चित्रकाव्याच्या निर्मितीची कहाणी (अतुल देऊळगावकर)

atul deulgaonkar
atul deulgaonkar

बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया यांच्याशी गप्पा मारायचा योग लेखकाला आला होता. बिशप लेफ्रॉय रस्त्यावर सत्यजित राय यांच्याच सदनिकेत झालेल्या भेटीतून उलगडलेली, या चित्रपटाशी संबंधित रंजक माहिती.

नुकतीच बीबीसीनं सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांची सूची तयार केली. त्यामध्ये केवळ एकाच भारतीय चिपटाचा समावेश होता ः "पाथेर पांचाली'! गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे "पाथेर पांचाली.' "काव्य आणि संगीत यांच्यामधलं स्थान पटकावणारी कला म्हणजे चित्रपट,' ही उक्ती सार्थ ठरवणारा चित्रपट म्हणजे "पाथेर पांचाली.' सत्यजित राय यांनी त्यानंतर 26 चित्रपट आणि 2 लघुपटांतून समकालीन भारताचं समग्र दर्शन घडवलं.

पैसा हाच आत्मा असणाऱ्या धंद्याला, कलेचं वेगळं परिमाण देणारे सत्यजित राय यांच्या मालकीची संस्था वा कार्यालय नव्हतं. त्यांचे चित्रपट अल्पखर्ची असूनही ते चित्रपटनिर्मिती करू शकले नाहीत. "पाथेर पांचाली' करताना जुन्या रेकॉर्ड, पत्नी बिजोया यांचे दागिने विकूनही, बंगाल सरकारकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. "ऑस्कर' आणि "भारतरत्न'नं सन्मानित या श्रेष्ठ आणि निष्कांचन कलाकाराचं शेवटचं आजारपण आणि शस्त्रक्रिया यांसाठीही सरकारी खर्च लागला. भावलेल्या साहित्याला दृश्‍यरूपात सादर करण्यासाठी लागणारा पैसा एवढाच काय तो चलनाशी संबंध. लिखाणातूनही पैसा मिळायचा. यातून साध्या आणि काटकसरीच्या जीवनशैलीतल्या त्यांच्या गरजा भागत असत.

राय यांच्या अभ्यासिकेतल्या पुस्तकांच्या साम्राज्यातून भिंत दिसतच नाही. काचेतून ठळकपणे जाणवतात प्रेमचंद, कबीर, रवींद्रनाथ, दस्तयेवस्की, कोस्लर, पिकासो, व्हॅनगॉग, आयझेंन्स्टाईन, चॅप्लीन! एका बाजूला काळा सोफा आणि त्यामागे आणखी एक ग्रंथ-भिंत आहे. टीपॉयसमोरच त्यांचं जीवापाड प्रेम असणारी खुर्ची आहे. खुर्चीमागंही सहवासाचे ग्रंथ दिसतात. या कपाटावर रांगेनं पुरस्कार, सन्मानचिन्हं ठेवली आहेत. खुर्चीला लागूनच छोट्या टेबलावर फोन, पुस्तकं, कागद, रंग, कुंचले. कोपऱ्यात माफक उजेडासाठी लॅंप शेड आहे. बिजोयाबाई सांगत होत्या ः ""तासन्‌तास याच खुर्चीत बैठक असायची. फोन, टेपरेकॉर्डर, ग्रामोफोन, कॅनव्हास, रंग, पियानो हे सारं काही सगळं त्यांना अगदी हाताशी लागायचं. असंख्य निर्जीव वस्तूंना, आपल्या सहवासानं केवढं माणूसपण येतं!''

