आई नावाच्या "आधारवडा'विषयीची हृद्य मनोगतं (हेमंत जुवेकर)

book review
book review

आई हे सर्वनाम असलं, तरी खरं तर ते असतं घर तोलून आणि सावरून धरणाऱ्या प्रेमाचं विशेषनाम. अवघं विश्व सामावण्याची क्षमता असलेला शब्द. आईविषयी मनात खूप प्रेम असलं, तरी तिच्याविषयी सांगणं ही मात्र खूप कठीण गोष्ट. कारण आईविषयी मनात ओथंबून येणाऱ्या भावनेला शब्दात उतरताना, ते मनस्वीपणे तरीही सलग स्वरूपात मांडायचं भान साऱ्यांना उरतंच असं नाही. ते मांडण्यासाठी त्याच ताकदीची लेखणी हवी.

म्हणूनच संदीप काळे यांच्या मनात आलेली, आईच्या महन्मंगल प्रेमाला पुस्तकात सामावण्याची कल्पना साकारण्यासाठी मराठीतले जाणकार शब्दप्रभू संपादकच हवे होते. आपापल्या व्यापात गर्क असणाऱ्या संपादकांकडून लिहून घेणं ही आणखी एक कठीण गोष्ट; पण संदीप यांनी ते जमवलं आणि "मु. पो. आई - संपादकांचं मातृस्मरण' हे पुस्तक आकाराला आलं.

या साऱ्यांनीच आपल्या आईविषयी अतिशय प्रेमानं, अतिशय रसाळपणे लिहिलं आहे. या साऱ्या व्यक्तिविशेषांचं वय, भवताल आणि वातावरण वेगवेगळं असल्यानं त्यांच्या आठवणीतून तो काळ, तो परिसर थोडक्‍यात, त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरलेलं पर्यावरण हे सारं उत्तमपणे सामोरं येतं. अर्थात या पर्यावरणाचा तोल सांभाळणारी मुख्य सूत्रधार त्यांची आईच होती, हे या सगळ्यांनीच मन:पूर्वक मान्य केलंच आहे. या प्रत्येकाची शैली वेगवेगळी असली, तरीही त्यातून साकारणारी माऊली एकच प्रेमळ रूप घेऊन उभी रहाते. अवघ्या संताच्या अभंगातून उभ्या रहाणाऱ्या विठूमाऊलीसारखीच!

उत्तम कांबळे यांनी आपल्या आईवर, "आई समजून घेताना' हे अख्खं पुस्तक लिहिलंय. त्यामुळे यात ते काय लिहितात याविषयी उत्सुकता होती; पण त्यांनी आपल्या आईबरोबरच, आईचं रूप घेऊन त्यांना भेटलेल्या मातृस्वरुपांविषयी खूप मनापासून लिहिलंय. नात्याच्या ना गोताच्या अशा या मातांनी त्यांच्यावर केलेल्या मनस्वी प्रेमाबद्दल त्यांनी तेवढ्याच मनस्वीपणे सांगितलंय; पण तरीही त्यांनी स्पष्ट केलंयच, की आई शब्दात मावत नाहीत, कारण तिला शब्दात पकडणारे शब्दच अजून जन्माला आले नाहीत!

श्रीराम पवार यांनी आपल्या आईच्या आठवणी सांगताना एक सर्वसाधारणात: प्रत्येक आई-मुलाच्या नात्यात असणारी गोष्ट स्पष्ट केलीय. आयुष्याच्या धबगड्यात आईशी निवांतपणे गप्पा मारत बसण्याल्याच्या आठवणी फारशा नाहीतच; पण तरीही तिचं असणं आपल्या आयुष्याचा एक भाग हे मात्र विसरता येत नाही हे त्यांचं सांगणं प्रत्येक मुलाची भावना स्पष्ट करणारं आहे. प्रवीण बर्दापूरकर यांनी तर आपल्या आईविषयी लिहिताना जाणीवपूर्वक थोडा त्रयस्थपणे आणलाय, तरीही आठवणीतली उत्कटता मात्र हरवू दिलेली नाही. त्यांनी मांडलेल्या विस्तृत आठवणी आपलाही हात धरून सोबत नेतात.

