अभ्यासात सातत्य आवश्‍यक : संदीप पाटील

Sandip Patil
Sandip Patil

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - संदीप पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक, पुणे

नोकरी करताना व अथवा विरंगुळा म्हणून स्पर्धा परीक्षेकडे न पाहता, स्वतःवर विश्‍वास, परीक्षेसाठी कष्ट करण्याची तयारी व अभ्यासात सातत्य असणे गरजेचे आहे. जीव ओतूनच कष्ट करण्याची तयारी असेल, तरच या स्पर्धा परीक्षेकडे वळावे.

प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय कधी घेतला?
: सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाले असल्याने, देशसेवा व समाजसेवा करण्याची वृत्ती अंगात लहानपणापासूनच भिनलेली होती. यामुळे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासकीय सेवेत जाणे हेच अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवले असल्याने नोकरी लाथाडून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता.

त्यासाठी तयारी कशी केली?
: स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी दिल्ली येथे क्‍लास लावला होता. तीन ते साडेतीन वर्षे झपाटून अभ्यास केला. या काळात अभ्यास म्हणजे तपश्‍चर्या मानून, सातत्यपूर्ण पूर्णवेळ अभ्यास करण्यावर भर दिला. पहिले दोन प्रयत्न वाया गेले तरी, त्या अपयशाकडे दुर्लक्ष करून अभ्यास वाढविल्याने तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस झालोच.

प्रशिक्षणाचा अनुभव कसा होता?
: प्रशिक्षण फार उच्च दर्जाचे असते. नक्षलवाद, दहशतवाद, जातीय दंगली, प्रशासकीय कामकाज, अधिकारी म्हणून हाताळावी लागणारी कामे याबाबतचे सखोल प्रशिक्षण देण्यात येते. आयपीएस अथवा आएएस अधिकाऱ्यांना राष्ट्रीय दृष्टिकोन कसा असावा याचे प्रशिक्षण मिळते. यामुळे येथे प्रशिक्षण घेणारा अधिकारी हा देशाचा होतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रशिक्षणाचा फायदा प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करताना मोठ्या प्रमाणात होतो.

प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव कसा आहे?.
: आत्तापर्यंत खामगाव व परभणी या जातीय दंगलीबाबत संवेदनशील असणाऱ्या दोन जिल्ह्यांत, तर नक्षलवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली येथेही काम केले आहे. त्यानंतर सातारा व सध्या पुण्यात काम करीत आहे. प्रत्येक अन्यायग्रस्तास न्याय दिला गेलाच पाहिजे, या भूमिकेतून काम केल्यास अडचणी येत नाहीत. न्याय मागणाऱ्याच्या जागी स्वतःला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीला उभे करून पाहिल्यास, काम करताना चूक होऊच शकत नाही. कामाचे काटेकोर नियोजन केल्यास कामात यश मिळतेच.

स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल?.
: यश मिळवण्यासाठी कणखर मानसिकतेची व कठोर कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. केवळ पैसा मिळवणे हे साध्य न ठेवता, देशसेवा, समाजसेवेची संधी हाही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे. स्वतःवर विश्‍वास व कठोर मेहनत हेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले, तरी ते पचवून पुन्हा नव्याने उभा राहण्याची हिंमत असणारा यात यशस्वी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com