विंदा करंदीकर यांनी "खुर्च्यांनाही मगे असतात' ("स्पर्शाची पालवी') या लघुनिबंधात खुर्च्यांच्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाला शब्दात पकडलं आहे. या निर्जीव वस्तूंच्या सहवासाचा एक जैविक नाद तयार होत असावा. राय यांच्यासारख्या संवेदनशील कलावंताबाबतीत तर तो होणारच. राय त्यांचे चरित्रकार अँड्रयू रॉबिन्सन यांना "लंडन, पॅरिस मला मनापासून भावतं; पण मी माझ्या कलकत्त्याच्या खुर्चीतच मनापासून मोकळा असतो. तिथंच मला सर्जनशील वाटू लागतं,' असं म्हणाले होते. ""जुन्या घरात सतत कानावर कर्कश्‍श भोंगे, गोंगाट असूनही राय एकदा कामात गुंतले, की त्यांचा बाह्यजगाशी संबंध तुटायचा. तऱ्हेतऱ्हेचे आवाज कानाच्या पडद्यापर्यंत घेऊनही मग्न सत्यजितांना विचलित करू शकत नसत. तेव्हाही हीच खुर्ची साथीला होती...'' ः बिजोयाबाई. राय त्यांच्या अभ्यासिकेतून लागणाऱ्या शयनगृहामध्ये आयझेंस्टाईन यांचं मोठं छायाचित्र आहे. अभिजात पाश्‍चात्त्य संगीताचा नाद लावणारे बिथोवन यांची मूर्तीही आवर्जून ठेवली आहे.

"पाथेर पांचाली'ची जन्मकहाणी
कोलकात्याच्या "केमार अँड कंपनी' या जाहिरात संस्थेचे व्यवस्थापक डी. के. गुप्ता हे साहित्यप्रेमी होते. त्यामुळं त्यांनी जिव्हाळ्याच्या पुस्तकांना पुन्हा प्रकाशित करायचं हे ठरवून टाकलं. बंगाली तरुणांना रवींद्रनाथ आणि शरश्‍चंद्रच थोडे फार माहीत आहेत. विभूतिभूषण बंदोपाध्यायांचं साहित्यही अक्षर आहे. त्याची ओळख सगळ्यांना झाली पाहिजे यासाठी त्यांनी नव्या आवृत्यांची तयारी चालू केली. चित्रं, मुखपृष्ठ काढण्यासाठी एका चित्रकाराला बोलावलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, या कुशाग्र तरुणानं पाश्‍चात्य लेखकांची पुस्तकं वाचण्याचा सपाटा लावला आहे; परंतु त्यानं विभूतिभूषण वाचले नाहीत. साहजिकच चित्रं काढण्यासाठी त्यांनी मूळ कादंबरी त्या तरुण चित्रकाराच्या हातात दिली आणि 27 वर्षांचे सत्यजित राय "पाथेर पांचाली' वाचत गेले. ही कादंबरी म्हणजे ग्रामीण जीवनाचा ज्ञानकोशच आहे. सत्यजित राय यांना कादंबरीनं पूर्ण व्यापून टाकलं आणि थक्क केलं. त्या वेळी त्यांना तरी कुठं कल्पना होती, की ही चित्रं पडद्यावर साकार होणार आहेत. रस्त्याचं गाणं (पाथेर पांचाली) चित्रकाव्य होऊन, त्याचा नाद जगभर सर्वकाळ ताजाच राहणार आहे.
सन 1948मध्ये फ्रेंच दिग्दर्शक ज्यॉं रेन्वा हे "द रिव्हर' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कोलकात्यामध्ये आले. स्टुडिओच्या आतमध्ये रुतून पडलेला कॅमेरा तिथून बाहेर काढण्याचं धैर्य दाखविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये रेन्वा हेसुद्धा आहेत, याची राय यांना जाणीव होती. नोकरी सांभाळत, सुटीच्या दिवशी ते रेन्वा यांच्यासोबत जाऊ लागले. या अनुभवासंबंधी राय यांनी "शहरी वातावरणात वाढलेल्या मला गावाची थोडीशी ओळख "शांतिनिकेतन'मुळे झाली होती; परंतु रेन्वासोबत गेल्यामुळे गावातले व्यवहार मला जवळून न्याहाळता आले,' असं लिहून ठेवलं आहे. रेन्वा यांना ते फ्रेंच, अमेरिकन, इटालियन चित्रपट, त्यांचे विषय, मांडणी यावर असंख्य प्रश्न विचारायचे. त्यांनी चित्रपटाचा ध्यास घेतला आहे, हे ओळखून एक दिवस रेन्वा यांनी विचारलं ः ""तुला चित्रपट काढायचा आहे काय?'' चित्रकाराच्या नजरेतून चित्रपट प्रक्रिया अनुभवणारे राय यांनी होकार देऊन "पाथेर पांचाली'ची कल्पना सांगितली. ती ऐकून रेन्वा उत्स्फूर्तपणे म्हणाले ः ""हॉलिवूड हादरून जाणार आहे. तुझ्यामुळे!''
एप्रिल 1950. कंपनीच्या कामासाठी राय यांना पाच महिने लंडनला पाठवायचं ठरलं. लंडनमध्ये सहा महिन्यांत 99 चित्रपट पाहून ते परत भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासात "पाथेर पांचाली' कागदावर पूर्णपणे उतरला होता. ते परत आले, तेव्हा भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं घाटत होतं. कुरोसावा, रोझेलिनी, डी सिकासारख्यांचे चित्रपट होते. "राशोमान' पाहताच प्रेमात पडलेले राय म्हणतात ः "ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळंच पाथेर पांचाली'तल्या अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं, की हे करायलाच पाहिजे.'