भारतकुमार राऊत यांची आईही मर्यादित अवकाशातही आनंदबाग शिंपणारी, तिनं दिलेला एक सल्ला त्यांचं आयुष्य बदलून गेला. नोकरी सोडली तर संसारगाडा घसणार, त्यामुळे ती सोडावी की न सोडावी या द्विधा मन:स्थितीत असताना त्यांची आई त्यांना म्हणाली होती : ""कंटाळा येत आहे तोवरच ही नोकरी सोड, नाहीतर मग या कंटाळ्याचीही सवय होईल...'' ह. मो. मराठे यांनी आपल्या शैलीत लिहिलेल्या आईच्या आठवणी चित्रदर्शी उतरल्यात. त्यातलं वातावरण, त्यातली भाषा सगळं मुळातून वाचण्यासारखं. राजीव खांडेकर आणि नीलेश खरे यांनी आपल्या लहानपणाच्या आठवणीतून आईचं प्रेमळ कठोरपण लाघवीपणे मांडलंय, तर श्रीपाद अपराजित यांनी आपल्या आईची सुबुद्ध जगण्याची धडपड मनापासून सांगितलीय.
चंद्रमोहन पुप्पालांसारख्या दृश्‍य माध्यमात कार्यरत असलेल्या व्यक्तीनं आपल्या आईबद्दल खूप प्रेमाने लिहिलंय. आणि शेवटी ते म्हणतात : "मी सहजच लिहीत गेलो खरा; पण माझ्या लक्षात आलं, की भारतातल्या बहुसंख्य मातांची कहाणी अशीच तर असेल... पण असूदे, आपल्याला आपली आईच सगळ्यात खास वाटत असते...!' ही खरं तर साऱ्याच मुलांची आपल्या आईबद्दलची भावना त्यांनी नेमकेपणानं व्यक्त केलीय.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेली प्रस्तावना या पुस्तकाचं मूल्य वाढवणारी आहे. या प्रस्तावनेच्या निमित्तानं तेही मातृस्मरणात रंगून गेलेत. त्यांचं मातृप्रेम त्यातून जाणवतंच; पण या प्रस्तावनेतून त्यांच्या आईनं त्यांना दिलेला संपन्न रसिकतेचा वारसाही प्राधान्यानं जाणवतो. राजदीप सरदेसाई, मधुकर भावे, कुमार केतकर, महेश म्हात्रे, मंदार फणसे अशा अनेक मान्यवरांनी हे पुस्तक आईमय करायला आपापला आठवणभार दिलाय खरा; पण पुस्तकाचा हायलाईट ठरलाय माया पंडित-नारकर यांचा लेख. त्यांनी बाईतलं आईपण आणि आईतलं बाईपण यांचा अतिशय सांगोपाग विचार मांडलाय. त्यांनी म्हटल्याप्रमाणं, एकीकडे बाई आणि दुसरीकडे आई म्हणून जे जगणं व मूल्यव्यवहार कुटुंबात आणि समाजात स्त्रियांच्या वाट्याला येतात, त्यातून कल्पनेपलीकडचे ताण त्यांना सोसावे लागतात. त्यांच्या मातृपर्वाचा विचार आणि पुरुषांच्या पितृपर्वाच्या शक्‍यता याचा अधिक संवेदनशीलतेने विचार झाल्यास संस्कृतीच्या मानुष विकासाचे कितीतरी नवे पर्याय आपल्यासमोर खुले होऊ शकतील...

पुस्तकाचं नाव : मु. पो. आई
संपादकांचं मातृस्मरण
संपादन : संदीप रामराव काळे
प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई
पृष्ठं : 242, मूल्य : 250 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com