अलिप्ततेमधली कोवळीक

sonali navangul
sonali navangul

मुलं घरी जाण्यासाठी थोडी अस्वस्थ होती; पण अंबिकानं त्यांना सांगितलं होतं, ‘तुमची मैत्रीण आलीय आपल्या औरंगाबादमध्ये. ती गाणं ऐकणारंय तुमचं नि म्हणणारपण आहे. तुमची ग्रीटिंग्ज, कानातली-गळ्यातली, पणत्या सगळं दाखवा तिला. ती खूश होईल.’ केवळ ती सांगतेय म्हणून मुलं थांबलेली.

‘आरंभ’ शाळेच्या हॉलमध्ये सगळी गोल करून खुर्च्यांमध्ये नि भिंतीशी लावलेल्या बेंचवर बसली होती. मी हे जग ऐकून व किंचित पाहून होते. ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्न मुलांचं व त्यांच्या शिक्षकांचं हे जग. स्वत:च्या विशिष्ट जगात मश्‍गुल असलेली ही मुलं-मुली. डोळ्यांत थेट पाहू शकतातच असं नाही. सांगायचं बरंच काही असतं, पण ते सांगण्यासाठी शब्द किंवा स्पर्शाचं माध्यम वापरताच येईल असं नाही. प्रतिसादातल्या या गोंधळामुळं बरेचदा या मुलांना मतिमंद समजलं जातं. पण तो वेगळा विषय. प्रत्येकानं नाव सांगितलं. त्या मुला-मुलीतलं काय विशेष हेही त्यातल्या त्यात समाजशील होऊ शकलेली मुलं सांगत होती. एक जण दहावीला बसलेला. गणित त्याचा प्रचंड आवडता विषय. एक जण अप्रतिम गायली. ती शास्त्रीय, सुगम संगीत शिकते; पण गाणं लक्षात राहण्यासाठी वहीवर लिहून घेणं इतका सोपा मार्ग तिला उपलब्ध नाही. सलमान म्हणजे एकाचा जीव की प्राण. त्यानं हातात निळ्या लांबुडक्‍या खड्याची साखळी घातली होती नि गॉगल मागे शर्टाच्या कॉलरला अडकवलेला. त्यानं काही डायलॉग म्हणून दाखवले. मी त्यांच्याकडं लक्ष देऊन पाहत होते. ती नजर चुकवत होती, किंचित पुढे झाल्यावर मुलांनी अंग चोरलं किंवा नाही यावरून ती मला स्वीकारू पाहताहेत की नाहीत याचा मला अंदाज येत होता. अंबिका टाकळकर नि तिचे सहकारी यांनी विकसित केलेल्या कितीतरी पद्धतींमुळे ही मुलं इतपत तरी मोकळी होत होती; नाहीतर एकदमच आलेली नवी माणसं नि नवी जागा या मुलांना बुचकळ्यात टाकते. तिथं ती मग एकदम अनोळखी प्रदेशात गेल्यासारखी अधिक थिरथिरी किंवा टोकाची अलिप्त होऊन जातात. त्यांच्या अलिप्ततेत खूप संयमानं प्रवेश केला की कोवळ्या जागा हातात येऊन प्रसन्न वाटू लागतं.

मला शाळा फिरवून दाखवण्यासाठी आकाशनं व्हीलचेअर धरली. मी म्हटलं, ‘रॅम्प कठीण आहे. कसं जमणार?’ म्हणाला, ‘क्‍यों नहीं जमेगा? हो जायेगा’. पुढे शाळेसाठी नव्या इमारतीचा विषय निघाला. म्हणाला, ‘क्‍यों नहीं बनेगी इमारत? जरूर बनेगी!’ तेच ते करणं-बोलणं हा त्याचा सिन्ड्रोम. पण त्यानं निवडलेलं वाक्‍य? क्‍या बात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com