मिळून सारेजण (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse
dr shruti panse

मुलांसकट नवनवे अनुभव घेणं, त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं, समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो. मुलांसह समृद्ध होणाऱ्या, समृद्धतेचा प्रवास करणाऱ्या कुटुंबांना सुखा-समाधानाचा शोध लवकर लागतो. अशा कुटुंबाचे मुलांबरोबरचे बंध खूप छान जुळतात आणि ते पुढंपर्यंत टिकतात.

"आपण मुलांना घडवतो,' असं आपण खूपच सहजपणे म्हणून जातो; पण हे वाक्‍य कितपत खरं आहे? आपण मुलांना घडवत असतो, तेव्हा आपणही खूप घडत असतो. मुलं आपल्याला- कुटुंबाला केवढं तरी घडवतात. पंचविशीच्या दोन स्वच्छंदी आणि मनमौजी व्यक्तिमत्त्वांना जबाबदार, काळजीवाहू आणि दूरदृष्टीची व्यक्तिमत्वं करण्यात, आपल्यामधली सहनशक्ती वाढवण्यात आपल्या मुलांचा केवढा तरी हातभार असतो.

मुलांमुळं आपल्या जगण्याला, आपल्या आयुष्याला एक चौकट येते. काही कुटुंबांमध्ये ही चौकट बंदिस्त असते- जे अजिबातच योग्य नाही. कारण यामुळं मुलांवर चौकटीतच जगण्याचे संस्कार होतात. चौकटीबाहेरच्या समस्या आल्या, तर त्यांना त्या सोडवता येत नाहीत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे यापुढच्या काळात, मुलं आपली क्षितिजं विस्तारत जातील, तेव्हा त्यांना चौकटीबाहेरच्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. आयुष्य कधीही सरळ रेष मारल्यासारखं नसतं. नव्या वळणांवर कोणती गोष्ट आपल्या "स्वागता'साठी तयार असेल हे सांगता येत नाही. मुलांसकट नवनवे अनुभव घेणं, त्यासाठी स्वतःला आणि पूर्ण कुटुंबाला सतत संपन्न करत राहणं, समृद्ध करत राहणं हा एक वेगळाच प्रवास असतो. मुलांसह समृद्ध होणाऱ्या, समृद्धतेचा प्रवास करणाऱ्या कुटुंबांना सुखा-समाधानाचा शोध लवकर लागतो. अशा कुटुंबाचे मुलांबरोबरचे बंध खूप छान जुळतात आणि ते पुढंपर्यंत टिकतात.

अनेक कुटुंबांना या पद्धतीनं, या दिशेनं प्रवास करणं जमत नाही. अशी काही कुटुंबं असतात. मूल झाल्यानंतर साधारणपणे आई घराशी जास्त प्रमाणात बांधील राहते. तिच्यावर जास्त जबाबदाऱ्या असतात. काही घरांमध्ये या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या जातात, तर काही घरांमध्ये ती स्वतःहून स्वतःवर काही बंधनं घालून घराशी जास्तीत जास्त बांधील राहण्याचा प्रयत्न करते. मुलांचा अभ्यास, त्यांचा आहार, त्यांना शाळा-क्‍लासमध्ये सोडणं आणि अशाच कामांमध्ये ती पुरती गुरफटून जाते. ती स्वतः नोकरी किंवा व्यवसाय करत असली, तरीसुद्धा उरलेला पूर्णवेळ ती मुलांना देते. काही घरांमध्ये बाबा तिची काही कामं वाटून घेतात; पण मुख्यतः जबाबदारी असते ती त्या आईवर. आठवड्यातले पाच दिवस आपलं काम, अभ्यास, मुलांचे छंद जोपासणं यासाठी दिल्यानंतर सुटीच्या दिवशी पुन्हा तेच म्हणजे जास्त अभ्यास, जास्तीची घरगुती कामं यातच गुरफटून राहिलं, तर स्व- विकास कसा होईल? अशा पद्धतीनं वर्षानुवर्षं तेच चालू राहिलं, तर संपूर्ण कुटुंबाचा समृद्धीच्या दिशेनं प्रवास होतोच असं नाही. त्यामुळं सुटीच्या दिवशी वेगळ्या अनुभवांसाठी संपूर्ण कुटुंबानं सज्ज राहायला हवं.