"पाथेर पांचाली' ही बंगालच्या एका खेड्यातले हरिहर राय यांच्या कुटुंबाची कथा आहे. घरात ऐंशी वर्षांची बहीण, पत्नी सर्वजया, दुर्गा आणि अपू ही मुलं हे हरिहरचं कुटुंब. पूजापाठ करणाऱ्या दरिद्री हरिहरला दोन वेळचं जेवण मिळवणंसुद्धा कठीण आहे. त्याच्याच कुटुंबाची ही कथा. माणुसकी, लबाडी, ओलावा, निरागस बालपण सगळं काही त्यात आहे. वेदना सोसूनही जगण्यासाठी चाललेली ही धडपड आहे. त्यामुळंच हे टिकून राहिलेल्या माणुसकीच्या रस्त्यांचं गाणं आहे. राय पटकथा लिहून मोकळे झाले. विभूतिभूषण यांचं निधन झाल्यानं, त्यांच्या पत्नी रमाबाईंकडून परवानगी घेतली. आता भांडवल गोळा करायची तयारी सुरू झाली; पण नवख्याला कोण पैसे देणार? निदान चुणूक दाखवणारी काही दृश्‍यं दाखवायला हवी. राय यांनी विमा पॉलिसीवर सात हजार रुपयाचं कर्ज काढलं. नातेवाईक आणि मित्रांकडून गोळा करून 17 हजार रुपये जमवले. त्यातून आठ दिवसांचं चित्रीकरण होण्याची शक्‍यता दिसू लागली. खर्च वाचवण्यासाठी, काटकसर करण्यासाठी शक्‍य तेवढ्या युक्‍त्या लढवल्या गेल्या. ध्वनिमुद्रण टाळण्यासाठी संवाद नसलेली दृश्‍यंच घेण्यात आली. 16 मिलिमीटर कॅमेऱ्यानं चित्रीकरण करून ती 35 मिलिमीटरमध्ये रूपांतरित करण्यात आली. कोलकात्याजवळचंच बोराळ गाव निवडण्यात आलं. मध्यावर आलेल्या पावसाळ्याचे दिवस होते. गुडघाभर चिखलातून खांद्यावर कॅमेरा घेऊन राय स्वत: जायचे. (अर्थात नोकरी सांभाळून रविवारीच.) अंधुक प्रकाशात बांबूचं वन, तळ्यात थेंब पडून सरकणारी वर्तुळं चित्रित करायचे.

