अमृतदान (पहाटपावलं)

अमृतदान (पहाटपावलं)

डॉ. किशोर व डॉ. लता मोहरील हे दाम्पत्य गेली 43 वर्षं नागपुरात यशस्वी पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. ज्या काळात नागपूरमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट कमी होते, तेव्हा अद्ययावत लॅबोरेटरी त्यांनी सुरू केली. त्यामुळे अल्पावधीतच त्यांचा जम बसला. साधी राहणी व उच्च विचार, हे त्यांचं वैशिष्ट्य. वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग अर्थार्जनासाठी नव्हे, तर रुग्णसेवेसाठी व्हावा, ही त्यांची धारणा. दोघांनीही गरिबी पाहिली होती. त्यामुळे भरपूर पैसा मिळाला, तरी तो अंगात आला नाही. दोघांचीही साठी आली, तोपर्यंत त्यांचा मुलगा डॉक्‍टर होऊन श्‍वसनरोगतज्ज्ञ म्हणून खासगी व्यवसायात स्थिरावला होता.

ईश्‍वरानं सर्व प्रकारचं दान त्या उभयतांच्या पदरात टाकलं होतं. समाजाचं आपण काही देणं लागतो, याबद्दल दोघांचंही एकमत होतं. दोघांचंही वय सारखं असल्यामुळे मुलानं त्यांची एकसष्टी एकत्र साजरी करायचं ठरवलं. इष्टमित्र व नातेवाईक यांच्या साक्षीनं समारंभ धडाक्‍यात साजरा झाला. शेवटी सुख सुख म्हणतात ते काय असतं? एकुलता एक यशस्वी मुलगा, त्याची पत्नी, नातू आणि आर्थिक सुबत्ता तर होतीच. किशोरला मधुमेह असला, तरी तो आटोक्‍यात होता. अशा सुखाच्या परमोच्च क्षणी दोघांनी जगावेगळा निर्णय घेतला. उभयतांचा मित्र डॉ. रवी वानखेडे यानं आपले एक मूत्रपिंड एका मित्रासाठी दिल्याचं त्यांना माहीत होतं. तो धागा घेऊन उभयतांनी मूत्रपिंडाचं दान करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यावर मुलगा व सून यांच्या कानावर तो घातला. तो ऐकल्यावर त्यांना काळजी वाटणं साहजिक होतं. कारण, या प्रक्रियेमधील धोके त्यांना माहिती होते. पण, आई-बाबांच्या दृढनिश्‍चयाला त्यांनी साथ दिली. या प्रक्रियेत बऱ्याच किचकट समस्या असतात. मूत्रपिंडाचं दान आर्थिक लाभासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली नाही, याची कायदेशीर पद्धतीनं खात्री करून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती असते. तिची खात्री पटावी लागते.

मूत्रपिंड काढण्याच्या किशोरवरील शस्त्रक्रियेला चार तास लागले. त्याच्या मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया नेहा नामक रुग्णामध्ये करायला पाच तास लागले. आठ दिवसांनंतर किशोरला घरी जायला परवानगी मिळाली. पुढे एकाच मूत्रपिंडावर जगायचं असल्यामुळे आयुष्यभर पथ्यपाणी सांभाळायचं बंधन होतं. दीड महिना विश्रांती घेऊन किशोर पुन्हा आपल्या लॅबोरेटरीत रुजू झाला.

काही दिवसांनी डॉ. लतानंही दुसऱ्या रुग्णाला आपलं मूत्रपिंड देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मूत्रपिंड दान करण्यासाठी या दाम्पत्यानं पैसे घेतले नाहीत. त्यामुळेच हे दान अमूल्य आहे. या दानामुळे कोणताही संबंध नसलेल्या दोन गरजूंना जीवनदान मिळालं. त्यामुळे मी याला अमृतदान म्हणतो. हे असं आगळंवेगळं दान देणारं हे दाम्पत्य आशियातील पहिलं दाम्पत्य आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com