व्यायामाला जोड योग्य आहार अन्‌ झोपेची (अभिजित श्‍वेतचंद्र)

abhijeet shwetchandra
abhijeet shwetchandra

फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही.

आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम चांगलं करणं म्हणजेच वेलनेस. त्यासाठी डोक शांत ठेवणं, नियमित व्यायाम करणं, पुरेसा आहार आणि झोप घेणं गरजेचं असतं. कोणतंही काम करताना मानसिक आणि शारीरिक फिट राहणं गरजेचं आहे. त्यातच मी अभिनय क्षेत्रामध्ये असल्यानं मला अनेक गोष्टींची पथ्यं पाळावी लागतात. डाएटबाबत माझ्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात मी सहा वेळा थोडा-थोडा आहार घेतो. म्हणजेच दर तीन-तीन तासांनी माझ्या पोटात काही ना काही जात असतं. अनेक जणांनी डाएटची व्याख्याच बदलवली आहे. डाएट म्हणजे कमी खाणं नव्हे. आपली शरीरयष्टी अन्‌ उंचीनुसार आपल्या शरीराला प्रोटिन आणि कार्बोहायड्रेट्‌सची गरज असते. आपल्या शरीरानं उत्तम रीतीनं काम करण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळं शरीरयष्टी तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो.

मी माझ्या शरीरसंपदेला खूपच जपतो. त्यासाठी वेळांचं काटेकोरपणे पालन करतो. सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक-सव्वा तास वर्कआऊट करतो. त्याचबरोबर योगासनं आणि प्राणायामही करतो. त्यामुळं मला मन:शांतीसाठी मदत होते. माझं जिमही ठरलेलं असतं. कार्डिओ फिटनेससाठी, तर वेट ट्रेनिंग मसल्ससाठी घेतो. जिममुळं शरीराला शेप येतो आणि ते मस्क्‍युलर राहतं. योगासनांमुळं शरीरयष्टी फ्लेक्‍झिबल आणि आकर्षक होते. या दोन्हींचा संगम केल्यानंतर मस्क्‍युलर बॉडी फ्लेक्‍झिबल होते. विशेष म्हणजे माझ्या व्यायामामध्ये कधीच खंड पडत नाही. व्यायामामुळं माझा चेहरा फ्रेश राहतो. तसंच मसल्स नेहमीच ऍक्‍टिव्ह राहतात. जिम अन्‌ योगासनांबरोबरच मी स्विमिंगही करतो. त्यामुळं स्नायू रिलॅक्‍स होतात. रनिंगही करतो आणि सायकलिंगही करतो. ठाणे जिल्ह्यात मी सायकलिंगमध्ये सलग तीन वर्षं पहिला आलो होतो. व्यायामाच्या या सर्व प्रकारांमुळं माझी शरीरसंपदा सुदृढ झाली आहे.

आपल्या शरीरासाठी व्यायामाप्रमाणं आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. सकाळी माझ्या नाश्‍त्यामध्ये ओट्‌स, अंडी, केळी असतात. मात्र, पाव, पिझ्झा, बर्गर खायचं मी टाळतो- कारण ते पचनालाही जड जातात. पापड, उडदाचे पदार्थही मी खात नाही. हेल्दी फूड खाण्यावरच माझा भर असतो. दररोज सात लिटर पाणी पितो. उन्हाळ्यामुळं नारळ अन्‌ ग्लुकॉन-डी पिण्यावरही माझा भर असतो. त्याचप्रमाणं दररोज सकाळी नियमितपणे एक सफरचंद खातो. खरं तर माझं डाएट मेंटेन करण्याचं काम माझी आईच करते. माझा सकाळचा नाश्‍ता, दुपारचं जेवण; तसंच सायंकाळी आणि रात्री काय पाहिजे याचं सर्व नियोजन आईचं करत असते. चित्रीकरणाला जाताना आई तीन-चार डबे देते. त्यात परिपूर्ण आणि पोषक आहार असतो. मी सेटवरचे कोणतेही पदार्थ खात नाही. रात्री झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर काहीही खात नाही. सकाळचा ब्रेकफास्ट भरपूर असतो. त्यानंतर हळूहळू आहार कमी करत जातो. कारण, दुपारनंतर आपली पचनशक्ती कमी होत जाते. त्यावेळी पोट शांत ठेवणं खूप गरजेचं असतं. माझा मित्र परिवारही अभिनय क्षेत्रातला आहे. तेही फिटनेसबाबत जागरुक असतात. त्यामुळं त्यांच्या चांगल्या गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.

