होप डाईज् लास्ट इन दि वॉर..

Damayanti Tambay still waits for her fighter pilot husband article write Gautami Aundhekar
Damayanti Tambay still waits for her fighter pilot husband article write Gautami Aundhekar

कल्पना करा तुमच्या लग्नाला नुकतंच वर्ष पुर्ण झालंय आणि अचानक एकेदिवशी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर झालाय. पहिली काही वर्ष तुम्हाला माहीतच नाहीये तो कुठे आहे. काही काळ लोटल्यानंतर कानावर येते की तो कुठेतरी आहे, खूप हालअपेष्टा सहन करतोय. पण त्याला तिथून बाहेर पडणं सहजासहजी शक्य नाही. ज्या लोकांना माहितीये तो कुठे आहे ते लोक त्याचं अस्तित्वच मान्य करत नाहीयेत. पण तो तिथेच आहे हे ठामपणे सांगणारे लोकही आजूबाजूला आहेत. तुमच्या जोडीदाराला अडचणीतून सोडवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण काहीच यश मिळत नाहीये आणि तरीही तुमचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत. हा प्रयत्न तुम्ही किती दिवस करू शकता? 5 वर्ष, 10 वर्ष की आयुष्यभर? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे प्रयत्न करताना तुम्ही प्रोफेशनली किती कार्यक्षम आहात? आणि तुमची बाकीची कर्तव्य सक्षमपणे पार पाडताना तेव्हा समाजासाठी काय करत आहात?   

अशक्य आहे! एकावेळी एवढं सगळं करणं सामान्य माणसाला शक्यच नाही!  सर्वात पहिलं म्हणजे हे सगळं सहन करण्यासाठी तुमच्या मनात जोडीदाराविषयी अटळ निष्ठा, प्रचंड धैर्य आणि कमालीचा संयम हवा. काही दिवसांपुर्वी अशाच एका कणखर व्यक्तिमत्वाची ओळख झाली. अजून त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीचा योग आलेला नाही पण ज्याक्षणी त्यांच्याविषयी वाचलं तेव्हापासून क्वचितच असा दिवस गेला असेल जेव्हा त्यांच्याविषयी विचार केलेला नाही..

गेल्या काही महिन्यांपुर्वी (म्हणजे भारताने बालाकोट हवाई हल्ला घडवून आणल्यानंतर काही दिवसांनी) ट्विटरवर सहज एक बातमी दिसली(!). सहज उत्सुकता म्हणून क्लिक केलं आणि वाचायला लागले. ती मुलाखत होती दमयंती तांबेंची. खरं सांगायचं तर ही बातमी वाचल्यानंतरच मला त्या कोण आहेत हे पहिल्यांदा कळालं. तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांचा विचार करते तेव्हा एकाच वेळी वेगवेगळ्या भावना मनात दाटून येतात. कधी खूप प्रेरणा मिळते तर कधीतरी अचानक मन खूप अस्वस्थ होतं. निःशब्द व्हायला होतं! एवढी वर्ष कोणत्या जगात वावरत होते असं वाटून गेलं.

दमयंती तांबे यांच्याविषयी औपचारिक माहिती द्यायची झाली तर त्या  भारताच्या माजी जेष्ठ बॅडमिंटनपटू आहेत. या खेळात त्यांनी आतापर्यंत चार वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलं असून त्या अर्जुन पुरस्काराच्या मानकरीदेखील आहेत. काही वर्षांपुर्वी त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील Physical Education विभागाच्या डेप्युटी डायरेक्टर म्हणून  निवृत्त झाल्या. आणि त्यांची अजून एक महत्त्वाची ओळख म्हणजे 1971 युद्धानंतर पाकिस्तानातून भारतात अद्याप न परतलेल्या आपल्या युद्धकैदी नवऱ्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करणारी पत्नी....

