भाष्य : क्षमताधारित वैद्यकीय शिक्षणाकडे

भाष्य : क्षमताधारित वैद्यकीय शिक्षणाकडे

भारतीय वैद्यकीय पदवीधारकांच्या चिकित्सालयीन अडचणी दूर करण्याची नितांत गरज आज जाणवत आहे. परिणामकारक संवाद कौशल्य, वैद्यकीय कर्मकुशलता, योग्य चिकित्सालयीन निर्णय घेणे, समुहामध्ये प्रभावीपणे काम करणे, व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन करणे अशा अनेक अपेक्षांची पूर्तता करावी लागते. संवादाच्या अभावामुळे सध्या समाजात कसे गंभीर प्रश्‍न निर्माण होत आहेत, हे पाहात आहोत.

वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये विविध प्रकारच्या वादांच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच संशोधनात वैद्यकीय व्यावसायिकांचे शिक्षण, त्यांनी दिलेल्या वैद्यकीय सेवा आणि समाजाच्या आरोग्यविषयक गरजा यात तफावत आढळून आली आहे. एकूणच हे चित्र बदलण्यासाठी जे प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यातील एक मुख्य भाग आहे तो अभ्यासक्रमांत योग्य तो बदल करण्याचा. 

टायलरने 1950 मध्ये क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षण ही संकल्पना मांडली. शिक्षण परिणामावर आधारित असावे, असे त्यांनी प्रस्तावित केले. प्रा. रॉबर्ट करोल यांनी संकल्पनेत मोलाची भर घातली. त्यानंतर 1978 मध्ये मॅकगॅजी एट अल यांनी क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणासंबंधी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तुलनेत एक विस्तृत वर्णनाची पद्धती दिली. दरम्यान, विसाव्या शतकाच्या शेवटी क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाची संकल्पना तयार झाली होती. 2004 मध्ये कॅनेडियन मेडिकल कौन्सिलने क्षमतांचा आराखडा (कॉम्पिटीसी फ्रेमवर्क) तयार केला. त्यांनी व्यापकपणे सहा भागामध्ये वैद्यकीय व्यावसायिकामध्ये आवश्‍यक असणाऱ्या क्षमतांचे वर्णन केले आहे. त्या क्षमता अशा ः आरोग्यासंबंधित मार्गदर्शक, परिणामकारक संवाद कौशल्य, व्यवस्थापकीय कुशलता, योग्य चिकित्सालयीन कुशलता, समूहामध्ये काम करणे, व्यावसायिक नीतीमूल्यांचे पालन करणे. 

भारतातील प्रचलित वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हा विषयकेंद्रित आहे. काही बाबतीत "इंटिग्रेशन' करण्यात आले आहे. त्यामुळे "भारतीय चिकित्सा परिषदे'ने क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षण सुरु करण्याबाबत ठरवले आहे. सी. बी. एम. ई. मध्ये अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट, योग्य शिकवणे, शिकण्याची पद्धती आणि मूल्यांकन पद्धतीचे वर्णन केले. क्षमतेवर आधारित अभ्यासक्रम हा समजण्यास सोपा आणि अंमलबजावणीसाठी सुलभ आहे. सक्षम भारतीय पदवीधर तयार करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा उद्देश "भारतीय चिकित्सा परिषदे'ने तयार केलेल्या एम. बी. बी. एस. या अभ्यासक्रमाच्या रचनेवरून येते. 

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रम तयार करणाऱ्या विभागाचे संचालक प्रा. डी. के. श्रीनिवास यांनी 2000 च्या दशकाच्या सुरवातीस वैद्यकीय शिक्षणाच्या ज्ञानात्मक, भावात्मक व कार्यात्मक या तीन "डोमेन'च्या आधारे वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, शिकवणे-शिकण्याच्या पद्धती आणि संनियंत्रणासाठीच्या मार्गदर्शनाच्या सूचना तयार केल्या होत्या. सध्या पदवी अभ्यासक्रमासाठी मेडीकल एज्युकेशन युनीट, प्रादेशिक केंद्रे आणि नोडल सेंटर यांच्या सहाय्याने क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाबाबतच्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु आहेत. क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवण्यासाठी मेडीकल एज्युकेशन युनीटमधील तज्ज्ञांची भूमिका महत्वाची आहे. अर्धवटपणे आणि अप्रभावीरित्या क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाचे अभ्यासकम राबवणे वैद्यकीय क्षेत्रासाठी धोकादायक ठरु शकते.

