उजळवू कळ्यांची मनं (डॉ. सुखदा चिमोटे)

dr sukhada chimote
dr sukhada chimote

किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या आदींबाबत मार्गदर्शन.

किशोरवयीन मुलांच्या जागरूक आणि सचिंत पालकांनी हॉल भरला होता. निमित्त होतं इन्स्टिटयूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थतर्फे (आयपीएच) आयोजित "पालकशाळे'चं. विषय होता ः "किशोरवयातल्या मुलांमध्ये वाढत चाललेलं नैराश्‍य आणि चिंता म्हणजेच डिप्रेशन आणि अँक्‍झायटीचं प्रमाण.' आमच्यासमोर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) एका पाहणीचे आकडे होते. भारतात कुमार वयोगटात, नैराश्‍यानं ग्रासलेल्या मुलांचं प्रमाण दर चार मुलांमागं एक एवढं आहे. सुमारे दहा टक्के मुलांना कोणीही जवळचा मित्र व मैत्रीण नाही. उमलत्या वयातल्या या मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण 15 टक्के इतकं आहे!
ही सारी आकडेवारी मन विषण्ण करणारी आहे. एक मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक म्हणून काम करताना रोज भेटणारी मुलं, पालक आणि त्यांचे अनुभव जाणून घेत असताना, ही "नैराश्‍य आणि चिंतेची साथ' झपाट्यानं पसरत चालली आहे याची वारंवार जाणीव होत असते. माझ्या क्‍लिनिकमध्ये मी रोज अशा उमलत्या वयातल्या मुलं-मुलींना भेटते. त्यांच्यात नवरात्रीला मनाजोगते आणि हवे तितके ड्रेसेस मिळाले नाही म्हणून फास लावून घेण्याचा प्रयत्न करणारी ईशा असते, मित्राएवढा पॉकेटमनी मिळावा म्हणून आई-बाबाना धमक्‍या देणारा अथर्व असतो, आणि पंधराव्या वर्षी पहिल्यावहिल्या प्रेमाला नकार मिळाला म्हणून विष घेतलेला सोहम असतो. सुदैवानं टोकाची भूमिका न घेतलेले; पण स्पर्धा, इर्षा, तणाव यांनी खचून गेलेले, निराश झालेले आणि झगडणारे रिया आणि निहारही असतात.

गोंधळलेले पालक
या मुलांसोबत येणारे त्यांचे पालक, अतिशय प्रेमळ आहेत, सजग आहेत; पण पार गोंधळून गेलेले आहेत. "कितीही दिलं, तरी या मुलांना पुरत नाही, यांचे हट्टच संपत नाहीत!' किंवा "हल्लीच्या पिढीचाच हा प्रॉब्लेम आहे, यांना कशाचीच किंमत नाही' यावर मात्र बहुतांशी लोकांचं एकमत आहे....पण थोडा विचार करा, अवघ्या तेराव्या-चौदाव्या वर्षी, स्वप्नाळू वयात वावरणाऱ्या आणि "मोठं' व्हायची उत्सुकता असणाऱ्या या मुलांना खरंच त्यांच्या आयुष्याची किंमत नसेल? त्यांची स्वप्नं, आकांक्षा या इतक्‍या तकलादू असतील? आई-बाबा, मित्र, भावंडं यांच्या प्रेमाचं काहीच मोल नसेल? नक्कीच नाही.
म्हणूनच या प्रश्नाकडं, समस्येकडं बघताना सार्वत्रिक मत व्यक्त करून न थांबता मुळाशी जायला हवं, समस्येला भिडायला हवं.

घडण कशी बनते?
जन्मापासून जाणत्या वयात येईपर्यंत, मुलाची मानसिक घडण कशी बनत जाते हे थोडं विस्तारानं पाहू या. मुलाच्या विचारक्षमता, समस्यांशी भिडण्याची कुवत, अपयशाकडं पाहायचा दृष्टिकोन हा प्रामुख्यानं तीन घटकांतून घडत जातो. पहिला घटक म्हणजे "संचित' किंवा नेचर. प्रत्येक व्यक्ती जन्माला येतानाच आपल्या गुणसूत्रांसोबत काही विचार आणि वर्तन वैशिष्ट्यं घेऊन येत असते. यात मोठा भाग अनुवांशिकतेचा म्हणावा लागेल. दुसरा घटक म्हणजे संस्कार किंवा नर्चर (Nurture) हा होय. जन्माला आल्यापासून, आजूबाजूच्या व्यक्ती, घटना, परिस्थिती यातून मूल शिकत असतं, त्याच्या धारणा, विचार बनवत असतं. आई-वडील, इतर नातेवाईक आणि त्यासोबत मित्र, शिक्षक, इतर समाज यांचा ह्या संस्कारांत महत्त्वाचा सहभाग असतो. तिसरा घटक म्हणजे संस्कृती किंवा कल्चर (Culture). ज्या देशात, धर्मात, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत मूल जन्म घेतं, त्यानुसार सामाजिक, लिंगसापेक्ष संकेत ते बिंबवून घेत असतं.

