रंग माझा वेगळा

प्रा. राजा आकाश
प्रा. राजा आकाश

तीन मित्र केळी खात असतात. पहिला मित्र केळीची साल काढून बेफिकीरपणे रस्त्यात भिरकावतो. दुसरा मित्र साल कचराकुंडीत टाकतो व तिसरा मित्र स्वत:चं व पहिल्यानं रस्त्यात फेकलेलं अशी दोन्ही सालं उचलून कचराकुंडीत टाकतो. तिघांच्याही कृतीतून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. रस्त्यात एखादा अपघात झाला, तर काही जण ते बघून बेशुद्ध पडतात. काही जण धडक देणाऱ्या ट्रकचालकाला मारहाण करतात. काही जखमींना मदत करतात. काही नुसते बघत राहतात, तर काही दुर्लक्ष करून निघून जातात. एकाच घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न असतो. कारण प्रत्येक जण इतरांपेक्षा वेगळा आहे, युनिक आहे.

जन्माला येणारी प्रत्येक व्यक्‍ती काही विशिष्ट आनुवंशिक गुणधर्म घेऊन येते. प्रत्येकाची शरीरयष्टी, तो दिसतो कसा, त्याची उंची, डोळे, बोटांचे ठसे या सर्व गोष्टी इतरांपासून पूर्ण वेगळ्या असतात. प्रत्येकाची मानसिक जडणघडण वेगळी असते. प्रत्येकाची पिढ्यान्‌पिढ्याची आनुवंशिक पार्श्‍वभूमी, इतिहास वेगळा असतो. या प्रत्येक गोष्टीचं प्रोग्रॅमिंग प्रत्येकाच्या मेंदूत वेगवेगळं व विशिष्ट पद्धतीने झालेलं असतं. प्रत्येक व्यक्तीचं स्वत:च वेगळं स्थान असतं. हा मोठा, हा लहान, हा हुशार, हा बुद्धू, हा आक्रमक, हा एकलकोंडा अशी विविध लेबल व्यक्‍तींना लागलेली असतात. प्रत्येकाच्या भोवतालची परिस्थिती, समाजातील लोकांची वागण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीशी वेगळी असते.

प्रत्येकाचं व्यक्‍तिमत्त्व इतरांपासून पूर्णपणे वेगळं असल्यामुळे आनंदाच्या, दु:खाच्या संकटाच्या प्रसंगात प्रत्येकाची वागण्याची पद्धत निराळी असते. उदा. एखाद्या मुलाची आई त्याच्या वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच वारली की त्याच्या मनात त्या घटनेची तीव्रता प्रखरतेने नोंदवली जाते. त्यामुळे अशा व्यक्‍तीच्या आयुष्यात आलेलं अपयश, अपमान याचं दु:ख इतरांच्या मानानं खूप तीव्र असतं; पण कुटुंबात चांगला भावनिक आधार मिळत असेल तर ती व्यक्‍ती अपयश हसत-हसत पचवू शकेल. डोळ्यांनी पाहिलेली दृश्‍यं, कानांनी ऐकलेला आवाज, आपण घेतलेली चव किंवा वास याबाबतची प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. मनातलं सर्किट ‘फायर’ झाल्यानंतर जो जुना अनुभव आठवेल, त्याच्याशी जोडलेल्या भावनाही आपण पुन्हा अनुभवत असतो. प्रत्येकाच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारांचं प्रोग्रॅमिंग झालेलं असतं. पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंगचं प्रमाण जास्त असेल, तर त्या व्यक्‍तीचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी राहील; पण निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग जास्त असेल, तर त्या व्यक्‍तीला आयुष्यात अनेक समस्या येऊ शकतात, पण प्रयत्नांतून आपल्याला हे निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग बदलता येतं आणि आपलं व्यक्‍तिमत्त्व अधिक समृद्ध व आकर्षक करता येतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com