क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम राबवण्यासाठी चांगले आधारभूत प्रशासन व पुरेसे अनुभवी वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञांची मुलभूत गरज आहे. तसेच भारतीय चिकित्सा परिषदेकडून शैक्षणिक संस्थास्तरावर वेळोवेळी सहाय्य व मार्गदर्शन दिले जात आहे. परिषदेचे देशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वैद्यकीय शिक्षणाच्या परिभाषेमध्ये क्षमता म्हणजे, वैद्यकीय व्यावसायिकाच्या ज्ञानात्मक, भावात्मक, कार्यात्मक कौशल्यांची तसेच मूल्यावर आधारित समाजाच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी व समाजाच्या फायद्यासाठी कार्यक्षमतांची एकत्रितपणे निरीक्षण करण्यायोग्य आणि मोजता येणारी बाब आहे. 

वैद्यकीय शिक्षणातील क्षमता या नेमक्‍या व स्पष्टपणे तयार होण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे उद्दिष्ट स्पष्ट असणे आवश्‍यक आहे. वैद्यकीय शिक्षणातंर्गत विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे स्तर याप्रमाणे ः नवखा या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यास अपूर्ण ज्ञान असते व त्यावर निरीक्षणाची आवश्‍यकता असते, शिकाऊ अवस्थेत अल्प ज्ञान असते व छोट्या जबाबदाऱ्या निरीक्षणाशिवाय पार पाडू शकतो, क्षमतावानमध्ये चांगले ज्ञान असते. स्वतंत्र्यरित्या काम करु शकतो, कुशल सखोल ज्ञान प्राप्त झालेले दर्जेदार सेवा नियमित देऊ शकतो आणि तज्ज्ञ विषयाचे अधिक ज्ञान प्राप्त झालेले प्रत्येकवेळी उत्कृष्टपणे सेवा देण्यात सक्षम असतो. 

क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम राबवण्यासाठी कार्यप्रणाली राबवण्यात येते. ती अशी ः समाजाच्या आरोग्यविषयक समस्या व गरजा ठरवणे, वैद्यकीय व्यावसायिकांकडून समाजाला अपेक्षित क्षमता व त्यांचा दर्जा ठरवणे, अपेक्षित क्षमतेसाठीचे आवश्‍यक कौशल्य ठरवणे आणि क्षमतेवर आधारित वैद्यकीय व्यावसायिक तयार करण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे. 

भारतीय चिकित्सा परिषदेकडून देशस्तरावर क्षमतेवर आधारित अभ्यासक्रम राबवण्यासाठी विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश करुन बृहत्‌ आराखडा तयार केला आहे. अंमलबजावणीला चालना देण्याचे काम विद्यापीठे, नोडल सेंटर, रिजनल सेंटर आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रम समित्या करत आहेत. त्यासाठी विविध अभ्यासक्रम अंमलबजावणी समर्थन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

तसेच शिकणे-योग्य शिकवण्यासंबंधीचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावे. महाविद्यालयीनस्तरावर "बेसिक स्कील लॅब' तयार करण्यात येणार आहे. "ग्रॅज्युएट मेडीकल ÷एज्युकेशन रेग्युलेशन 2019' नुसार भारतीय वैद्यकीय पदवीधारक हा चिकित्सक आरोग्यसेवेचे नेतृत्व करणारा एक सदस्य, चांगला संवादक, नेहमी ज्ञानार्जन करणारा व व्यवसायाची मूल्ये जपणारा असावा याबाबत धोरणात्मक कार्यक्रम सुरु आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात भारतीय चिकित्सा परिषदेचे एम. सी. आय. "रिजनल सेंटर फॉर फॅकल्टी डेव्हलपमेंट इन मेडिकल एज्युकेशन सेंटर' हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. 

आयुर्वेदामध्ये क्षमतेवर आधारित वैद्यकीय शिक्षण आवश्‍यक असण्याबाबत संदर्भ उपलब्ध आहेत. सुश्रुत संहितेनुसार आयुर्वेदीय पदवीधारक वाक्‌सौष्ठव असणारा, शास्त्रार्थ माहिती असणारा आणि विविध वैद्यकीय सेवेसाठी आवश्‍यक कर्मामध्ये निपुण असणारा असावा, असे वर्णन केले आहे. अशा प्रकारे आयुर्वेदाने क्षमतेवर आधारित वैद्यकीय व्यवसाय असावा याबाबत मौलिक मार्गदर्शन केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुद्धा आयुर्वेद शिक्षणामध्ये क्षमतेवर आधारित आयुर्वेदिय चिकित्सक तयार करण्यासाठी आवश्‍यक अभ्यासक्रमाच्या मसुद्याचे नमुने भारतीय चिकित्सा परिषदेला उपलब्ध करुन दिले आहेत. 
...(लेखक नाशिकच्या "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'चे कुलगुरू आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com