चित्रीकरण 16 मिलिमीटर प्रोजेक्‍टरवरून पाहताना उत्तम वाटलं; पण मुंबईला पाठवून 35 मिलिमीटर प्रिंट आणल्यावर त्यात दर सेकंदाला येणाऱ्या फ्रेम्सची गती बिघडली असल्याचंच स्पष्ट झालं. पुन्हा पहिल्यापासून चित्रिकरण करणं भाग होतं. हरिहरच्या भूमिकेसाठी रंगभूमीवर काम करणारे कनू बॅनर्जी यांना, तर सर्वजयासाठी करुणा बॅनर्जी यांना निवडण्यात आलं. अपूचा शोध मात्र बरेच दिवस चालला. "चित्रपटासाठी सहा वर्षांचा चुणचुणीत मुलगा हवाय,' अशी जाहिरात देण्यात आली. भरपूर प्रतिसाद मिळूनही "अपू' काही सापडत नव्हता. एक दिवस बिजोयाबाईना मैदानात खेळणारा मुलगा दिसला आणि सगळीकडं शोधाशोध करून सुबीर हा "अपू' शेजारच्याच घरात गवसला. राय म्हणतात ः "लहान मुलांकडून कसं काम करून घ्यावं, हे त्यावेळी ध्यानात आलं आणि ओरडावंसं वाटलं. युरेका - युरेका!' सुबीर काही जन्मजात नट नव्हता; पण तो तंतोतंत "अपू' होता. पुढे राय यांनी लहान मुलांकडून अनेक चित्रपटांत किती अप्रतिम कामं करून घेतलीत, हे आपण पाहिलंच आहे. नंतर हरिहरच्या पंचाऐंशी वर्षे वयाच्या बहिणीसाठी नटीचा शोध चालू झाला. राय आणि चौधरी, हे बंगाली रंगभूमी गाजवून विस्मृतीत गेलेल्या चुनीबालादेवी यांच्याकडं गेले. भेटीत त्यांनी विचारलं ः ""85 वर्षांच्या वयात मी काय काम करणार?'' राय यांनी उत्तरादाखल प्रश्न केला ः ""तुम्हाला संवाद पाठ होऊ शकतील का?'' पाठीतून पूर्णपणे वाकलेल्या चुनीबालादेवींनी त्यांना धडाधडा लोकगीतं म्हणून दाखवली. मग काही प्रश्नच नव्हता. राय म्हणाले ः ""तुम्हाला वेगळी वेशभूषा करणार नाही.'' चुनीबालादेवी म्हणाल्या ः ""कदाचित याच संधीसाठी मी राहिले असेन.'' बाहेर पडताना त्यांच्या मानसकन्येनं चाचरत विचारलं ः ""दिवसाला दहा रुपये देऊ शकाल?'' अनिल चौधरी म्हणाले ः ""वीस रुपये देऊ.'' दरम्यान जमा केलेला निधी संपला. बिजोयाबाईंचे दागिने, सत्यजितांच्या आवडत्या रेकॉर्डस विकून आलेल्या बाराशे रुपयांत तीन दिवस काढले. आत मात्र काहीच शक्‍य नव्हतं. सत्यजित पुन्हा "केमार कंपनी'मध्ये चित्रं काढायला लागले. एकतृतीयांश चित्रीकरण पाहून त्याचं वेगळेपण ठसायचं. निर्मात्यांना ते दाखवल्यावर, "गाणी नाहीत, गती नाही; स्टार नाही, खेड्यातलंच जगणं कोण पाहणार?' अशा प्रतिक्रिया येत.

