‘एलिझाबेथ एकादशी’ने दिली ओळख

Nandita-Patkar
Nandita-Patkar

सेलिब्रिटी टॉक - नंदिता पाटकर, अभिनेत्री
मुंबईतील रूपारेल महाविद्यालयामधून मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. मी एअरफोर्समध्येच करिअर करायचं नक्की केलं होतं, मात्र काही कारणास्तव ते झालं नाही. रूपारेलमध्ये शिकत असताना माझ्याच एका मित्रानं, ‘तू नाटकाच्या ग्रुपमध्ये सहभागी हो,’ असं मला सांगितलं. तिथूनच मला नाटकाची गोडी लागली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना माझी ओळख अविष्कार या प्रायोगिक नाट्यसंस्थेशी झाली. मी प्रायोगिक नाटक करायला सुरवात केली. याच काळात मला अभिनय क्षेत्र आवडू लागलं, मग मी माझी अभिनयाची आवड जोपासत नोकरी करायलाही सुरवात केली. मी जवळपास सात ते आठ वर्षं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. अभिनय क्षेत्राकडं करिअर म्हणून मी कधीच पाहिलं नाही, पण सुरवातीला चांगला चित्रपट मिळाला आणि मी पूर्णपणे या क्षेत्राकडं वळले. मी ‘बया दार उघड’ नावाचं नाटक करत होते. हे नाटक बघायला परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आले होते. तेव्हा माझा अभिनय त्यांना खूप आवडला. काही दिवसांनी त्यांनी मला ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटासाठी विचारलं. माझं या चित्रपटासाठी ऑडिशन झालं. ‘एलिझाबेथ एकादशी’ हा माझा पहिला चित्रपट. करिअरच्या सुरवातीलाच मला उत्तम कथा असणारा चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळंच माझी एक चांगली ओळख निर्माण झाली. मी फार मोजकेच चित्रपट केले; पण सगळ्या उत्तम कथा माझ्या हाती आल्या.

यासाठी मी स्वतःला फार नशीबवान समजते. ‘माझे पती सौभाग्यवती’ मालिकेमधील माझी गृहिणीची भूमिका, माझ्या इतर नॉन ग्लॅमरस भूमिका प्रेक्षकांना भावल्या. बऱ्याचदा माझ्याकडं एकाच प्रकारच्या भूमिकादेखील आल्या, पण त्यासाठी मी कधीच नकार दिला नाही. कारण आपल्या वाटेला आलेलं काम करत राहणं हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. माझ्या करिअरच्या सुरवातीच्या काळात मला थोडंफार स्ट्रगल करावं लागलं.

‘एलिझाबेथ एकादशी’नंतरही मला लगेचच काम मिळालं नाही; पण माझ्या हाती येईल ते काम मी करत गेले आणि मला योग्य संधी मिळत गेल्या. मला कधीच ग्लॅमरस भूमिकांची भुरळ पडली नाही. मी केलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना त्यांच्यातली वाटली, हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. आजही मला ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटामुळं ओळखलं जातं, याचा मला खूप अभिमान आहे.

माझ्या आजवरच्या यशामध्ये माझ्या कुटुंबाचा खारीचा वाटा आहे. कारण नोकरी सोडून पूर्णपणे या क्षेत्राकडं येण्याचा मी निर्णय घेतला आणि या निर्णयाला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मी उत्तमोत्तम काम करू शकले. आताही माझा ‘बाबा’ नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते संजय दत्त आणि मान्यता दत्त यांनी केली आहे. एवढ्या मोठ्या चित्रपटाशी माझं नाव जोडलं गेलं आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. ऐकू-बोलू न शकणाऱ्या एका जोडप्याची आणि त्यांच्या आठ वर्षांच्या बोलू न शकणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. एकही संवाद न बोलता फक्त चेहऱ्यावरच्या हावभावांनी व्यक्त होणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं.

भावनेला भाषा नसते अशी या चित्रपटाची टॅगलाइनच आहे. मलाही रुपेरी पडद्यावर संवादामधून नव्हे, तर भावनेनं व्यक्त व्हायचं होतं. खरंतर ही माझ्या अभिनयाची कसोटीच होती. या चित्रपटासाठी मी माझे शंभर टक्के दिले आहे. दिग्दर्शक राज आर. गुप्ता यांनी उत्तम दिग्दर्शन केलं आहे. खरंतर हा चित्रपट प्रेक्षकांना नवा धडा शिकवून जाईल.
(शब्दांकन - काजल डांगे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com