या तिन्ही घटकांचं संपृक्त म्हणजे त्या मुलाची मानसिक जडणघडण. विचार करायची पद्धत, विवेक आणि तारतम्य, निराशा किंवा अपयश हाताळण्याची क्षमता, ताण सहन करायची कुवत हे सारं त्या जडणघडणीतून येत असतं. या तीन घटकांचा विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की यापैकी सर्वांत महत्त्वाचा आणि आपल्या नियंत्रणाखाली असणारा घटक म्हणजे Nurture किंवा संस्कार.
मुलाच्या भावविश्वातली महत्त्वाची माणसं म्हणजे त्याचे पालक, इतर कुटुंबीय, मित्र, परिचित आणि शिक्षक. मुलाच्या सुदृढ शारीरिक वाढीसोबतच सुदृढ मन घडवण्यात या साऱ्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. नक्की कसे आहोत आपण पालक, शिक्षक म्हणून? काय शिकताहेत मुलं आपल्या विचार-वर्तनातून?

तुलना नको
एक अतिशय ठळकपणे दिसणारी गोष्ट म्हणजे तुलना. आपल्या मुलाची इतर मुलांशी केलेली तुलना आणि त्याहूनही अधिक म्हणजे त्यांची आपल्या बालपणाशी केलेली तुलना. "आम्ही चार भावंडं होतो आणि परिस्थितीही काही खूप चांगली नव्हती; पण आम्हाला नाही आलं कधी डिप्रेशन!' किंवा "सगळं यथास्थित मिळतंय म्हणून सुचताहेत ही थेरं!' अशा शेरेबाजीतून नक्की काय साध्य होतं? आधीच्या काळात साधन उपलब्धता कमी होती, पर्याय कमी होते, समस्या निराळ्या होत्या, सारं मान्य. त्या काळाचे काही फायदेही होते आणि तोटेही; पण जर आज तो काळच बदलला आहे, तर या तुलनेचा नक्की काय आणि कोणाला उपयोग आहे? त्यातून आजच्या समस्यांशी भिडण्याचं शहाणपण आपण मुलांना देऊ शकत आहोत, की नुसतीच संवादातील दरी वाढते आहे याचा विचार गतस्मृतीत रमणारे आई-बाबा आणि आजी-आजोबांनी नक्कीच करायला हवा.

इंटरनेट आणि माहितीच्या भडिमारात, इलेक्‍ट्रॉनिक गॅजेट्‌सच्या गदारोळात, आज वाढत्या वयातलं मूल नक्की काय ग्रहण करतं आहे? आपण सारेच "ऑन डिमांड' मानसिकतेचा आज बळी झालो आहोत. मला हवं ते, हवं तेव्हा, हवं तसं मिळायला हवं म्हणून आपली सारी धडपड सुरू आहे. या साऱ्यात, आपण मुलासमोर स्पर्धा, ईर्षा, असूया, सत्ता, लोभ, हट्ट या भावनांचं- वर्तनाचं उदात्तीकरण करत आहोत. दुसऱ्या बाजूला संयम, अपयश, आस्था, निःस्वार्थ प्रेम, त्याग, करुणा या भावना कशा हाताळाव्यात, माणसांचे परस्परसंबंध कसे असावेत यांचे आदर्श मात्र क्वचितच त्यांच्या दृष्टीस पडत आहेत.
आजची मुलं अधिक हुशार (Intelligent ) आणि स्मार्ट आहेत, मात्र ती अधिक शहाणी (wise) आहेत का, याचं उत्तर नकारार्थीच आहे.
मेंदूच्या वाढीतल्या सर्वांत शेवटच्या टप्प्यात सारासार विवेकबुद्धी विकसित होत असते, हे जीवशास्त्रीय सत्य आहे. त्यामुळं वाढीच्या आधीच्या टप्प्यांवर हे सारे नवे बदल बघत, अनुभवत असणाऱ्या मुलाला, तारतम्य आणि विवेक येण्याचं वय मात्र कमी झालेलं नाही!
ही खरं तर मुलांना समजून घेण्यातली महत्त्वाची मेख आहे. नव्या काळाच्या नव्या तंत्रज्ञानासोबत, सुबत्तेसोबत कितीही माहिती, साधनं मुलांना मिळाली, तरी त्यांना विवेक, तारतम्य हे पालकांच्या, शिक्षकांच्या वर्तनातूनच शिकायचं आहे.