मधल्या काळात बोराळला जाऊन गतस्मृती चाळवत बसण्याचा छंद सत्यजित आणि त्यांच्या कंपूला लागला. पूर्वीच्या चुकांचं टोकदार विश्‍लेषण होऊ लागलं. असंच एकदा सुब्रतो, बन्सी आणि सत्यजित गप्पा मारत तळ्याकाठी बसले होते. शेवाळानं तळं पूर्ण झाकून गेलं होतं. सत्यजित खडे टाकत होते. त्यांचं तिकडं लक्षही नव्हतं. त्यांना एकदम जाणवलं, खडा आत गेल्यावर पुन्हा शेवाळ एकवटायचं. "दुर्गाच्या मृत्यूनंतर चोरलेल्या हाराला पाहून अपू बेचैन होतो,' एवढंच वर्णन कादंबरीत आहे. राय यांनी या अनुभवानंतर त्या दृश्‍यात बदल केला. अपू तो हार तळ्यात फेकतो. शेवाळं काही क्षण दूर होतं. हार तळ्याच्या आत निघून जातो. शेवाळ्यानं तळं पुन्हा भरून जातं. हारासमवेत दुर्गाच्या स्मृती तळ्यात जाण्याचं हे प्रतीक नेहमीच गलबलवून टाकतं.
चित्रीकरण संपत आलं. कादंबरीला दृश्‍यरूपात आणताना भाव संयतपणे व्यक्त होण्यासाठी किरकोळ बदल झाले. आता बाकी होतं पार्श्वसंगीत! त्याकाळी पं. रविशंकर हे दिल्लीत राहायचे. त्यांनी दोन दिवस ठरवले. त्यात एका रात्री मैफल होती. त्यांनी कादंबरी ऐकली होती. ते म्हणाले ः ""माझ्या डोक्‍यात एक धून आहे.'' संपूर्ण "पाथेर पांचाली'चा उत्कट भाव व्यक्त करणारी बासरीमधली "अहिरभैरव' रागामधली धून ऐकताच राय आनंदून गेले. काही प्रसंगांना अधोरेखित करण्यासाठी त्यांना धून हव्या होत्या. हरिहर घरी येतो. सर्वजया एकही शब्द बोलत नाही. दुर्गासाठी आणलेली साडी पाहताच मात्र ती धाय मोकलून कोसळते. राय यांनी सुचवलं ः ""या प्रसंगी तारस्वरातील शहनाई वापरावी.''

रविशंकर यांनी लागलीच तशी धून बांधून दिली. ही बैठक सलग चालू राहिली आणि अकरा तासांत चित्रपटातल्या दृश्‍यांना काव्याची उंची गाठून देणारं संगीत बांधलं गेलं. नंतर संपादन करताना तर दहा दिवस दलाल दत्त आणि राय हे झोपही न घेता काम करत राहिले. न्यूयॉर्क इथल्या "म्युझियम ऑफ मॉडर्न आर्टस'मध्ये "पाथेर पांचाली' दाखवण्यासाठी अंतिम मुदत गाठण्यासाठी हा खटाटोप होता.

प्रिंट बाहेर आली आणि राय पॅन-ऍम ऑफिसवर गेले. सारे सोपस्कार करेपर्यंत सत्यजित खुर्चीतच घोरू लागले. तिथून "पाथेर पांचाली' यशाची पताका फडकत राहिली. सगळीकडून स्तुतीचा वर्षाव सुरू झाला. भारतातल्या चित्रपटाचं जगात कौतुक होऊ लागलं. कोलकात्यामध्ये लागल्यावर सलग सहा आठवडे "हाऊसफुल्ल' झाला. काही महिन्यांतच जगभरच्या नावाजलेल्या समीक्षकांनी "पाथेर पांचाली'ला अभिजात चित्रपटांच्या रांगेत बसवलं. क्षणभंगुरता हाच गुण आणि धर्म मानला जाणाऱ्या चित्रपट व्यवसायात चिरंतनाचा गंध दिला. काळाच्या सीमा ओलांडणाऱ्या "पाथेर पांचाली'चा नाद अजूनही तसाच झंकारत राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com