आरएफआयडी (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

आपण खरेदी करण्यासाठीच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग दुरूनच वाचतो आणि त्यावरून त्याला त्या ट्रॉलीत कोणत्या वस्तू आहेत ते कळतं. यानंतर किंमत ठरवणं, बिल बनवणं वगैरे बाकीची प्रक्रिया पूर्वीसारखीच होते. फक्त आता आरएफआयडी टॅग लावलेली प्रत्येक वस्तू बाहेर काढून स्कॅन करायची गरज पडत नाही. आपण सरळ ट्रॉली ढकलत त्या आरएफआयडी रीडरजवळून जायचं. आपल्याला ताबडतोब आपलं बिल मिळतं. थोडक्‍यात यामुळे सगळ्या दुकानांमधल्या बिलांच्या रांगा एकदम नष्टच होतील!

आपण कुठल्याही सुपर मार्केटमध्ये गेलो, की वस्तू खरेदी केल्यावर चेक आऊट काउंटरपाशी बरेचदा एक भली मोठी रांग असते. आपला नंबर आल्यावर आपण खरेदी केलेली प्रत्येक वस्तू काउंटरवरचा माणूस उचलतो आणि त्यावर छापलेला बारकोड काउंटरवरच्या बारकोड रीडरपाशी नेतो. बारकोड रीडर तो बारकोड वाचतो आणि कॉम्प्युटरकडे पाठवतो. त्या कोडवरून ती वस्तू कोणती आहे, हे त्या कॉम्प्युटरला समजतं. त्या कॉम्प्युटरवर त्या वस्तूची किंमत आणि स्टोअरमध्ये अशा अजून किती वस्तू शिल्लक आहेत (त्या वस्तूचा इन्व्हेंटरी बॅलन्स) याची माहिती साठवलेली असते. या माहितीचा वापर करून कॉम्प्युटर त्या वस्तूची किंमत ठरवतो आणि आपल्या बिलात मिळवतो. आपण विकत घेतलेल्या सगळ्या वस्तू अशा तऱ्हेनं संपल्या, की तो माणूस आपल्याला बिल देतो. हे करत असताना कॉम्प्युटर त्या वस्तूचा इन्व्हेंटरी बॅलन्स आपण त्या वस्तूचे जितके नग घेतले असतील तितक्‍या संख्येनं कमी करतो. अशा तऱ्हेनं कॉम्प्युटरला दर क्षणाला प्रत्येक वस्तूचे किती नग दुकानात शिल्लक आहेत ते कळतं आणि जेव्हा ते प्रमाण एका ठराविक पातळीपेक्षा कमी शिल्लक राहतं (यालाच "रीऑर्डर लेव्हल' असं म्हणतात.), तेव्हा तो कॉम्प्युटर आपल्या सप्लायरला त्या वस्तूची नवीन ऑर्डर देतो. हे सगळं बारकोडमुळे शक्‍य होतं. बारकोडचं पेटंट सन 1952मध्ये घेतलं गेलं असलं, तरी बारकोड 1970 च्या दशकात लोकप्रिय झाले; पण त्यात प्रत्येक वस्तू त्या बारकोड रीडरपाशी नेऊन स्कॅन करावी लागे.

हे स्कॅनिंग टाळता येईल का आणि यावर साधारणपणे रडारसारखंच असलेलं रेडिओ फ्रीक्वेन्सीचं (RF) तंत्र वापरता येईल का यावर विचार सुरू झाला. दुकानातून कोणी काही वस्तू चोरून नेऊ नये यासाठी हेच RF तंत्र वापरण्यात येतं. समजा दुकानातून बाहेर पडण्याच्या दाराच्या दुकानाच्या बाजूला एक RF ट्रान्समीटर बसवलाय आणि बाहेरच्या बाजूला एक RF रिसिव्हर बसवलाय. आता स्टोअरमधल्या प्रत्येक वस्तूवर एक विशिष्ट प्रकारचा RF टॅग लावायचा. कित्येक वाचनालयं; तसंच कपडे आणि पुस्तकांची दुकानं असे लहानसे टॅग्ज पुस्तकांच्या आत किंवा सीडीज आणि कपडे यांच्यावरही लावतात.

