राज यांचा "उत्तर भारतीय' बाणा! (मर्म)

Pune Edition Editorial Article Raj North Indian arrow on Marm
Pune Edition Editorial Article Raj North Indian arrow on Marm

शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या "मराठी बाण्या'चा मंत्र दिला आणि भूमिपुत्रांच्या हक्‍कांसाठी आपली सेना काम करणार, असे जाहीर केले. तेव्हापासून राज यांच्या "मनसे'ने मुंबईतील उत्तर भारतीयांच्या लोंढ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईत रोजीरोटीसाठी आलेल्यांना लक्ष्य केले होते.

खरे तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या संघटनेच्या "मराठी बाण्या'पासून थोडेफार दूर होत "मी मुंबईकर!' असा नारा दिला, तेव्हाच शिवसेनेत असूनही राज यांनी रेल्वेच्या नोकऱ्यांसाठी मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीयांच्या विरोधात मोहीम उभारून, उद्धव यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राज व त्यांची "मनसे' यांची प्रतिमा उत्तर भारतीय विरोधक अशीच झाली होती. मात्र, आता राज यांनी थेट उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन तेथे त्यांना आपली भूमिका समजावून सांगण्याचा निर्णय घेतला आहे. 

अर्थात, राज हे स्वत: उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करणार नसून, "उत्तर भारतीय महापंचायत संघ' या संघटनेने त्यांना हे निमंत्रण दिले आहे. दोन डिसेंबरला कांदिवली या मुंबईच्या पश्‍चिम उपनगरात या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. राज यांचा हा निर्णय आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवूनच घेतलेला आहे, यात शंका नाही. खरे तर गेली विधानसभा, तसेच मुंबई महापालिका या दोन निवडणुकांतील पराभवानंतर "मनसे'च्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे "येन केन प्रकारेण' प्रसिद्धीच्या झोतात राहणे आणि आपली संघटना सक्रिय असल्याचे दाखवून देणे, हेच गेल्या काही महिन्यांत राज यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचे निमंत्रण त्यांनी स्वीकारलेले दिसते.

आता प्रश्‍न एवढाच आहे की तेथे राज मराठीतून भाषण करतात की आपला "मराठी बाणा' बाजूस ठेवून राष्ट्रभाषेचा आश्रय घेतात? मात्र, या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्यासाठी "मनसैनिकां'ना दोन डिसेंबरपर्यंत वाट बघावी लागणार आहे! 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com