सौ. तांबे यांचे पती फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताच्या बाजूने लढत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि  ते शत्रूच्या तावडीत सापडले. तेव्हापासून ते पाकिस्तानी कारागृहात युद्ध कैद्याचं आयुष्य जगतायेत. विजय तांबे हे त्या 54 भारतीय युद्धकैद्यांपैकी आहेत जे शिमला करारानंतरदेखील कधीच भारतात परतले नाहीत. युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाली. पण काही सैनिकांचं नाव कधीच युद्धकैद्यांच्या यादीत आलं नाही. पहिली काही वर्ष तर सरकारदरबारी त्यांची नोंद 'किल्ड इन अॅक्शन' अशीच होती. परंतु वेळोवेळी उपलब्ध झालेल्या पुराव्यांनंतर त्यांची 'मिसिंग इन अॅक्शन' अशी नोंद झाली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असे  पुरावे उपलब्ध आहेत ज्यावरुन असं सिद्ध झालंय की विजय तांबे आणि आणखी बरेच भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानच्या कारागृहांमध्ये बंदिस्त ठेवण्यात आलं होतं. पाकिस्तानने मात्र उघडपणे किंवा अधिकृतपणे कधीच त्यांचं अस्तित्व मान्य केलेलं नाही. याशिवाय, 1965 च्या युद्धातील काही  कैदी भारतात कधीच परत आले नाहीत.

1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानातून न परतलेल्या सैन्याधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी मिळून 'मिसिंग डिफेन्स पर्सोनल असोसिएशन'ची स्थापना केली आणि ही संस्था युद्धकैद्यांच्या सुटकेसाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करत आहे. आतापर्यंत सरकारने याबाबत काय काय प्रयत्न केले आहेत आणि आणखी काय करता येऊ शकतं याचा पाठपुरावा हि संस्था सातत्याने करते. परंतू, आतापर्यंत कोणत्याच सरकारने कधीच समाधानकारक प्रतिसाद दिला नाही.  दमयंतीदेखील या संस्थेच्या प्रमुख सदस्य आहेत. त्यांच्याशिवाय, आणखी कितीतरी कुटुंब अशी आहेत जी आपल्या जवळच्या माणसाला सोडवण्यासाठी झगडतायेत. काहींनी आता हात टेकलेत. पण अजूनही अशा पत्नी, भाऊ, मुलं, नातवंडं, जावई आहेत ज्यांना खात्री आहे की आपलं माणूस एक दिवस परत येईल.   

दमयंती तांबेंच वेगळेपण पुन्हा पुन्हा जाणवत राहतं ते म्हणजे त्यांच्याकडे असलेला कमालीचा धीर. गेली 48 वर्षे त्या एकट्या राहतायेत. पण यादरम्यान त्यांनी आपल्या कामाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. बॅडमिंटन सुरु ठेवलं. अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. कित्येक सामाजिक संस्थ्यांच्या कार्यकारणीचा त्या भाग आहेत. त्यांच्या या अवघड काळात घरातील सर्व नातेवाईकांनीदेखील तेवढ्या खंबीरपणे त्यांची साथ दिली आहे हे त्या वेळोवेळी सांगतात.  म्हणजे आपण जे फक्त पुस्तकांमध्ये ऐकतो त्या अटळ निष्ठा, जिद्द, दृढनिश्चय, संयम यासारखी मूल्ये त्यांनी आयुष्यभर जपली आहेत. आपला नवरा शत्रुच्या कैदेत अडकला आहे एवढंच कळतंय. पण आत्ता या क्षणी तो नेमकं कुठे असेल, काय काय हाल सोसत असेल या विचारांनी जीव कासावीस होत असेल तेव्हा कसं वाटत असेल? आतापर्यंत अनेकदा अशी परिस्थिती आली असेल जेव्हा त्यांना वाटलं असेल द्यावं सगळं सोडून आणि वाट पहावी फक्त, खूप चिडचिड झाली असेल, कधीतरी खुप रडावंसंही वाटलं असेल. ज्या नवऱ्याने देशासाठी स्वतःला वाहून घेतलं त्याच्याविषयी या देशालाही काहीच घेणं-देणं नाही अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली असेल तेव्हा त्या बायकोला कसं वाटत असेल?

