असतो कुणी किती धावायचं? कसं धावायचं? फक्त धावायचं की एखाद्या तरी थांब्यावर समाधानानं थांबायचं? कधी स्वत:साठी, तर कधी दुसऱ्यासाठी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com