ताण समजून घ्या
एकदा ही गोष्ट आपण साऱ्यांनी समजून घेतली आणि मान्य केली, की पुढची पायरी, मुलांना येणारे मानसिक ताणतणाव समजून घेण्याची.
एका बाजूला स्पर्धा आणि वेग तुफान वाढलेला आहे. अधिक पर्याय उपलब्ध आहेत आणि निवड करण्याचं स्वातंत्र्य (??) आहे. मात्र, दुसरीकडं, लहानपणापासूनच नकार कसा पचवावा, अपयशाकडं कसं बघावं, पुन्हा कसं उभं राहावं हे ना कोणी शिकवलं आहे ना कृतीतून दिसत आहे! आणि सगळ्यांत मोठं ओझं आहे ते अपेक्षांचं! "आम्ही तुला सर्व पुरवत आहोत, तेव्हा तू यशस्वी व्हायलाच हवंस. हवं ते करिअर करायचं स्वातंत्र्य आहे; पण धडपडायचं, अपयशी होण्याचं स्वातंत्र्य मात्र नाही,' हा संदेश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या, जाणते-अजाणतेपणी पालक मुलांना देत आहेत.
या सगळ्याचा परिपाक म्हणजे आज आपल्यासाठी छोटे असणारे प्रश्न, मुलांना जीवन-मरणाचे प्रश्न वाटत आहेत. आणि त्यातून येणारी अपार चिंता आणि घेरून टाकणारं नैराश्‍य यांत ही कुमारवयातली मुलं अधिकच रुतत आहेत.
या पार्श्वभूमीवर पालक म्हणून, सुजाण समाजघटक म्हणून आपली जबाबदारी नक्की काय आहे? सर्वप्रथम गरज आहे ती आपल्या मुलाचा आणि त्याच्या विचारांचा, भावनांचा विनाअट स्वीकार करणं. "नैराश्‍य येतंच कसं?' या विचारापाशी अडकून न राहता, ते नैराश्‍य येण्यामागची त्याची मनोभूमिका समजून घेणं आणि त्या समस्येशी विवेकी पद्धतीने भिडणं हे अधिक महत्त्वाचं. अनेकदा हे कारण अगदी जुजबी, क्षुल्लक वाटलं, तरी त्याचा मुलाच्या मनावर होणारा परिणाम हा खोल आणि दूरगामी असू शकतो.
या निमित्तानं माझी एक मैत्रीण आहे तेरा वर्षांची- तिची गोष्ट सांगते. आनंदी, हुशार, चौकस अशी संस्कृती काही दिवसांपासून शाळेत जायला नाराज होती. त्यानंतर पोट दुखणं, शाळेतून परत येणं, दांड्या मारणं अशी एक मालिकाच सुरू झाली. तिच्या आई-वडिलांनी हर प्रकारे तिला विचारणा करून झाली, शिक्षकांकडे चौकशी करून झाली; पण संस्कृतीचा बिघडलेला नूर महिना झाला तरी मूळपदी येईना. अशा पार्श्वभूमीवर संस्कृती माझ्याकडं आली. पहिली दोन-तीन सत्रं आम्ही शाळा सोडून सर्व गोष्टींवर गप्पा मारल्या, आणि हळूहळू ती खुलायला लागली. शाळेतली मुलं गेली अनेक आठवडे तिच्या नावाचा अपभ्रंश करून तिला "संसकुत्री' असं चिडवत होती आणि सर्व विरुद्ध एकटी अशा परिस्थितीत सापडलेल्या संस्कृतीला अतिशय हताश, निराश वाटत होतं, शाळा टाळण्याकडं तिचा कल झाला होता! अर्थातच एकदा कारण कळल्यावर संस्कृतीनं तिच्या समस्येवर काम केलं; पण अशा वरवर लहान किंवा नगण्य वाटणाऱ्या घटनेनंही मुलांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे.