अभिनय करताना मला वजन कमी आणि जास्त करण्याचे प्रसंग आले होते. "गणपती बाप्पा मोरया' या मालिकेमध्ये मी महादेवाची भूमिका साकारली होती. खरं तर शंकर महादेवाची भूमिका साकारणं म्हणजे दिव्यच होतं. कारण महादेव हे पहिले योगी. त्यामुळं या भूमिकेसाठी मला खूपच तयारी करावी लागली. व्यायामसाधनेसह योग आणि मेडिटेशनही मी करू लागलो. त्यामुळं स्वत:च्या मनावर ताबा मिळवण्यात यशस्वी झालो. या मालिकेचं चित्रीकरण दिवस-रात्र सुरू होतं; पण योग आणि मेडिटेशनमुळं माझी कधीच चिडचिड झाली नाही. कलाकारांसाठी या गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. मानसिक संतुलन उत्तम राहणं ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.

"तालीम' चित्रपटाच्या वेळी तर माझी खरी कसोटी लागली. हा चित्रपट कुस्तीवर आधारित आहे. त्यावेळी माझं वजन 70 किलो होतं; पण ते मुख्य भूमिकेसाठी सूट होत नव्हतं- कारण त्यात मी कुस्तीपटूची भूमिका साकारणार होतो अन्‌ त्यासाठी मला खरोखरच्या पैलवानासारखं दिसणं गरजेचं होतं. त्यामुळं दिग्दर्शक नितीन रोकडे यांनी मला वजन वाढवण्यास सांगितलं. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल- मी पाच ते सहा महिन्यांमध्ये तब्बल 25 किलो वजन वाढवलं. चित्रीकरण सुरू झालं, तेव्हा माझं वजन 95 किलो होतं; पण त्यासाठी मला खूप काम करावं लागलं. पुण्यातल्या गोकुळ वस्ताद तालमीत मी शरीरसंपदावाढीचे धडे घेतले. तुपातलं मटण अन्‌ तुपातला शिरा हा माझा नियमित आहार होता. त्याचबरोबर झोपही महत्त्वाची होती. या सर्व गोष्टी मी प्रकर्षानं अन्‌‌‌ तंतोतंत पाळल्या. त्यामुळं हे सर्व काही शक्‍य झालं. मात्र, त्यानंतर "बाजी' या मालिकेमधल्या बाजीच्या मुख्य भूमिकेसाठी मला वजन कमी करावं लागलं. वाढवलेलं वजन कमी करणं माझ्यासाठी आव्हानंच होतं- कारण मला त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागणार होत्या; पण मी सात किलो वजन कमी केलं. बाजीची शरीरयष्टी मावळ्यासारखी हवी होती. त्यांना पैलवान नको होता. त्यामुळं मी वजन कमी केलं.

सध्या मी "झी युवा' या वाहिनीवर "साजना' या मालिकेत प्रताप नावाची मुख्य भूमिका साकारत आहे. यातही माझ्या शरीरावर वेगळाच प्रयोग करावा लागला. वजन तेवढंच ठेवून गावातल्या युवकाचा लूक देण्यात आला. त्यासाठीही थोडंसं वर्कआऊट करावं लागलं. हा युवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. या भूमिकेसाठी मी पालघरमधल्या एका सेंद्रीय शेतीच्या फार्मला भेट दिली. त्यापासून काय फायदे होतात, हे स्वत: अनुभवलं. आजूबाजूची शेती अन्‌ सेंद्रीय शेतीची तुलना केल्यानंतर असं लक्षात आलं, की सेंद्रीय शेतीमधून जास्त उत्पन्न अन्‌ हेल्दी फूड मिळतं. त्यामुळं या मालिकेच्या माध्यमातून मी युवकांना सेंद्रीय शेतीकडं वळण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. रासायनिक शेतीमुळं भाजीपाल्यासह फळांतही रसायनं उतरतात. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळं युवकांना सेंद्रीय शेतीकडं वळून आपली शरीरसंपदा चांगली ठेवण्यासाठी हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे. तेच तुमचं व्यक्तिमत्त्व अन्‌ शरीरयष्टी चांगलं बनवल्याशिवाय राहणार नाही.

एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की लहानपणी मला थोडंसं लागलं वा आजारी पडलो तरी डॉक्‍टरांकडं जाऊन औषधं घ्यावी लागत होती. मात्र, दहावीनंतर मी व्यायाम करू लागलो. तेव्हापासून मला डॉक्‍टरांकडं फारसं जावं लागलं नाही. "बाजी' या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं, त्यावेळी मी तब्बल नऊ-दहा महिने पायांमध्ये चप्पल घातली नाही. अनेकदा घोड्यावरूनही पडलो. दुखापतीही झाल्या. किरकोळ जखमीही झालो. मात्र, नियमित व्यायामांमुळे शारीरिक शक्ती इतकी वाढली, की मला कधीच चित्रीकरण बंद करावं लागलं नाही. फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या "वेलनेस'चा मंत्र आहे आणि हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com