भारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)

भारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)

एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली.

जागतिक कुस्ती स्पर्धेत मात्र, त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्थात, त्याने गेल्या जागतिक स्पर्धेतील आपल्या पदकाचा रंग बदलून आपल्यातील सकारात्मक बदल दाखवून दिला. जागतिक स्पर्धेत दोन पदके मिळविणारा तो भारताचा पहिला कुस्तीगीर ठरला. 

वजनी गटात बदल झाल्यानंतर 65 किलो गटाची निवड करून त्याने राखलेले सातत्य कौतुकास्पद आहे. एका वर्षातील चार आंतरराष्ट्रीय पदके हा त्याच्या कारकिर्दीतील कळसाध्याय होता. खरे तर याचा पाया त्याने 2013मध्येच रचला. तेव्हा बुडापेस्टच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तो 60 किलो वजनी गटात ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. नंतर त्याने मागे वळून बघितलेच नाही. पाच वर्षांत तब्बल चौदा पदके मिळवून त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले.

एका वर्षात चार आणि जागतिक स्पर्धांत दोन पदके मिळविणारा पहिला भारतीय मल्ल ठरलेल्या बजंरगने आता 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे. जागतिक गुणांकनात तो शतकापासून केवळ चार गुणांनी दूर राहिला. लहान वयात इतकी मोठी मजल मारल्यानंतरही बजरंगचे पाय जमिनीवरच आहेत. 

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान हा कारकिर्दीमधील एक टप्पा मानणाऱ्या बजरंगचे ध्येय ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाचे आहे. कुस्तीगीर योगेश्‍वर दत्त याने बजरंगची तयारी पाहून स्वतः कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. बजरंगने योगेश्‍वरला गुरू केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून आपली कारकीर्द घडवली. गुरूचा विश्‍वास सार्थ ठरवत बजरंग आंतरराष्ट्रीय प्रवास करतो आहे. या मार्गात अनंत अडचणी आहेत; पण त्यावर मात करण्याचे तो प्रयत्न करतो आहे आणि योगेश्‍वर त्याला पैलू पाडण्याचे काम करतो आहे.

दोघांचेही ध्येय एकच- ऑलिंपिक पदक. त्यासाठी त्याला भक्कम पाठबळाची गरज आहे. यंदा देशातील सर्वोच्च "खेलरत्न' पुरस्कारासाठी बजरंगचा विचार झाला नाही. घरच्यांनी नाही; पण जगाने आता त्याचे कौतुक केले आहे. आता हेच अव्वल स्थान प्रेरणा मानून बजरंगने ऑलिंपिकमध्येही पदक मिळवावे यासाठी त्याला शुभेच्छा !
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com