अग्रलेख : आम्ही एक अधिक पाच!

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास दीड महिना उलटला, तरी काँग्रेसमधील गोंधळात गोंधळ सुरूच होता. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस आघाडी सरकार कोसळण्याची वेळ आली आणि गोव्यातील 15 पैकी दहा आमदारांनी भाजपचा रस्ता धरला. तरीही काँग्रेस नेते आपापल्या पदांचा राजीनामा देण्यापलीकडे काही करायला तयार नव्हते.

या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसची फेररचना करण्यासंबंधात काँग्रेस श्रेष्ठींनी उचललेल्या पावलांचे स्वागतच करायला हवे! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि भाजपने बैठकींचे सत्र सुरू केले आहे. तर राज्यातील उरल्या सुरल्या विरोधी 'स्पेस'वर कब्जा करण्याच्या हेतूने शिवसेनेने येत्या बुधवारी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून रस्त्यावर उतरत मोर्चा काढायचे ठरवले आहे. या पार्श्‍वभूमीवर अशोक चव्हाण यांच्या हातातून प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत असलेले बाळासाहेब थोरात यांच्यापुढे कोणते आव्हान उभे आहे, ते सहज लक्षात येते.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे गलितगात्र झालेल्या अशोकरावांच्या तुलनेत कॉंग्रेसने आता थोरात यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक स्वच्छ चेहरा देऊ केला आहे. कॉंग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सगळे काही सामसूम वातावरण होते. त्यामुळे आता महाराष्ट्र कॉंग्रेसच्या झालेल्या या संपूर्ण फेररचनेमुळे किमान या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत आणि त्यांची थोडीफार का होईना, आपण दखल घेऊ इच्छितो, एवढा 'मेसेज' तरी कार्यकर्त्यांपुढे पोचला आहे. त्यामुळेच आता थोरात आणि त्यांची नवी 'टीम' धडाडीने कामास लागेल, अशी आशा करायला हरकत नसावी. 

बाळासाहेब थोरात हे पिढीजात निष्ठावान काँग्रेसी आहेत आणि त्यांनी राज्यात महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांना राज्याचा आवाकाही आहे. मात्र, त्यांच्यापुढील पहिले आव्हान हे त्यांच्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसला संजीवनी देणे, हेच असणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर राज्यातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आपले चिरंजीव सुजय यांना भाजपची उमेदवारी मिळवून दिली आणि स्वत: थेट भाजपच्या कार्यालयात बसून सूत्रे हलवण्यास सुरवात केली आणि नगर जिल्ह्यातील अर्धी-आधिक कॉंग्रेस भाजपमध्ये नेली. तरीही कॉंग्रेस हायकमांड स्वस्थचित्तच होती.

पुढे विखे यांनी स्वत:च भाजपप्रवेश करत सत्ताही मिळविली. त्यामुळे थोरात यांना अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या नगरमध्ये काँग्रेसला जीवदान मिळवून देणे, याबरोबरच राज्यात पक्षाची पूर्णपणे विस्कटलेली घडी नव्याने बसवण्याचे अवघड काम करावे लागणार आहे. यासाठी त्यांच्या दिमतीला पक्षाने पाच कार्याध्यक्षही दिले आहेत! हा पायात पाय घालण्याचा खेळ तरी नाही ना, अशी शंका सहज घेता येत असली तरीही यशोमती ठाकूर, नितीन राऊत, विश्‍वजीत कदम, बसवराज पाटील आणि मुझफ्फर हुसेन हे तुलनेने तरुण कार्यकर्ते कार्याध्यक्षपदी निवडले गेल्यामुळे त्यांच्यावरही पक्षाला उभारी देण्याची मोठी जबाबदारी आली आहे. त्याचवेळी हायकमांडने सहा निवडणूक समित्याही जाहीर करत पक्षातील विविध जातीसमूहांचे संतुलनही कौशल्याने सांभाळले आहे.

मराठा समाजातील प्रदेशाध्यक्ष नेमतानाच सुशीलकुमार शिंदे यांच्यावर पक्षात समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे; तर पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांशी सलोखा साधण्याचे काम करताना डॉ. रत्नाकर महाजन यांना आपला चेहरा हसरा ठेवत पत्रकारांशी दोस्ताना निर्माण करावा लागणार आहे. विदर्भातील धडाडीचे नेते नाना पटोले हे प्रचार समिती प्रमुख झाल्यामुळे किमान प्रचारात तरी जान असेल, अशी आशा करता येते. 

आता या साऱ्या बड्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागावाटप करतानाच, प्रकाश आंबेडकर यांच्या "वंचित बहुजन विकास आघाडी'बरोबर जायचे का नाही, हा तिढाही सोडवावा लागणार आहे. खरा प्रश्‍न आहे तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत यायला उत्सुक असलेल्या राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे की नाही, हा आहे. लोकसभा निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका करण्याचे काम मोठ्या हिमतीने केले होते आणि आता थेट सोनिया गांधी यांची भेट घेऊन, त्यांनी आघाडीचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे थोरात यांच्या या 'टीम महाराष्ट्रा'पुढे अनेक आव्हाने आहेत. त्यात पुन्हा कॉंग्रेसला अध्यक्ष नाही आणि या 'टीम'मध्येच काही कारणांनी मतभेद झाले, तर त्यातून मार्ग काढू शकेल, असा हायकमांडमध्ये नेताही नाही. त्यामुळे त्यांना परत कॉंग्रेसचे केवळ 'चार आणे सदस्य' असलेल्या गांधी घराण्यापुढेच जावे लागू शकते. हे सर्व टाळायचे असेल तर पक्षातील पारंपरिक गटबाजी आणि घराणेशाही यांना दूर सारत या नव्या संघाला काम करावे लागणार आहे.

अर्थात, थोरात, सुशीलकुमार तसेच पृथ्वीराज यांनी सर्व तरुणांना बरोबर घेऊन काम केले, तरच स्वत: थोरात यांनी सांगितल्याप्रमाणे 'विधानसभेत चित्र वेगळे असेल!' त्यादृष्टीने नवे अध्यक्ष आणि त्यांचे पाच सहकारी आम्ही 'एक अधिक पाच' अशा भावनेने काम करतात का, आणि तीच एकजुटीची भावना खालपर्यंत झिरपवतात का, हे आता पाहायचे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com