दमयंती यांचं वय आज साधारण सत्तरीच्या आसपास आहे. म्हणजे माझ्या जन्माच्या किमान 25 वर्ष अगोदर त्यांच्यासोबत हे सगळं घडलं. माध्यमांमधून आपल्यापर्यंत जी माहिती येते ती अगदी सिलेक्टिव्ह असते. प्रत्यक्षात अजून कितीतरी छोट्या-मोठ्या अडचणी समोर आल्या असतील ज्या आपल्याला कधीच कळणार नाहीत.  म्हणजे आपल्यापर्यंत जेवढं ऐकलं त्यावरुन एवढं वाईट वाटतंय, तर त्या प्रत्यक्षात एवढी वर्ष हे सगळं कसं जगल्या असतील?  

सुप्रियो सेन नावाच्या पत्रकाराने दमयंती तांबे आणि आणखी काही कुटुंबांच्या  संघर्षाचं चित्रण करणारी डॉक्युमेंटरी 2007 साली तयार केली होती. "होप डाईज् लास्ट इन वॉर' असं त्याचं नाव होतं. ही डॉक्युमेंटरी बनवताना सेन यांनी दमयंती यांना प्रश्न विचारला होता की एवढी वर्ष त्या आपल्या पतीची का वाट पाहतायेत? तेव्हा त्यांच उत्तर होतं, "त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेल्या प्रेमानेच मला या न संपणाऱ्या प्रवासाकडे वळण्याची प्रेरणा दिली. जोपर्यंत प्रेम आहे तोपर्यंत आशा आहे. आणि युद्धात आशेचा अंत सर्वात शेवटी होतो". आणि त्यावरुनच डॉक्युमेंटरीला हे शीर्षक देण्यात आलं होतं.   .     

दमयंती आणि विजय तांबेंच्या नात्याविषयी वाचल्यानंतर एखाद्याला "Relationship Goals" नाही मिळाले तर नवलच! आजकाल प्रेमात सहजपणे 'मुव्ह ऑन' होणाऱ्या किंवा अगदीच कोलमडून पडणाऱ्या लोकांवर जशी परिस्थिती ओढवली तर काय होईल, असा प्रश्न नेहमीच पडतो

इतक्या जवळ येऊनसुद्धा रिकाम्या हाताने परत येताना काय वाटलं असेल? आणि त्यावेळी त्यांनी तिथल्या कैद्यांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय झालं असेल याची आपण कल्पना करु शकत नाही. एवढा काळ लोटल्यानंतरही आपल्या पतीला परत आणण्याचा त्यांचा निग्रह कायम आहे. अगदी अलीकडे झालेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांना अनेक लोक विचारतात की तुम्हाला काय वाटतं ते अजून जिवंत असतील का? पण त्यांचं त्यावर उत्तर आहे की तुम्ही आणि मी जीवंत आहोत तर ते का नसतील? जन्म-मृत्यू आपल्या हातात नाही. आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायला  हवेत"   

या वयात एखादी व्यक्ती कशी काय एवढी कणखर आणि आशावादी असू शकते? दमयंती तांबे यांच्याविषयी विचार करताना मनात एकावेळी असंख्य विचार येतात. त्यांची प्रेमकहाणी असो नाहीतर त्यांचा एकटीचा प्रवास, खूप वेगवेगळ्या पैलूंवर विचार करायला आपण प्रवृत्त होतो. असं वाटतं फक्त एकदा त्यांना भेटावं, त्यांच्याशी खुप वेगवेगळ्या विषयावर गप्पा माराव्या. त्या कशा विचार करतात, प्रत्यक्षात कसं बोलतात, कसं वागतात हे जवळून अनुभवावं. परंतू आपल्याला त्यांची सर कधीच येणार नाही हे नक्की..

मात्र, त्यांच्यासारखं किमान 10 टक्के टेम्परामेंट जमलं तर आयुष्यात स्वतःसाठी आणि इतरांसाठी खूप काहीतरी करु शकेन असं वाटतं.  

आता या सर्व नातेवाईकांची एवढीच अपेक्षा अशी आहे की जर त्यांचा माणूस परत येणार नाही हेच अंतिम सत्य असेल तर निदान त्याच्यासोबत पाकिस्तानने नक्की काय केलं हे त्यांना समजावं. आणि शेवटचं.. कोण जाणे निदान 50 वर्षे लोटल्यानंतर का होईना विजय तांबे आणि त्यांचे सहकारी परत आले तर अनेक अर्धवट राहिलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतील.. जग फार निष्ठुर आहे या प्रचलित गृहीतकाला धक्का बसेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com