हे वेगळे अनुभव म्हणजे नक्की काय?
- कधी एखादी छोटी सहल असेल. मुलं वाढत्या वयातली असतील, तर त्यांच्यावर संयोजन, नियोजनाची, जमाखर्च लिहिण्याची जबाबदारी देता येते.
- कधी एखाद्या वेगळ्याच क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचं काम समजून घेण्यासाठी जाऊन त्यांचं काम प्रत्यक्ष बघता येईल. ते समजून घेण्यासाठी जे प्रश्न विचारावे लागतील ते त्यांनीच काढायचे आणि विचारायचे.
- एखादी चांगली संस्था बघायला जाता येईल.
- कधी घरातली डागडुजी, दुरुस्ती असं काही असेल. ते काम सर्वांनी मिळून करायचं.
- कधी सगळ्यांनी मिळून घरासाठी एखादी नवी वस्तू तयार करायची. उदाहरणार्थ, छोटं स्टूल, रॅक तयार करणं, कपाट रंगवण, घराची सजावट करणं इत्यादी.
- कधी मित्रमंडळींना घरी जेवायला बोलावलं असेल, तर सर्वांनी मिळून तो बेत अमलात आणणं. कामाचा आपापला वाटा उचलणं. नेहमी असे कार्यक्रम मोठ्यांचे, मोठ्यांनी केलेले असतात. या कार्यक्रमात आवर्जून कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा लहानमोठा वाटा असलाच पाहिजे.
- एकमेकांसाठी आतापर्यंत कधीच न केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणणं. यासाठी थोडी कल्पकता लागेल.
- एकमेकांची कामं करणं. कामांची अदलाबदल करणं.
इथं काही गोष्टी सुचवल्या आहेत. यामध्ये आपल्या कुटुंबाला जे काही जमेल, झेपेल, पटेल, आवडेल ते करून बघावं. यात भर घालावी.
सगळेच शनिवार-रविवार मोकळे मिळतील असं नाही. कदाचित या दोन्ही सुटीच्या दिवसांत मधले एक-दोन तासच मिळतील; पण त्या दिवसांमध्ये किंवा त्या तासांमध्ये पूर्ण कुटुंबानं एखादी नवी ऍक्‍टिव्हिटी केली तर फारच छान!
इथं आपलं जे काही कुटुंब असेल, त्यांची वैशिष्ट्य लक्षात घेऊन तसं प्लॅनिंग करावं. समजा सिंगल पेरेंट असतील, तर मुलांसह एखादा अनुभव दोघांनीही नव्याने घ्यायचा असं घडू शकतं. एखादा अनुभव मुलांबरोबर आपणही पहिल्यांदाच घेणं यात एक वेगळीच मजा आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक वेळेला आपण आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी मुलांना सांगत असतो. यामध्ये "मला हे माहीत आहे' आणि "तू हे बघ' किंवा तू हे समजून घे' किंवा "यातली मजा बघ', 'असं करून बघ' अशी आपली वाक्‍यं असतात; परंतु या संकल्पनेमध्ये आपल्यालाही कल्पना नसलेला, नवा अनुभव अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ, आपण यापूर्वी कधीही गेलो नाही, अशा गावात मुलांसह जाणं, तिथल्या नवीन गोष्टी शोधणं, असं काही करायला हवं. यामध्ये चुका होणंसुद्धा क्षम्य आहेच. रस्ता चुकणं, एखादा निर्णय चुकणं, एखादं प्लॅनिंग पूर्णपणे फसणं, जसं वाटत होतं तसं घडणं किंवा न घडणं हे "स्वीकार'ता यायला हवं.

एखाद्या अवघड, अनपेक्षित प्रसंगात एकमेकांशी भांडणं न करता, "तुझ्यामुळे झालं' असं न म्हणता, यातून जी काही चूक घडली आहे ती सगळ्यांनी मिळून दुरुस्त करणं यात एक वेगळाच आनंद आहे. शिकणं आहे. यामध्ये आपण मुलांना सहभागी करून घेऊ शकतो. त्यांनी केलेल्या सूचना प्रत्यक्षात आणू शकतो. त्यांच्या सूचना खरोखरीच चांगल्या असतील, तर त्यांना शाबासकी पण देऊ शकतो. यामुळं सर्व काही व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतानासुद्धा काही गोष्टी फसू शकतात, हे मुलांना समजतं. यातून त्यांच्या मनामध्ये शिकण्याची प्रक्रिया घडून येते, समस्या कशा सोडवायच्या हे ते शिकत जातात.

समजा, वरती म्हटल्याप्रमाणं संपूर्ण कुटुंबानं ठरवून एखादं छोटं किंवा मोठं आव्हान स्वीकारल्यानंतर प्रत्येकानं आपापली कामं योग्य पद्धतीनं करत असतानाही संपूर्ण कुटुंब नवीन गोष्टी शिकत असतं. समजा ती वस्तू चुकली, वापरता आली नाही तरीसुद्धा एकवेळ चालेल. इथं वस्तूला दुय्यम महत्त्व आहे आणि मेंदूतल्या शिकण्याच्या प्रक्रियेला जास्त महत्व आहे. एखाद्या श्रीमंती मॉलमध्ये फिरायला जाऊन सगळ्यांनी मिळून खरेदी करण्याचा आनंद वेगळा आणि सगळ्यांनी मिळून चुकत-माकत एकमेकांच्या चुका सांभाळून घेत स्वतःला नवीन प्रकारे घडवणं यातला आनंद अजूनच वेगळा! कदाचित त्यामध्ये आनंद, मजा, गंमत, समाधान या सगळ्याच गोष्टी एकात एक हात गुंफून येतील. यातून नुसती ती वस्तू घडवणं होणार नाही, कदाचित एखादी यशस्वी सहल एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर सर्व कुटुंबाचा एक छान प्रवास सुरू राहील.

अनेक कुटुंबं आज विविध अवघड प्रश्नांनी त्रासलेली दिसतात. हे प्रश्न इतकेही अवघड नसतात, की सोडवताच येणार नाहीत. सगळे प्रश्न सुटतात. आपल्या हातातली सुई जिथं पडली आहे, तिथंच ती शोधली तरच सापडेल. दुसरीकडं कितीही शोधलं तरी सापडणार नाही. हे सूत्र कायम लक्षात ठेवायला हवं. सर्वांनी मिळून शोधलं, तर लवकर सापडेल, हेही तितकंच खरं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com