संस्कृतिजन्य आजार आणि व्यायाम (डॉ. राजीव शारंगपाणी)

संस्कृतिजन्य आजार आणि व्यायाम (डॉ. राजीव शारंगपाणी)

हेल्थ वर्क
‘सुसंस्कृत मानव म्हणजे काय,’ असा प्रश्‍न विचारला असता, ‘शरीराची हालचाल कमीत कमी करून केवळ मनाच्या हालचालीने अन्न मिळवितो तो सुसंस्कृत,’ अशी व्याख्या सहज करता येईल. संस्कृती जसजशी प्रगत होते; तितका शरीरावर घाव जोरात बसतो. शारीरिक कष्ट म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांचे काम अशी समजूत होते. घट्टे पडलेले हात, हे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात स्वयंचलित टूथब्रशही मिळतो. तो आपोआप दात घासू लागतो. तुम्हाला हात हलवायचे कष्ट कमी. अतिप्रगत आणि म्हणूनच सुसंस्कृत (?) देशात तर तीन माणसांमागे एक माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारचे कृत्रिम शरीरभाग वापरत असतो. त्यात चष्म्यापासून हृदयातील यांत्रिक झडपेपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. आता ही प्रगती म्हणायची की अधोगती? मुळात शरीराचे हे सर्व भाग का निकामी होतात? याकडे जास्त लक्ष द्यायला नको काय? अपघाताने शरीराचा एखादा भाग निकामी झाल्याने तो कृत्रिम भाग वापरणे, ही खरीच संस्कृतीची देणगी आहे, वरदान आहे! पण, केवळ निष्काळजीपणे शरीराचा ऱ्हास होऊ देणे आणि मग कृत्रिम साधनांच्या साह्याने कसेबसे जगणे, हे सुसंस्कृत म्हणविणाऱ्यांना शोभत नाही. संस्कृतिजन्य आजारात रक्तदाब हा आजार फार वरच्या क्रमांकावर आहे. मनावर अतिरिक्त ताण देणे, शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, अतोनात खाणे, ही तीन वैशिष्ट्ये या रुग्णांची असतात. रक्तदाबाचे इतर कोणतेही कारण न सापडल्यास रुग्णाला ‘इसेंशियल हायपरटेंशन’ आहे, असे म्हटले जाते. म्हणजे, आजाराचे कारण न समजल्याची कबुली दिली जाते.

रक्तदाब कमी तीव्रतेचा असेल आणि त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आणि इतर शरीराच्या अंतर्रचनेत वाईट बदल झालेले नसल्यास परिमित आहार, व्यायाम, श्‍वासोच्छ्वासाचे व्यायाम, शवासन यांच्या साह्याने, तसेच बायोफीडबॅक यंत्राच्या साह्याने तो पूर्णपणे आटोक्‍यात आणता येतो. सामान्यपणे रुग्ण दोन दिवसांत गोळ्या खाऊन गोळ्यांच्या अनुषंगाने होणारे त्रास सहन करतात. पण, एक तास द्यायला नाखूश असतात.

(उद्याच्या अंकात वाचा - ॲसिडिटी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com