नैराश्‍य ओळखायचं कसं?
नक्की कसं ओळखायचं, की आपल्या मुलाला नैराश्‍य किंवा अतिचिंता भेडसावते आहे? काही ठळक लक्षणं समजून घेऊ या. नेहमी आवडणाऱ्या गोष्टी (खाणं, गाणी, मित्र) आता न आवडणं, त्या टाळाव्याशा वाटणं, सतत नकारार्थी आणि हताश विचार मनात आणि बोलण्यात येणं, दैनंदिन चर्याही पाळली न जाणं, शांत झोप नं लागणं, झोपेचं प्रमाण कमी होणं, ही लक्षणं सातत्यानं दोन-तीन आठवडे किंवा अधिक काळ दिसत असतील, तर ओळखावं, की ही धोक्‍याची घंटा आहे आणि त्यावर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. "नाटकं', "ऍटीट्यूड', "शेफारला आहे' असे सरसकट शेरे न देता, योग्य मदत जरूर घ्यावी. नैराश्‍य किंवा अतिचिंता हा आजार योग्य समुपदेशनानं आणि गरज पडल्यास औषध वापरून नक्कीच आटोक्‍यात आणता येतो. मात्र, गरज आहे ती आपण साऱ्यांनी सजग राहायची, मुलांच्या भावविश्वातल्या खळबळींविषयी आस्था ठेवायची आणि वेळीच मदतीचा हात पुढं करायची! नैराश्‍य आणि चिंतेच्या या भयावह साथीविरुद्ध लढण्यासाठी, मुलांचा "विनाअट स्वीकार', सजग प्रेम आणि आस्था ही लस आपण साऱ्यांनीच टोचून घ्यायला हवी!

अजून एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. प्रत्येक मुलाची विकासाच्या प्रवासाची स्वतःची अशी एक गती आणि लय असते. तिचा योग्य वापर करून विकसित होणं ही अतिशय नैसर्गिक प्रेरणा आहे, आणि या विकासप्रक्रियेत Nature आणि Nurture त्यांचं काम बजावत असतातच! काही कारणानं कधी एखादी भावनिक समस्या निर्माण झालीच तरी ती समस्या म्हणजे विकासाच्या वाटेत आलेलं एक वादळ असतं. तीव्र मानसिक आजाराच्या दिशेने जाण्यापासून ह्या वादळाला वेळीच रोखणं आणि योग्य परिप्रेक्ष्यात त्याचा सामना करणं श्रेयस्कर होय.
मानसिक आरोग्य आणि भावनिक समस्यांकडं आजही समाज काहीशा पूर्वग्रहदूषित नजरेतून बघतो. मात्र, पालकांनी आणि शिक्षकांनी, विशेषतः किशोरवयीन मुलांच्या भावनिक समस्यांकडे बघताना, "अरे बापरे! हा तर मानसिक आजार!' किंवा "अशी काही समस्याच नाही, हे सगळे कल्पनेचे खेळ आहेत,' अशा टोकाच्या भूमिका घेणं टाळायला हवं. अशा वादळाशी सामना करताना, विकासाच्या अंतःप्रेरणेला पूरक अशी साथ आपण या उमलत्या मुलांना द्यायला हवी!

नैराश्‍य किंवा अतिचिंता हा आजार योग्य समुपदेशनानं आणि गरज पडल्यास औषध वापरून नक्कीच आटोक्‍यात आणता येतो. मात्र, गरज आहे ती आपण साऱ्यांनी सजग राहायची, मुलांच्या भावविश्वातल्या खळबळींविषयी आस्था ठेवायची आणि वेळीच मदतीचा हात पुढं करायची!

नैराश्‍य आणि चिंतेच्या या भयावह साथीविरुद्ध लढण्यासाठी, मुलांचा "विनाअट स्वीकार', सजग प्रेम आणि आस्था ही लस आपण साऱ्यांनीच टोचून घ्यायला हवी!

काही कारणानं कधी एखादी भावनिक समस्या निर्माण झालीच तरी ती समस्या म्हणजे विकासाच्या वाटेत आलेलं एक वादळ असतं. तीव्र मानसिक आजाराच्या दिशेने जाण्यापासून ह्या वादळाला वेळीच रोखणं आणि योग्य परिप्रेक्ष्यात त्याचा सामना करणं श्रेयस्कर होय.

नव्या काळाच्या नव्या तंत्रज्ञानासोबत, सुबत्तेसोबत कितीही माहिती, साधनं मुलांना मिळाली, तरी त्यांना विवेक, तारतम्य हे पालकांच्या, शिक्षकांच्या वर्तनातूनच शिकायचं आहे.

आजच्या समस्यांशी भिडण्याचं शहाणपण आपण मुलांना देऊ शकत आहोत, की नुसतीच संवादातील दरी वाढते आहे याचा विचार गतस्मृतीत रमणारे आई-बाबा आणि आजी-आजोबांनी नक्कीच करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com