प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी...

prof raja aakash
prof raja aakash

तुम्ही एखाद्या समारंभात गेला आहात. तेथील गर्दीतही काही लोक वेगळे असतात. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता. त्यांच्याशी बोलावं, तुमच्याकडे त्यांचं लक्ष जावं असा तुम्ही प्रयत्न करता. नेमकं काय असतं त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये? मानसशास्त्रीय परिभाषेत त्या व्यक्‍तीमधील या क्षमतांना ‘पॉवर’ म्हणतात. इतरांच्या विचारांना व कृतीला प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे ‘पॉवर’. फ्रेंच आणि रेव्हान या शास्त्रज्ञांनी संशोधन करून माणसांमध्ये कोणकोणत्या ‘पॉवर’ असू शकतात ते सांगितलं आहे.

रिवॉर्ड पॉवर ः इतरांना पुरस्कार देण्याची क्षमता म्हणजे ‘रिवॉर्ड पॉवर’. हा पुरस्कार पैसे, प्रमोशन, कौतुक, सन्मान इत्यादी स्वरूपात असू शकतो. या गोष्टी इतरांना देण्याची क्षमता जितकी जास्त, तितकी ‘रिवॉर्ड पॉवर’ जास्त. आपल्या फायद्यासाठी लोक ‘रिवॉर्ड पॉवर असलेल्या लोकांकडे येतात; त्यांच्या मागे जातात. त्यांना सहकार्य करतात. त्यांना आवडतं तसं वागतात.

कोरेसिव्ह पॉवर ः समोरच्यावर सत्ता गाजवण्यासाठी, त्यांच्या वागण्याला, क्षमतांना नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे ‘कोरेसिव्ह पॉवर’. अशा व्यक्‍तीला लोक वचकून असतात. कारण हा माणूस आपलं वाईट करू शकतो याची त्यांना जाणीव असते. प्रसंगी जबरदस्ती करून हे लोक इतरांची मान्यता मिळवतात.

लेजिटिमेट पॉवर ः ही क्षमता अधिकार व पद यावर अवंलबून असते. प्राचार्य, वरिष्ठ अधिकारी यांचं लोक ऐकतात, कारण त्यांच्याकडे अधिकार आहेत. लोक त्यांच्या पदाचा व अधिकाराचा मान ठेवतात. आपण वडील, आजोबा, आई, वडीलधारी माणसं यांना मान देतो. त्यांचं मोठेपण स्वीकारतो. कारण वडील म्हणून त्यांच्या हातात काही अधिकार आहेत. वय, जात, बुद्धिमत्ता, शिक्षण, त्या व्यक्‍तीचा त्याग या आधारे समाज एखाद्या व्यक्‍तीला ‘लेजिटिमेट पॉवर’ देत असतो.

रेफरंट पॉवर ः एखाद्याचं व्यक्‍तिमत्त्व इतकं प्रभावी असतं, की आपण त्याच्यासारखं बनावं असं आपल्याला वाटतं. त्या व्यक्तीमध्ये ‘रेफरंट पॉवर’ आहे. आपण त्या व्यक्‍तीला ‘रोल मॉडेल’ समजतो. त्याच्यासारखं राहण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, वय आणि प्रगल्भता यानुसार ‘रोल मॉडेल’ बदलतात.

एक्‍स्पर्ट पॉवर ः ज्ञान, अनुभव, कौशल्य या आधारे तुम्हाला ‘एक्‍स्पर्ट पॉवर’ मिळते. जितके तुम्ही शिकता, ज्ञान मिळवता, अनुभव मिळवता तितका तुमचा प्रभाव वाढतो.
आपल्याला समाजात प्रभावी व्हायचं असेल, तर या ‘पॉवर’ आपल्या व्यक्‍तिमत्त्वात निर्माण करता यायला हव्यात. या सर्व पॉवर एकाच व्यक्‍तीत असतील असं नाही. पण त्यातल्या दोन-तीन आपण मिळवू शकतो व त्याचा तारतम्याने वापर केला तर प्रभावी बनू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com