जेव्हा एखादा माणूस एखादी वस्तू चोरून नेत असेल, तेव्हा तो दारापाशी पोचताच त्या RF ट्रान्समीटरकडून रेडिओलहरी निघून त्या वस्तूवरच्या RF टॅगपर्यंत पोचतात आणि त्या परावर्तित होऊन दाराजवळच्याच RF रिसिव्हरपर्यंत पोहोचतात आणि एक सर्किट पूर्ण होऊन त्या यंत्रणेतून गजर वाजतो. मात्र, आपण एखादी वस्तू विकत घेऊन त्याचे पैसे दिल्यांनतर त्या चेक आऊट काउंटरपाशी त्या वस्तूवरचा हा RF टॅग एका विशिष्ट तंत्रानं डीऍक्‍टिव्हेट करता येतो. त्यामुळे असा माणूस जरी बाहेर जाण्याच्या दारातून बाहेर पडला, तरी आता गजर होत नाही. RF टॅग्जना "ट्रान्सपॉन्डर्स' किंवा "चिपलेस RFID टॅग्ज' असंही म्हणतात.

टॅगची ही यंत्रणा चांगली आहे आणि उपयुक्तही आहे. याचं कारण यामुळे दुकानातल्या चोऱ्या कमी होतात. मात्र, यामध्ये एक प्रश्न उरतोच. तो म्हणजे या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूवर बसवण्यात येणारा टॅग सारखाच असतो. त्यामुळे या यंत्रणेला कुणीतरी काहीतरी चोरलंय हे कळतं आणि त्याप्रमाणे ती यंत्रणा आपल्याला सावधही करते; पण यामध्ये नेमकं काय चोरीला गेलंय हे मात्र कळत नाही आणि या यंत्रणेचा बिल बनवण्यासाठी किंवा इन्व्हेंटरी घेण्यासाठी उपयोग होत नाही. मात्र, जर ती वस्तू कुठली आहे हे तो टॅग वाचून त्या यंत्रणेला कळू शकलं (बारकोडमध्ये होतं तसंच), तर ते जास्त फायद्याचं ठरेल हे लक्षात आल्यामुळेच "रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन'च्या (आरएफआयडी-RFID) कल्पनेचा विकास झाला.
अशी कल्पना करा, की त्या बारकोडऐवजी आपण प्रत्येक वस्तूवर एक आरएफआयडी टॅग लावलाय. आरएफआयडी टॅग म्हणजे इंटेलिजंट आणि रिमोट बारकोड. आता समजा त्या काउंटरपाशी एक आरएफआयडी रीडर आहे. आपण जेव्हा आपल्याला खरेदी करायच्या सगळ्या वस्तू ट्रॉलीत भरून चेक आऊट काउंटरवरून जातो, तेव्हा तो आरएफआयडी रीडर आपल्या ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूचा आरएफआयडी टॅग दुरूनच वाचतो आणि त्यावरून त्याला त्या ट्रॉलीत कोणत्या वस्तू आहेत ते कळतं. यानंतर किंमत ठरवणं, बिल बनवणं वगैरे बाकीची प्रक्रिया पूर्वीसारखीच होते. फरक हाच, की आता आरएफआयडी टॅग लावलेली प्रत्येक वस्तू बाहेर काढून स्कॅन करायची गरज पडत नाही. आपण सरळ ट्रॉली ढकलत त्या आरएफआयडी रीडरजवळून जायचं. आपल्याला ताबडतोब आपलं बिल मिळतं. थोडक्‍यात यामुळे सगळ्या दुकानांमधल्या बिलांच्या रांगा एकदम नष्टच होतील!

