फ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह! (ढिंग टांग!)

फ्रॉम अर्जेंटिना विथ लव्ह! (ढिंग टांग!)

""जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी नव्या संधी निर्माण होतात. मानवजातीच्या सर्वंकष विकासासाठी ह्या प्रकारच्या शिखर परिषदांची नितांत आवश्‍यकता आहे, तुम्हीही अशा परिषदांना जायला हवे,'' हे आम्ही युगांडाचे माजी संरक्षणमंत्री नामचीन युगुंडा ह्यांचे बॉडीगार्ड उखाड खांदा ह्यांना सांगत होतो.

पुढच्या क्षणी ते आमच्या कानसुलीत भडकावतील, असे त्यांच्या चेहऱ्यावरून कुणालाही वाटले असते. पण नाही! ते आमच्याकडे आदरानेच पाहात होते. आदराने बघताना युगांडातील नागरिकांचे डोळे आपोआप तांबारतात. पण विषाची परीक्षा नको म्हणून आम्ही तिकडून सटकलो. आर्जेंटिना येथे नुकत्याच पार पडलेल्या जी-20 परिषदेचे निमंत्रण युगांडासारख्या देशाला नाही, ह्याचे आम्हाला दु:ख होतेच. पण ही परिषद जगातील 20 सर्वोच्च देशांचीच असते, त्याला काय करणार? पण देशोदेशींचा सुसंवाद, व्यापार वगैरे वाढून गरीब देश संपन्न व्हावेत, ह्या उदात्त हेतूने आम्ही मात्र अशा परिसंवादांना नेहमीच जातयेत असतो. 

आमचे परममित्र आणि जागतिक शांततेचे नवे दूत श्रीमान नमोजीसाहेब ह्यांच्यासमवेत आम्हाला आर्जेंटिनाला जावे लागले. नमोजी ह्यांना आर्जेंटिनाच्या लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. जी-20 परिषदेत नमोजीसाहेबांनी सर्वांना दिलेला इशारा चिंत्य होता. ते म्हणाले, ""सर्वांनी योगासने केली, तर आणि तरच ह्या जगात व्यापारउदीम आणि शांतता वाढीस लागेल!'' 
नमोजीसाहेबांनी खास लोकाग्रहाखातर परिषदेच्या व्यासपीठावर निवडक वीस योगासने करून दाखवली. त्यातील भुजंगासनाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. बद्धपद्‌मासनात बसून भाषण ऐकल्यास ज्ञानप्राप्ती होईल, असे त्यांनी सांगितल्यावर उपस्थितांनी महत्प्रयासाने पद्‌मासने घातली. परिषद संपेपर्यंत कोणी जागचे उठले नाही. परिषदेचे सूप वाजल्यावर देशोदेशीच्या प्रतिनिधींना बगलेत हात घालून झोळणा करून उचलून न्यावे लागले!! 

आर्जेंटिना ह्या देशाविषयी आपल्या लोकांमध्ये बरेच अज्ञान असल्याचे आमच्या लक्षात आले. थोडक्‍यात सांगायचे तर हा एक देश असून तेथे माणसे राहतात. फुटबॉल खेळण्याचा तेथे परिपाठ असून सर्व नागरिकांकडे किमान एक तरी फुटबॉलची जर्सी असते. जर्सी म्हटले की (आपल्याकडे) कुणाला गाय आठवेल, पण तसे नाही. जर्सी म्हणजे एक प्रकारचा टीशर्ट असतो. (सध्या त्या देशात "मोदी जी-20' अशी अक्षरे लिहिलेला टीशर्ट लोकप्रिय होतो आहे.) एकेकाळी मारादोना असे काहीसे हिंस्त्र नाव लिहिलेले टीशर्ट तेथे लोकप्रिय होते. आम्ही सदर नावाच्या गृहस्थाला तेथे भेटलो. तो एक माजी फुटबॉलपटूच निघाला!! रातसारी भिजून टरटरुन फुगलेल्या काबुली चण्यासारखा दिसणारा हा इसम फुटबॉल काय गड्डा झब्बूसुद्धा नीट खेळू शकणार नाही, अशी आमची खात्री पटली. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी... 

ब्युनोस आयर्स (की ब्युएनोस आएरेस?) हे आर्जेंटिना देशाचे राजधानीचे शहर असून तेथे मोदी ह्या नावाची जबरदस्त लाट उसळलेली आम्ही पाहिली. मोदी हे भारतातील प्रतिभावान फुटबॉलपटूचे नाव आहे का? असे आम्हाला कोणीतरी विचारले असता, आम्ही गूढ हसलो!! काय करणार? होय म्हटले असते तर पेनल्टी किक, "नाही' म्हटले तर पेनल्टी कॉर्नर!! असो!! 
आर्जेंटिना ह्या देशात कोणतेही आर्जंट काम आर्जंट करून मिळते, असा कोणाचा समज होईल. (आमचा झाला!!) पण वाचकहो, तसे नाही.

येथे काहीही आर्जंट होत नाही. जी-20 परिषद आटोपून आम्ही भारतात परत आलो, तेव्हा विमानातच नमोजीसाहेब आमच्या कानात पुटपुटले की, ""आर्जेंटिनामधी फुटबोलच्या क्रेझ घालवून योगाच्या क्रेझ आणला की नाय आणला? बोलो ने, आणला की नाय आणला?'' 

- ब्रिटिश नंदी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com