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये एचएसबीसी, बार्कलेज, सिटीबॅंक यासारख्या अनेक बॅंका अलीकडे आरएफआयडी चिप असणारी कार्डस्‌ देतात. हे कार्ड टर्मिनलसमोर फिरवून पेमेंटही करता येतं. या पेमेंटच्या क्‍लिअरिंगची प्रक्रिया नेहमीच्या क्रेडिट/डेबिट कार्डच्या प्रक्रियेसारखीच असते. याशिवाय स्टोअर्ड व्हॅल्यू कार्डमध्येही आता आरएफआयडीचा वापर व्हायला लागला आहे. या प्रकारच्या कार्डमध्ये पैसे एका प्रकारे कार्डमध्येच भरून ठेवलेले असतात. याचाच अर्थ ते कुठल्याही बाहेरच्या अकाउंटशी जोडलेले नसतात आणि त्यामुळे पेमेंट करताना कुठल्याही नेटवर्कची गरज भासत नाही!! हॉंगकॉंगमध्ये लोकप्रिय असणारं ऑक्‍टोपस कार्ड, लंडनमधल्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी वापरलं जाणारं ऑईस्टर कार्ड ही कार्डस्‌ याच प्रकारात मोडतात.
आरएफआयडी टॅग्ज हे पॅसिव्ह किंवा ऍक्‍टिव्ह असू शकतात. पॅसिव्ह टॅग्जमध्ये बॅटरीज नसतात. ट्रान्समीटरकडून जेव्हा रेडिओ लहरी टॅगपर्यंत येतात, तेव्हा या लहरींकडून या पॅसिव्ह टॅगला ऊर्जा (पॉवर) मिळते. पॅसिव्ह टॅगकडून सिग्नल खूपच कमी अंतरापर्यंत जाऊ शकतात. ट्रान्समीटरकडून येणाऱ्या रेडिओ लहरी पकडण्यासाठी पॅसिव्ह टॅगमध्ये एक अँटेना असते. तसंच त्यावर ती वस्तू ओळखण्यासाठी ज्यात एक आयडेंटिटी कोड (आयडी) साठवून ठेवलंय अशी एक चिप असते. ऍक्‍टिव्ह टॅग्जमध्ये पॅसिव्ह टॅग्जपेक्षा जास्त प्रगत (ऍडव्हान्स्ड) चिप्स आणि अगदी लहान बॅटरीजही असतात. हे टॅग्ज बऱ्याच अंतरापर्यंत सिग्नल्स पाठवू शकतात किंवा रिसिव्हही करू शकतात. त्यांच्यामध्ये 2 किलोबाइट्‌सपर्यंत डेटाही ठेवता येतो.
आपण हॉटेलमध्ये राहताना आपल्याला एक कार्ड दिलेलं असतं. ते कार्ड तिथल्या रीडरच्या जवळ नेलं तरच ते दार उघडतं. हे झालं पॅसिव्ह टॅगचं उदाहरण. हे टॅग्ज खूप कमी अंतरावर चालतात. या उलट जर टॅग ऍक्‍टिव्ह असेल, तर ते कार्ड फक्त खिशात ठेवून जरी दार ढकललं तरी ते दार उघडतं. पॅसिव्ह टॅग्ज हे टिकाऊ नसतात. ते चट्‌कन खराब होऊ शकतात; आणि नष्टही केले जाऊ शकतात; पण ऍक्‍टिव्ह टॅग्ज जास्त टिकतात. पॅसिव्ह टॅग्ज रीडरच्या अगदी जवळ न्यावे लागत असल्यामुळे त्यांचा वापर किंवा उपयोग अगदी मर्यादितच होतो. ऍक्‍टिव्ह टॅग्जचं तसं नसतं. उदाहरणार्थ, सप्लायरकडून माल आल्यानंतर कुठल्या वस्तू आणि त्याचे किती नग आलेले आहेत हे आपल्याला दुरूनच रीडरचा वापर करून वाचता येतं आणि कॉम्प्युटरमध्ये साठवताही येतं. हे पॅसिव्ह टॅग्जमध्ये शक्‍यच नसतं.

याच आरएफआयडी टॅगचा वापर अलीकडे टोलवसुलीकरताही होतो. टोल भरण्यासाठी प्रत्येक टोल नाक्‍यापाशी गाड्यांची इतकी गर्दी असते, की त्यासाठी अनेक लोकांचे रोज हजारो तास वाया जातात. शिवाय त्यावेळी बरेचदा गाडी सुरू सुरू ठेवल्यामुळे इंधनही खर्च होतं आणि प्रदूषणही वाढतं. त्यावर आरएफआयडी टॅग्जचा उपाय निघाला आहे. हे टॅग्ज प्रत्येकानं आपल्या गाडीवर समोरून व्यवस्थित दिसतील असे लावायचे. भारतामध्ये रस्त्यांवरच्या टोल नाक्‍यांवर आपल्याला ETC tag चं चिन्ह असणारी एक रांग दिसते. ETC tag म्हणजे आरएफआयडीमधला पॅसिव्ह प्रकारचा टॅग. याचा वापर करून टोलवर पैसे भरताना या टॅगशी जोडल्या गेलेल्या प्रीपेड किंवा सेव्हिंग/करंट अकाउंटमधून आपोआपच पैसे कमी होतात. आता जेव्हा ही मोटारगाडी टोल नाक्‍यापाशी जाते, तेव्हा आरएफआयडी टॅग असलेल्या गाड्यांसाठी असणाऱ्या रांगेतून आपण आपली गाडी नुसती नेली, तरी त्या काउंटरवर असलेला रीडर आपला टॅग स्कॅन करून वाचतो; आणि तो त्याच्याकडे असलेल्या डेटाबेसशी जुळवून पाहतो. तो जुळला, की आपले पैसे कापले जातात आणि आपल्याला जाऊ देण्यात येतं.
आता तर आरएफआयडी टॅग्जचा वापर अनेक ठिकाणी केला जातोय. गुरांना किंवा पाळलेल्या प्राण्यांना हे टॅग्ज बसवले म्हणजे ते चरायला किंवा फिरायला दूरवर गेले तरी त्यांना ट्रॅक करता येतंच; पण ती वेगवेगळी ओळखताही येतात. शिवाय त्या टॅग्जमध्ये त्यांच्याबद्दल काही वैद्यकीय आणि इतरही माहिती भरून ठेवता येते. काही वेळा लहान मुलं खेळता खेळता हरवतात. ती कुठं आहेत हे कळावं यासाठीही आरएफआयडी टॅग्ज वापरता येतात. स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर्स झालेल्या माणसांना आपण कुठं आहोत याचं भान नसतं. त्यांच्यासाठीही आरएफआयडी टॅग्जचा उपयोग करता येतो. मात्र, माणसांवर किंवा प्राण्यांवर असे टॅग्ज बसवले तर त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचं काही तज्ञांचं मत आहे.

आजकाल पाश्‍चिमात्य देशांत बसेस आणि ट्रेन्समध्ये जी स्मार्टकार्डस्‌ वापरली जातात त्यांच्यामध्ये कित्येकदा आरएफआयडी टॅग्ज असतात. ते टॅग असलेलं स्मार्टकार्ड वाहनातल्या रीडरपाशी नेलं, तरी त्या तिकिटाचे पैसे आपोआप वळते होतात. या तऱ्हेची स्मार्टकार्डस्‌ दोन प्रकारची असतात. एक म्हणजे कॉन्टॅक्‍ट करावा लागणारी आणि दुसरी म्हणजे कॉन्टॅक्‍टलेस. स्मार्टकार्ड त्या रीडरपासून किती दूर असलं तर चालतं हे या प्रकारावरून ठरतं. काही कॉन्टॅक्‍टलेस स्मार्टकार्डस्‌ आरएफआयडीचं तंत्रज्ञान वापरतात, तर काही स्मार्टकार्डस्‌ आरएफआयडीशी स्पर्धा करणारं "निअर फिल्ड कम्युनिकेशन' (NFC) हे तंत्रज्ञान वापरतात. आपण त्याविषयी नंतर बोलूच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com